Crime Podcast: महाराष्ट्राला हादरवणारं परभणीचं 'मानवत हत्याकांड'; मांत्रिकाचा एक सल्ला अन् 11 निष्पाप जीवांचा क्रूर अंत

Human Sacrifice case of Manavat Village in Maharashtra: मानवत हत्याकांडात एक दोन नाही तर मानवतमध्ये तब्बल अकरा बळी पडले.
Crime Podcast
Crime PodcastSaam TV

Crime Unplugged | Marathi Crime Podcast: अंधश्रद्धा निर्मूलन कायदा आला तोच त्याच्या निर्मात्याचा बळी देऊन.... सन २००३ मध्ये अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक डॉ. नरेंद्र दाभोलकर यांनी या कायद्याचे प्रारुप तयार करुन सादर केलं होतं. २० ऑगस्ट २०१३ रोजी पुण्यात डॉ. दाभोलकरांची हत्या झाली आणि सरकारला जाग आली.

त्याच वर्षी डिसेंबरमध्ये नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात अंधश्रद्धा निर्मूलनाचा कायदा संमत झाला. एकूणच अंधश्रद्धेच्या विळख्यात अडकलेल्या आपल्या समाजात नरबळीसारखे प्रकार होत होते. अजूनही हे प्रकार तुरळक स्वरुपात कानावर येतातच. अशाच एका घटनेतून अवघा महाराष्ट्र हादरला होता.

मानवत... परभणी जिल्ह्यातल्या पाथरी तालुक्यातलं पंधरा हजार लोकवस्तीचं एक गाव. १९७२ मध्ये हे गाव अचानक चर्चेत आलं ते तिथं घडत असलेल्या काही अत्यर्क घटनांमुळं. याच गावातलं उत्तमराव बारहाते एकेकाळी मानवत नगरपालिकेचं अध्यक्षपद भुषवलेलं बडं प्रस्थ.

याच मानवत गावाच्या बाहेर पारध्यांची वस्ती होती. गरिबीमुळं या वस्तीवरचे लोक बरेवाईट धंदे करायचे. त्याच वस्तीत रुक्मिणी हातभट्टीचा धंदा चालवायची. गावात पाटलाप्रमाणं मान असलेल्या उत्तमरावाची नजर रुक्मिणीवर पडली. रुक्मिणी दिसायला देखणी. उत्तमरावानं रुक्मिणीला वस्तीवरुन सरळ उचललं आणि स्वतःच्या वाड्यावर नेलं. (Crime News)

उत्तमरावाला बोलणार कोण. रुक्मिणी त्याची रखेल बनली. उत्तमरावानं तिच्यासाठी चक्क एक नवा वाडा विकत घेतला. आता रुक्मिणी तिथूनच हातभट्टीचा धंदा चालवायला लागली. उत्तमरावाच्या ताकदीमुळं पोलिसही धंद्यावर छापा टाकायला धजत असत. (Saam TV Podcast)

रुक्मिणीच्या हातात बक्कळ पैसा खेळायला लागला. पण रुक्मिणी सुखी नव्हती. रुक्मिणीला काही केल्या गर्भ रहात नव्हता. त्यातच तिची मासिक पाळी बंद झाली. मग रुक्मिणीचं नवस, देव-देव-गंडेदोरे उपास तापास असे प्रकार सुरु झाले.

मानवत गाव आणखी एका कारणासाठी कुप्रसिद्ध बनलं होतं. सोळाव्या शतकात हैदराबादच्या निझामानं या भागावर आक्रमण केलं होतं. त्यावेळी गाव सोडून जाताना गावकऱ्यांनी आपलं सोनं-नाणं गावातच पुरलं अशी आख्यायिका होती. हा खजिना शोधण्यासाठी गावोगावचे लोक मानवतला यायचे. साहजिकच या परिसरात त्यावेळी तांत्रिक-मांत्रिकांचा सुळसुळाट झाला होता.

रुक्मिणीच्या फेऱ्याही या मांत्रिकांकडं व्हायला लागल्या. पण तरीही गुण येईना. त्यातच तिला आणखी एक मांत्रिक भेटला. गणपत साळवे... रुक्मिणी त्याच्या पूर्ण कह्यात गेली. रुक्मिणी रहायची त्या वाड्यात एक पिंपळाचं झाड होतं. या झाडावर मुंजा राहतो आणि त्याला सुंदर मुली आवडतात असं साळवेनं रुक्मिणीला सांगितलं.

Crime Podcast
Kolhapur Crime News: आधी वडिलांची हत्या, मग स्वत: संपवलं जीवन; तरुणानं का उचललं टोकाचं पाऊल?

साळवेच्या म्हणण्यानुसार हा मुंजा एक गरीब ब्राह्मण होता आणि लग्न होण्यापूर्वीच मेला होता. त्याला खूष केलं तर तुला मूल होईल असं साळवेनं रुक्मिणीच्या डोक्यात भरवलं. त्याला खूष करण्यासाठी भाग चढवावे लागतील अस साळवेनं तिला सांगितलं. भाग म्हणजे बळी. आणि मग एक दोन नाही तर मानवतमध्ये तब्बल अकरा बळी पडले. ही भयानक सत्य घटना काय होता याचा पुढचा घटनाक्रम.

मुंजाला खूष करण्यासाठी चार कुमारिकांचे बळी द्यावे लागतील असं साळवेनं सांगितल्यावर मग मुलींचा शोध सुरु झाला. दुसरीकडं उत्तमरावर वाड्यावर दारु पिऊन पडलेला असायचा. मग रुक्मिणीनं त्याचे शंकर काटे आणि सोपान थोटे हे दोन गडी फितवले आणि त्यांना मुली शोधण्याच्या कामाला लावलं. आणि तिथून सुरु झाला मानवतमधल्या हत्यांचा भयानक सिलसिला.

या नरबळींच्या मालिकेतला पहिला खून पडला तो ११ वर्षांच्या गयाबाईचा. १४ नोव्हेंबर, १९७२ ला अगदी बालदिनाच्याच दिवशी. त्यानंतर ९ डिसेंबर १९७२ ला नऊ वर्षांच्या शकिलाचा, २१ फेब्रुवारी १९७३ ला सुगंधाबाई या ३५ वर्षांच्या महिलेचा आणि १३ एप्रिल १९७३ ला नसिमा या दहा वर्षांच्या मुलीचा खून झाला.

दरम्यानच्या काळात ५ डिसेंबर १९७३ ला कोंड्या उमाजी लोळे या मुलाचाही खून झाला होता. मानवतच्या खून प्रकरणाची दहशत वाढत होती आणि पोलिसांवरचं प्रेशरही. अखेर सरकारनं या खूनांचा तपास करण्याचं काम मुंबई सीआयडीवर सोपवलं. रमाकांत कुलकर्णी, विनायक वाकटकर हे मुंबई सीआयडीचे कर्तबगार अधिकारी मानवतमध्ये दाखल झाले.

तपास सुरु असताना खून झालेला कोंड्या एका समिंदरी पारधी नावाच्या तरुणीबरोबर शेवटचा दिसल्याची माहिती पोलिसांना मिळाली. समिंदरी ही रुक्मिणीची बहिण. पोलिसांनी समिंदरीला उचललं. पोलिसांच्या तपासात समिंदरी फुटली. समिंदरीकडच्या तपासातून पोलिसांसमोर मानवत हत्याकांडाचं भयानक स्वरुप उघड व्हायला लागलं.

रुक्मिणीच्या वाड्यातल्या पिंपळावरच्या मुंजाबाला नरबळी दिला तर तिला मूल होईल आणि गुप्तधनही सापडेल, असं गणपत साळवे या मांत्रिकानं सांगितलं होते. केवळ बळी द्यायचे नाहीत तर दिलेल्या बळीचं मुंडकं, उजव्या हाताची करंगळी आणि गुप्तांग चिरून त्यातलं रक्त मुंजाबाला वहायचं असा या मांत्रिकानं सांगितलेला भयानक तोडगा होता.

आणि मग रुक्मिणीसाठी शंकर काटे आणि सोपान साळवेनं मुली पळवून त्यांचे बळी दिले. कोंड्याला या प्रकाराची खबर लागली होती म्हणून त्याचाही काटा काढण्यात आला. पोलिसांनी रुक्मिणी आणि उत्तमरावावर फास आवळायला सुरुवात केली. १८ जून १९७३ ला पोलिसांनी रुक्मिणी आणि उत्तमराव या दोघांनाही बेड्या ठोकल्या. (Latest Breaking News)

Crime Podcast
Ahmednagar Clash: हिंसाचारानंतर शेवगावात तणावपूर्ण शांतता; व्यापारी, ग्रामस्थांनी घेतला मोठा निर्णय

पण या साऱ्या प्रकरणाबाबत पोलिस फारसे गंभीर नव्हते. कारण रुक्मिणी आणि उत्तमराव अटकेत असले तरी शंकर काटे, सोपान साळवी बाहेरच होते. रुक्मिणीला नरबळींचा सल्ला देणारा गणपत साळवेही फरार होता. त्यातच ३० जुलै १९७३ ला रुक्मिणी आणि उत्तमरावाला जामीन मिळाला. या जामिनाला पोलिसांनी विरोध का केला नाही हे एक गुढचं आहे.

उत्तमराव आणि रुक्मिणी पोलिसांच्या ताब्यात असतानाच २९ जून १९७३ ला कलावती या मुलीचा मानवतच्या कोल्हा शिवारात खून झाला. १२ जुलै १९७३ ला हालिमा या अकरा वर्षांच्या मुलीचा खून झाला. रुक्मिणी आणि उत्तमराव बारहाते सुटले. त्यानंतरही खूनाचं सत्र सुरुच राहिलं. या तपासातली ढिलाई मानवतला महागात पडली. ८ ऑक्टोबर १९७३ ला पार्वती बारहाते या तीस वर्षांच्या महिलेचा खून झाला. त्यानंतरचा काही काळ शांत गेला. नव्या वर्षाच्या पहिल्याच आठवड्यात मानवतला पुन्हा एक धक्का बसला. ३ जानेवारी १९७४ आणि ४ जानेवारी १९७४ च्या दरम्यान हरिबाई बोरवणे ही महिला तिची ९ वर्षांची मुलगी तारावती आणि दीड वर्षांची मुलगी कमल यांचे खून पडले. खुनाची मोडस ऑपरेंडी मागच्या खुनांप्रमाणंच होती.

अखेर ४ जानेवारी १९७४ ला पोलिसांनी उत्तमराव व रुक्मिणीला पुन्हा अटक केली. शंकर काटे, सोपान थोटे यांनाही पकडण्यात आलं. पुढच्याच महिन्यात फरारी असलेला मांत्रिक गणपत साळवे पोलिसांना बारामतीत सापडला. दगडू पारझी, देन्या पारधी, सुकल्या पारधी, वामन पारधी, गेन्या लाड यांनाही या प्रकरणात अटक झाली. समिंदरी अटकेत होतीच. या सर्वांशी संबंधित असलेल्या आणखी काही जणांनाही पोलिसांनी अटक केली. या प्रकरणात एकूण अठरा आरोपी होते.

परभणीच्या सत्र न्यायालयात या सर्वांच्या विरोधातला खटला उभा राहिला. न्यायाधीश होते एन. एस. मानुधने. खटला सुरु असतानाच आरोपी गेन्या पारधी मरण पावला. उरलेल्यांविरुद्ध खटला चालला. न्यायालयानं रुक्मिणी उत्तमराव आणि सोमान थोटेला फाशीची शिक्षा सुनावली. दगडू पारधी, देन्या पारधी, सुकल्या पारधी आणि वामन पारधी यांना जन्मठेप सुनावण्यात आली. मांत्रिक गणपत साळवे आणि शंकर काटे हे दोघे माफीचे साक्षीदार होते. या दोघांनाही सोडण्यात आलं.

खटला अपिलात गेला. उच्च न्यायालयानं रुक्मिणी आणि उत्तमरावला निर्दोष मुक्त केलं. बहुदा त्यांच्या विरुद्धचा परिस्थितीजन्य पुरावा कोर्टाला पटला नसावा. सरकारनं रुक्मिणी आणि उत्तमराव यांच्या विरोधात सर्वोच्च न्यायालयात अपिल केलं.

सर्वोच्च न्यायालयात न्यायमूर्ती यशवंतराव चंद्रचूड, न्यायमूर्ती गोस्वामी आणि न्यायमूर्ती सिंघल यांच्यासमोर सुनावणी झाली. रुक्मिणी आणि उत्तमराव यांच्याबाबत उच्च न्यायालयानं दिलेला निकाल कायम करण्यात आला. ज्यांना जन्मठेप सुनावण्यात आली होती त्यापैकी दगडू पारधी, देव्या पारधी आणि सुकल्या पारधी यांना सर्वोच्च न्यायालयानं फाशीची शिक्षा सुनावली आणि सोपान थोटेची फाशीची शिक्षा कायम केली. अशा प्रकारे मानवत नरबळी प्रकरणावर अखेरचा पडदा पडला.

कायद्याच्या दृष्टीनं हे प्रकरण संपलं तरी मानवतकरांच्या मनावर हे प्रकरण खोलवर जखम करुन गेलं. आज अंधश्रद्धे विरोधातला कायदा झाला असला तरीही त्यात नरबळीबाबतची कलमं खूपच त्रोटक आहेत. शिक्षणाचं प्रमाण वाढलं. अंधश्रद्धा कमी झाली असं कितीही म्हटलं तरी अधूनमधून नरबळीचे प्रकार ऐकायला येतातच आणि मग पुन्हा एकदा आठवण होते ती मानवत खून सत्राची!

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com