''विद्येचे माहेरघर बनतेय गुन्हेगारांच शहर''
''विद्येचे माहेरघर बनतेय गुन्हेगारांच शहर''Saam Tv News

''विद्येचे माहेरघर बनतेय गुन्हेगारांच शहर''

एकेकाळी विद्येचं माहेरघर असणाऱ्या या पुण्यात आता सातत्याने मन हेलावून टाकणाऱ्या घटना समोर येत आहेत. ही वाढ पोलीस प्रशासनाच्या कार्यक्षमतेवरच प्रश्नचिन्ह निर्माण करणारी आहे.

प्राची भगत

शिक्षणाचे आगार, सांस्कृतीक शहर आणि ऐतिहासिक परंपरेचा वारसा लाभलेलं पुणे शहर... एकेकाळी विद्येचं माहेरघर असणाऱ्या या पुण्यात आता सातत्याने मन हेलावून टाकणाऱ्या घटना समोर येत आहेत. सुसंस्कृत अशी ओळख असणाऱ्या या शहरात गुन्हेगारीच प्रमाण वाढत आहे. ह्या वाढत्या गुन्हेगारीमुळे पुणे पोलीसांचा गुन्हेगारांवर वचक कमी पडताना दिसून येतोय. गेल्या काही वर्षात चोरीच्या प्रकारांमध्ये राजरोसपणे वाढ झाली आहे. ही वाढ खरंतर पोलीस प्रशासनाच्या कार्यक्षमतेवरच प्रश्नचिन्ह निर्माण करणारी आहे. (pune is becoming a crime city?)

पुण्यातून सातत्याने चोरी, लूट, घरफोडी, छेडछाड, बलात्कार यांसारख्या घटना उघड होत आहेत. बंद घरे ही चोरट्यांसाठी मोठी पर्वणीच ठरत आहे. किरकोळ वस्तूंच्या चोरीपासून, तर मोठा ऐवज लंपास करण्यापर्यंत घरफोडीचे शस्र गुन्हेगारांकडून वापरले जात आहे. हडपसर परिसरात गाडीचा पाठलाग करुन 155 तोळ सोनं लुटल्याची घटना घडली आणि हे कमी होत की काय म्हणून पुढची घरफोडी चक्क माजी आमदारांच्या पुतण्याच्या घरातच केली.

या घरफोडीत 100 तोळे सोनं चोरुन नेल्याची घटना समोर आली. म्हणजे एकवेळ सामान्य नागरिकांच्या बाबतीतील घटना आपण (फक्त शक्येतेपुरती) गृहीत धरु पण ,जर राजकीय किनार असणाऱ्या व्यक्तींच्या बाबतीतसुद्धा अशा घटना घडत असतील तर मग गुन्हेगारांना एवढं धाडस करण्यासाठी नक्की कोणाच पाठबळ मिळतयं हा प्रश्नही उपस्थित होतोय. नागरिकांच्या दैनंदिन जीवनावर परिणाम करणारे गुन्हे वाढून पोलीस त्याची योग्य ती दखल घेत नसतील तर गुन्हा घडूनही त्याची उकल होणारचं नाही, ही बाब पोलिसांच्या अस्तित्वावरच प्रश्नचिन्ह निर्माण करणारी आहे.

अगदी सासरच्या जाचाला कंटाळून आत्महत्या करणाऱ्या 29 वर्षीय मुलाची धक्कदायक घटनासुद्धा पुण्यासारख्या शहरात घडते. आणि दुसरीकडे न्यायालयात घटस्फोटासाठी अर्ज केल्यामुळे त्या मुलाच्या कुटूंबाला बहिष्कृत (वाळीत) करण्यात आल्याची घटना सुद्धा याच शहरात घडते. म्हणजे पती-पत्नीच्या कौटूंबिक वादात जात पंचायत हस्तक्षेप करणार असेल आणि कायद्याची अंमलबजावणी करणारे मात्र हातावर हात धरुन बसणार असतील तर छळ करणाऱ्यांचे हात अधिक बळकट होणार हे निश्चीत. कारण अगदी ताजी समोर आलेली बातमी म्हणजे चारित्राच्या संशयावरुन तलाठी पतीने डॅाक्टर पत्नीचा खून केल्याची. म्हणजे एकानंतर एक घटना वारंवार समोर येत राहतील. त्यामुळे प्रशासनाने फक्त समस्येचा नाही तर विकृतीचा तोडगा काढणं गरजेच आहे...

बरं हे अपराध फक्त इथपर्यंतच थांबत नाहीत तर याच पुण्यात 25 वर्षीय तरुणीवर 6 जणांनी सामुहिक बलात्कार केल्याची घटना घडते. ही मानवतेला काळीमा फासणारी घटना ताजी असतानाच पुन्हा 14 वर्षीय मुलीवर सामुहिक बलात्काराची घटना समोर येते. पहिल्या प्रकारात जर कठोरातील कठोर कारवाई झाली असती आणि पोलीसांचा जबर धाक गुन्हेगारांना बसला असता तर कदाचीत ह्या अल्पवयीन मुलीवरचा प्रसंग टळला असता अशी शक्यता नाकारता येणार नाही. छेडछाडीचे प्रकार तर कायमच घडत असतात. या घटनांची (फक्त) दखल जरी पुणे प्रशासनाकडून घेतली गेली असली तरी पुन्हा प्रश्न निर्माण होतो तो प्रशासनाच्या गुन्हेगारीवरील धाकाचा.

आता याला अपवाद काही घटना आहेत म्हणजे पुण्यातील मुंडनाळ येथील कार्निवल पबमध्ये पोलीस उपआयुक्तान लाच मागितल्यामुळे निलंबीत करण्यात आलं किंवा अलीकडेच चोरट्यांच्या गॅंगची पोलीसांनी धिंड काढली, पण ह्या घटना फक्त हाताच्या बोटावर मोजण्याइतक्याच. बाकी कायदा आणि सुव्यवस्थेची जबाबदारी प्रशासनाकडून घेतली जाणे गरजेच आहे. कारण ह्या सगळ्या घटना सातत्याने समोर येत असताना पुणे खरचं सुरक्षीत आहे का? पुण्याच्या या विस्कटलेल्या घडीला प्रशासनाच तर जबाबदार नाही हा प्रश्न उपस्थीत होतोय.

कारण विद्येचे माहेरघर समजल्या जाणाऱ्या ह्या शहराच रुपांतर गुन्हेगारांच शहरामध्ये होताना दिसतयं...मग जर आपण चुकल्यानंतर आपल्यावर कठोरातील कठोर कारवाई होणार हे जर एकदा नक्की झालं तर मग या वाढत्या गुन्हेगारीला निदान रोख मिळण्याची शक्यता दिसून येते. पण पुन्हा एकदा मुद्दा येतो तो कठोर प्रशासकीय कारवाईचा...ती जोपर्यंत होणार नाही तोपर्यंत या सगळ्या शक्यता फक्त नाममात्र...

Edited By - Akshay Baisane

Related Stories

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com