तुझ्यानंतरही डोळ्यांचे असणे..! 
World Eye Donation Day

तुझ्यानंतरही डोळ्यांचे असणे..! 

हे जग खूप सुंदर आहे. आपल्या आजुबाजूला खूप छोट्या-छोट्या गोष्टींमध्ये सुंदरता लपलेली असते, पण त्या सुंदर गोष्टी पाहण्यासाठी आपला दृष्टिकोन सुंदर असावा लागतो. दृष्टिकोन सुंदर असेल तर प्रत्येक गोष्टींमध्ये आपल्याला सुंदरता दिसायला लागते; परंतु आपण कधी विचार केला आहे का? जर डोळे Eyes नसते तर सृष्टीत असणारे सौंदर्य Beauty आपण पाहू शकलो असतो का? सगळीकडे फक्त अंधार अंधार राहिला असता. जगात असलेले सौंदर्य डोळ्यांशिवाय अपूर्ण आहे. डोळे नसणारे लोकच डोळ्यांचे किती महत्त्व आहे हे समजू शकतात. Special Blog on World Eye Donation Day

आज जागतिक दृष्टिदान दिवस World Eye Donation Day. दृष्टी दान करण्याचे काय महत्त्व आहे, याबद्दल जनजागृती करण्यासाठी १० जून हा दिवस आंतरराष्ट्रीय दृष्टिदान दिवस म्हणून साजरा केला जातो. आपल्या डोळ्यांनी एखाद्याला दृष्टी मिळू शकते, हा विचारच माणसाला किती सुखावून जातो. 

१० जून आंतरराष्ट्रीय दृष्टिदान दिवस महाराष्ट्रात प्रसिद्ध नेत्र विशारद डॉ. आर. ए. भालचंद्र यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ साजरा केला जातो. आजच्या दिवशी विविध माध्यमांतून नेत्रदान करण्यासाठी लोकांना जागृत केले जाते. Special Blog on World Eye Donation Day

हे देखिल पहा

जगामध्ये अनेक लोक असे घडून गेलेत ज्यांनी स्वतःला दृष्टी नसतानाही खूप उंच भरारी घेतली आहे. त्यांच्याकडे पाहिले की, आपण दृष्टी असून त्याचा काहीच उपयोग करत नाही, असे सतत वाटते. दृष्टी नसणाऱ्या लोकांचा डोळस दृष्टिकोन आपल्याला विचार करायला भाग पाडतो. त्यांचा जगाकडे बघण्याचा सकारात्मक दृष्टिकोन आपल्यालाही सकारात्मक विचार करण्याकडे वळवतो. अनेकदा दृष्टी असणारे लोक दृष्टी नसल्यासारखे वागताना आपल्याला दिसतात. 

अंधत्व खूप जणांना जन्मतःच प्राप्त होते, तर कुणी अपघाताने अंध होतात. खूप वेळा अंध असणाऱ्या व्यक्तींना अंधत्व ही केवळ दुःखदायक गोष्ट नाही तर ती एक संतापजनक कटकट आहे असे ते मानतात. अंधत्वावर मात करून खूप व्यक्तींनी जगात नाव केले आहे. अंधत्व असणाऱ्या व्यक्तींसाठी लिहिता, वाचता येणे ही गोष्ट किती कठीण आहे, पण यावरही अंधत्व असणाऱ्या व्यक्तीनेच शोध लावला.

लुइ ब्रेल यांनी अंध असणाऱ्यांसाठी ब्रेल लिपी शोधली. अनेकदा प्रश्न पडतो कोणत्याही डोळस व्यक्तींनी ही लिपी शोधून का नाही काढली? याचाच अर्थ अंध व्यक्तींचे दुःख फक्त तेच समजू शकतात, जे अंध आहेत. वयाच्या आठव्या वर्षी अंध झालेला डेव्हिड हार्टमन जिद्दीने डॉक्टर होतो. भारतातील प्रांजल पाटील अंध असून एकदा नाहीतर दोनदा केंद्रीय लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण होते. समाजात अशा अनेक व्यक्ती आहेत, ज्यांनी डोळे नसतानाही समाजात आदर्श निर्माण केला. Special Blog on World Eye Donation Day

डोळ्यांचे महत्त्व आपण समजतो आणि त्याची त्या पद्धतीने आपण काळजी घेत असतो; परंतु आपल्यापैकी खूप कमी जण असतील जे आपल्यासोबत इतरांचाही  विचार करत असतील. आपले डोळे फक्त रोशनी देत नाहीत तर आपल्या मृत्यूनंतर कोणाच्या तरी जीवनात अंधार दूर करून प्रकाश निर्माण करू शकतात; परंतु जेव्हा डोळे दान करण्याची वेळ येते तेव्हा खूप लोक मागे होतात. डोळे दान करण्यास घाबरतात, त्याबाबत अंधश्रद्धा बाळगतात. डोळे दान केल्यानंतर पुढच्या जन्मात आपण नेत्रहीन जन्माला येऊ, अशी अंधश्रद्धा बाळगतात. अशा भेकड अंधश्रद्धा बाळगल्यामुळे दरवर्षी अनेक अंध लोक जीवनभर डोळ्यांवाचून अंधारात राहतात. 

जागतिक आरोग्य संघटनेच्या १९५३ च्या पाहणीत साडेसहा कोटी लोक अंधत्वामुळे अपंग असलेले आढळले. जगातील कित्येक अविकसित देशांतील नोंदीमधील उणिवा लक्षात घेता ही संख्या चौदा कोटींपर्यंत जाते, असा एक अंदाज आहे. मध्यपूर्व आणि अतिपूर्व देशात अंध असणाऱ्यांची संख्या सर्वात जास्त आहे. Special Blog on World Eye Donation Day

सर्वमान्य अशी अंधत्वाची व्याख्या अजूनही निश्चित नाही आहे, त्यामुळे अंधांची नेमकी संख्या किती याचा अंदाज करणे कठीण आहे.  भारतात कायद्याने माणसाच्या मृत्यूनंतर नेत्रदान करण्याची परवानगी आहे; परंतु असे असले तरी वयाची एक वर्ष पूर्ण झालेली कोणतीही व्यक्ती नेत्रदान करू शकते.  आपल्या मृत्युपत्रात नेत्रदानाची इच्छा व्यक्त केलेली व्यक्ती नेत्रदान करू शकते. नेत्रदानाची प्रक्रिया ही मृत्यूच्या काही तासांनंतर म्हणजेच अर्ध्या तासात लगेच केली जाते आणि यामध्ये आणि कोणतीही समस्या उद्भवत नाही.

मृत्यू झालेल्या व्यक्तींचे नेत्र अंध व्यक्तीला दिले जातात आणि आपणासही एखाद्याचे आयुष्य उजळवायचे असेल तर आपण जवळच्या रुग्णालयात संपर्क साधून नेत्रदानासाठी नोंदणी करू शकतो. एखाद्याच्या जगात प्रकाश पसरवण्यासाठी एक पाऊल नक्कीच पुढे टाकू शकतो. आपल्यापश्चात हे जग कुणी तरी पाहते ही कल्पनाच मुळात सुखावणारी आहे. Special Blog on World Eye Donation Day

तुझ्यानंतरही डोळ्यांचे असणे..! 
तुझ्या डोळ्याने हे मनभर जगणे.. 
मी होतो अंधकाराच्या खाईत 
आता माझे सुखकर झाले असणे 

अशा भावना दुसऱ्याचे डोळे मिळवून हे जग पाहणाऱ्या त्या प्रत्येकाची झाल्याशिवाय राहणार नाही.  भारत सरकारने नेत्र पुन्हा गरजूला मिळावे म्हणून अनेक योजना हाती घेतल्या आहेत. केंद्र सरकार पुरस्कृत दृष्टीविकार प्रतिबंधक आणि अंधत्व नियंत्रण कार्यक्रमासाठी अनेक नेत्रपेढ्या व नेत्र पथके कार्यरत आहेत. त्याचा खूप मोठा आराखडा केंद्र आणि राज्य सरकारच्या आरोग्य विभागाच्या वेबसाईटवर उपलब्ध आहे. Special Blog on World Eye Donation Day

नेत्रदान कोण करू शकते? 

• नेत्रदान फक्त मृत्यू झालेली व्यक्ती करू शकते. 

• बालकांपासून ते वृद्धांपर्यंत कोणीही करू शकते. 

• चष्मा असलेली व्यक्तीसुद्धा करू शकते. 

• मधुमेह, ब्लड प्रेशर, दमा इत्यादी विकार असलेली व्यक्तीही करू शकते. 

• मोतीबिंदू शस्त्रक्रिया झालेली व्यक्तीही नेत्रदान करू शकते. 

नेत्रदान कोण करू शकत नाही? 

• एड्स असणारी व्यक्ती 

• लिव्हरचे आजार असणारी व्यक्ती 

• रक्तात जंतूंचा प्रभाव असणारी व्यक्ती 

• ब्लड कॅन्सरचे रुग्ण 

नेत्रदानामुळे दृष्टी मिळालेल्या अनेक व्यक्ती आज समाजात ताठ मानेने, सन्मानाने आणि डोळसपणे वावरत आहेत. नेत्रदान केल्यामुळे अनेक जण दृष्टिहीन आहेत त्यांच्या जीवनाला नवी दृष्टी प्राप्त होत आहे. नेहमीच आपण वेगवेगळ्या दानाबद्दल ऐकत असतो; परंतु नेत्रदान करण्याबाबत अनेक जणांमध्ये उदासीनता दिसून येते. 

नेत्रदानासारखे कुठलेही पवित्र दान नाही. त्यामुळे नेत्रदान केले तर आपण नक्कीच एका सामाजिक कार्यात आपल्यातर्फे हातभार लावू शकतो. आपल्यामुळे नक्कीच एखाद्या अंधार असलेल्याच्या जीवनात प्रकाश निर्माण करू शकतो. नेत्रदान करण्याचा निर्णय आजच घ्या आणि तुमच्यापश्चात हे सुंदर जग तुमच्या डोळ्याने कुणालातरी पाहू द्या..! 
....मरावे परि नेत्ररुपी उरावे! 

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com