हतबल होतील ते 'राऊत' कसले !

न्यूज रूमची रोजची सकाळ राऊतांच्या येण्यानं होते. फरक इतकाच की, आजची सकाळ राऊतांच्या घरी आलेल्या ईडीच्या पाहुण्यांनी झाली.
Sanjay Raut
Sanjay RautSaam Tv

रोहित अंबरवाडीकर

न्यूज रूमची रोजची सकाळ संजय राऊतांच्या (Sanjay Raut) येण्यानं होते. फरक इतकाच की, आजची सकाळ राऊतांच्या घरी आलेल्या ईडीच्या पाहुण्यांनी झाली. राऊतांच्या घरी ईडीची टीम पोहचली. इतकीच ती काय सुरुवातीची बातमी. बातमी आली, ड्राय ब्रेकिंग ऑन एअर गेली. पण इतकीही बातमी 'ड्राय' नाहीय, याचा अंदाज न्युज रूममधल्या बऱ्याच जणांना आलेला...राऊत आणि माध्यमं हे समीकरण आहे. कारण, राऊत माध्यमं आणि राजकारण यातील सेतू आहेत. त्यामुळे माध्यमांना काय हवंय, हे त्यांना चांगलं कळतं. तसं ते बोलत जातात, दिवसभर चर्चेत राहतात. चर्चेत असणाऱ्या माणसाला कौतुक आणि टीका दोन्हींचा 'सामना' करावा लागतो. सामना करण्यात ते वाकबगार आहेतच. असो, मुद्द्यावर येतो. राऊत यांच्यावरील ईडीची कारवाई, राऊतांच्या कर्माचं आणि भाजपच्या राजकीय सुडाचं फलित आहे. हे सांगायला आता ज्योतिषाची गरज नाहीय.

राऊत (Sanjay Raut) अडचणीत आले, त्यामागे अनेक कारणं आहेत. त्यातील महत्वाचं कारण म्हणजे, सध्याचा राज्यातील राजकीय स्पर्धक असलेल्या, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना ईडीचा त्रास देणं शक्य नाहीय. त्याचे संभावित परिणाम भाजप ओळखून आहे. त्यामुळे संजय राऊत सॉफ्ट टार्गेट ठरतात. राऊत यांना अटक झाली तरीही, फार काही विरोध होणार नाही. कारण त्यांच्याकडे स्वतःच असं कार्यकर्त्यांचं जाळं नाही, हे भाजप ओळखतो. त्यामुळे त्यांना टार्गेट करण्यात आलंय, असं एकूणच वाटतं. संजय राऊत यांच्या करिअरची सुरुवात लेखक, पत्रकार अशा भूमिकेतून झालीय. त्यामुळे पत्रकारांच्या अंगभूत गुणांनुसार प्रत्येक गोष्टीचा न्यायनिवडा करणं, त्यांच्या बोलण्यात ओघानं येतंच. पटकन कुणालातरी गुन्हेगार ठरवायचं, हा गुण राजकारणात गेल्यावरही सुटलेला नाहीय. त्यामुळे प्रत्येकाला तू कसा मूर्ख आहेस, तुझी लायकी काय आहे, हे राऊत सांगत सुटलेत. त्यामुळेही त्यांना अडचणींचा सामना करावा लागतोय. सोबत एकाच वेळी अनेकांना अंगावर घ्यायची त्यांची सवयही अडचणीची ठरतेय. 2019 ला भरघोस यश मिळवूनही, फडणवीस परिणामी भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यात राऊत कारणीभूत ठरले. त्यामुळे उद्धव यांच्यापेक्षा व्हीलन पदाची माळ राऊत यांच्याच गळ्यात पडली...

Sanjay Raut
सर्वात मोठी बातमी! राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मागितली महाराष्ट्राची माफी

वाचाळवीर असं म्हटलं तरी, राऊत यांच्या घराबाहेर प्रत्येक वाहिनीला एक प्रतिनिधी ठेवावा लागतोच, हे वास्तव आहे. रोज संजय राऊत काहीतरी मसाला देणार, हे पत्रकार मित्रांच्या अंगवळणी पडलंय. त्यामुळे सकाळ झाली, राऊत घराबाहेर आले की, एक सेगमेंट राऊत यांच्या नावाची ठरलेलाच असतो. ते काहीही बोलले तरी त्याची बातमी होतेच, हे सेनेच्या अन्य पदाधिकाऱ्यांना आवडलेलं नाही. संजय राऊत यांना मिळणारं फुटेज, पक्षांतर्गत विरोधकांना पाहवलं नाही. सामनाचे संपादक, राज्यसभेवर तीनवेळ खासदार, पक्षाची भूमिका मांडणारे मुख्य प्रवक्ते, हे कित्येकांना पचलेलं नाहीय.

आमच्याच पाठिंब्यावर निवडून येता, आणि आम्हालाच कंट्रोलमध्ये ठेवता. हे इतर आमदारांना मान्य झालेलं नाही. परंतु, तरीही उद्धव ठाकरे यांचे निकटवर्तिय राऊत कसे ? असा प्रश्न पडणं स्वाभाविक आहे. संकटाच्या काळात पक्षाची, विशेषतः उद्धव ठाकरे यांची बाजू भक्कमपणे राऊत मांडतात; याकडे कानाडोळा करत येणार नाही. संजय राऊत यांना इतकं महत्व मिळण्याच एकमेव कारण म्हणजे, त्यांना बोलता येतं. निर्भयपणे शिंगावर घ्यायची त्यांची प्रवृत्ती आहे. शिवसेनेत असे अन्य नेते अभावानेच आहेत. उद्धव ठाकरे हे प्रभावी वक्ते नसल्याचंही राऊत यांच्या पथ्यावर पडलंय. परंतु, काही निरीक्षणं इथं नोंदवली पाहिजेत. जेव्हा जेव्हा शिवसेनेवर हल्ला झाला. तेव्हा तेव्हा तो परतावून लावण्याचं काम राऊतानी केलंय. भाजपच्या दिग्गज फळीला नामोहरम करण्यासाठी सेनेत राउत आघाडीवर होते. अन्य नेत्यांना त्या बाबतीत पुढाकार घेता आलेला नाही. हातचं राखून बोलायचं आणि गरजेच्या वेळी पक्षांतराची शक्यता जिवंत ठेवायची. असं सगळ्या सेना नेत्यांनी केलं. त्यामुळे ते दुय्यम ठरले आणि राऊत अव्वल. पवारांशी मैत्री असो, की मोदींवरची टीका, ममतांशी जवळीक असो की फडणवीसांसोबतचा दुरावा, याबाबत कोणतीही भीडभाड राऊत यांनी ठेवली नाही. त्यामुळे राऊत कायम टार्गेट होत गेले. बोलतो तो प्रकाशझोतात येतो. तसं राऊत सेना विरोधकांच्याम कायम रडारवर राहिलेत.

Sanjay Raut
Chandrakant Patil| स्वातंत्र्य टिकवण्यासाठी मोदी प्रयत्न करत आहेत : चंद्रकांत पाटील

राऊतांवरची कारवाई बघून, भाजपच्या आणि शिंदे गटाच्या नेत्यांना गुदगुल्या होतायत. पण हा बाण कधी आपल्याकडे वळेल, याची पुसटशी कल्पनाही त्यांना नाहीय.

सध्या खुश असणाऱ्या बंडखोर आमदारांनी हे विसरू नये की, आपल्याला कधीकाळी याच माणसासमोर हुजरेगिरी करावी लागलीय. तुम्ही सगळ्या गोष्टी बदलू शकता. नियतीला बदलवता येत नाही. जसे की, 105 असूनही फडणवीस मुख्यमंत्री झाले नाहीत. एवढंच काय आता सत्तेत सहभागी असूनही, मुख्यमंत्री पद मिळालं नाही. कारण, नियातीपुढे सगळे हतबल होतात. तसं हतबल होणं, आज ना उद्या प्रत्येकाच्या वाट्याला आहे. आज राऊत अडचणीत आहेत. ज्यांनी परिस्थितीनुसार पक्ष बदलले, त्यांची ईडी कारवाई टळली. पण ती कायमची टळली असं समजण्याचं कारण नाही. 'करणार तो भरणार' हे त्रिकालाबाधित सत्य आहे.

दुसरी बाजू म्हणजे, राऊतांची (Sanjay Raut) काहीच चूक नाही, असंही नाही. आम्ही बोलू तसंच, हम करेसो कायदा, हे फार काळ तग धरू शकत नाही. हे राऊत यांच्या लक्षात आलं नसेल, याबाबत शंकाच आहेत. समोरच्याची काही मतं असतात, भूमिका असतात, हे मान्य करण्यात राऊत कमी पडलेत. राऊतांच अनावश्यक स्टाईल मारणं, त्यांचं ऑरोगंट वाटणं, त्यांची भाषा याबाबत माझेही आक्षेप आहेत. परंतु माणसाचं वागणं, बोलणं हा स्थायी भाव आहे. त्याबाबत तात्काळ बदल होतील, अशी अपेक्षा करणं चुकीचंच. टीकेचे धनी होत असले तरीही संजय राउत, राज्याच्या राजकारणात मध्यवर्ती भूमिका बजावतात, हे आपण 2019 मध्ये पाहिलंय. शिंदे गट फुटून वेगळा झाल्यावर, अनेक आमदारांच्या अत्याचाराच्या करुण कहाण्या राऊतांच्या नावावर खपल्या. एका दोघांच्या नाही तर 40/50 आमदारांच्या काहण्यांचे 'खलनायक' संजय राऊत ठरले. पण त्यांनी व्यथित न होता, प्रत्येकाला उत्तम, साजेसं प्रतिउत्तर दिलंय.

Sanjay Raut
MNS : अमित ठाकरे इन अॅक्शन मोड; तरुणाईला साद घालण्यासाठी मनविसेचे अनेक युनिट सक्रिय

संजय राऊत (Sanjay Raut) हे सक्रिय राजकारणी नाहीत. ते राजकीय कौशल्याने पारंगत असतीलही, परंतु १००% राजकारण त्यांना जमलेल नाही. राजकारणात फक्त प्रवक्त्याच्या भूमिकेत राहुल चालत नाही. जमिनीवर कार्यकर्त्यांची फौज असावी लागते. समर्थक असावे लागतात. तेंव्हा एक नेता म्हणून राजकीय पटलावर तुम्ही ठळक दिसता. राऊत यांच्या बाबतीत असं होत नाही. आता भाजप किंवा जेल हे दोनच पर्याय असतील तर, किती नेते जेल निवडणार आहेत. प्रत्येकात ही हिंमत असेलच असं नाही. अर्जुन खोतकर यांचे अश्रू बरंच काही सांगून गेले. माझ्या कुटुंबाला त्रास होतोय म्हणत, त्यांनी नाईलाजाने का होईना, ठाकरेंच्या कानावर परिस्थिती घालून, शिंदेंच्या गटात स्थान मिळवलं. पण, राऊत यांच्या निष्ठेला अथवा त्यांच्या हिंमतीला दाद द्यावी लागेल. बदनामी, टीका, 40 आमदारांचे आरोप, विठ्ठला भोवतीचं बडवेपण हे सगळं ते दगिण्याप्रमाने मिरवतात. ओझं होतंय म्हणून, टाकून देत नाहीत. अथवा त्यापासून दूरही पळत नाहीत. असं किती जणांना जमेल ?

असो, संजय राऊत (Sanjay Raut) यांनी गुन्हा केला असेल, तर त्यांच्यावर रीतसर कारवाई होणं आवश्यक आहे. परंतु, ही सगळी उठाठेव फक्त बदनाम करण्यासाठी, अथवा राजकीय स्वार्थापायी असेल तर महाराष्ट्राला खाली पाहण्याची वेळ येतेय, हे नक्की ! शेवटी काय तर, सुडाचं राजकारण नको. सुडाच्या कारवाया नको. यातून पुरोगामी म्हणवणाऱ्या महाराष्ट्राची परंपरा, संस्कृती याची कुचंबणा होते. राऊत इतक्यात हार मानणार नाहीत. दारात ईडी असताना, "खोटी कारवाई, खोटे पुरावे. मी शिवसेना सोडणार नाही. मरेन पण शरण जाणार नाही." असं म्हणण्याचं धाडस येतं कुठून, याबाबत मला तरी आश्चर्य वाटतंय. गुन्हा केलाय, अथवा नाही. हे काळ ठरवेलच. परंतु, राऊत यांना अटक करणं, हे शिवसेनेच्या पथ्यावर पडलंय. राज्यातील राजकीय परिस्थितीत भाजपला याचा किती फायदा होईल, माहीत नाही. पण राऊतांच्या परिणामी शिवसेनेच्या जनाधारत वाढ होईल, हे नक्की...

(या लेखातील मते लेखकाची वैयक्तिक आहेत.)

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com