लाल झंझावताचा एनकाउंटर अन् नक्षल चळवळीचा इतिहास !

नक्षलवादी.....हा शब्द उच्चारताच डोळ्यापुढे येतो तो हातात बंदूक घेतलेली आणि हिरवा पोशाख परिधान केलेली व्यक्ती.
लाल झंझावताचा एनकाउंटर अन् नक्षल चळवळीचा इतिहास !
लाल झंझावताचा एनकाउंटर अन् नक्षल चळवळीचा इतिहास !Saam TV

नक्षलवादी.....हा शब्द उच्चारताच डोळ्यापुढे येतो तो हातात बंदूक घेतलेली आणि हिरवा पोशाख परिधान केलेली व्यक्ती. हातात बंदूक घेतली म्हणजे, सारे जग आपल्या पायाशी लोळेल, अशी भाबडी समजूत करून घेत दिशाभूल झालेले हजारो तरुण-तरुणी या बेकायदेशीर चळवळीचे सैनिक म्हणून जंगलात भटकत आहेत. पश्चिम बंगालच्या नक्षलबारी येथे चारू मुजुमदार यांनी जमीनदारांच्या विरोधात संघर्ष उभा करून मोठे आंदोलन उदयास आणले. या आंदोलनात नक्षलबारीचे पीडित मोठ्या प्रमाणात सहभागी झाले. तिथूनच नक्षलवादी हा शब्द रूढ झाला. प्रारंभी साम्यवादाचा विचार मांडत जमीनदारांच्या विरोधात उभी ठाकलेली ही संघटना वेगळ्या मार्गावर जात राहिली आणि पुढे जाऊन तिचे स्वरूप बदलत गेले. पश्चिम बंगालमधून बाहेर पडत ही चळवळ झारखंड, बिहार, छत्तीसगड, मध्यप्रदेश, ओडिशा, आंध्रप्रदेश अशा राज्यात प्रसारित झाली खरी, पण ती सशस्त्र होत गेली आणि भरकटली. बंदुकीच्या बळावर अन्याय दूर करायचा, असा अघोरी विचार घेऊन ही चळवळ फोफावत गेली. आजघडीला ही चळवळ 11 राज्यातील 90 जिल्ह्यात सक्रिय आहे. प्रत्येक राज्यातील स्थानिक प्रश्नांवरील असंतोषाला आपल्या नेतृत्वाची झालर चढवायची आणि तरुण-तरुणींना चळवळीत ओढायचा नक्षल्यांचा डाव यशस्वी होत गेला.

महाराष्ट्रात या चळवळीने काही स्थानिक प्रश्न घेऊन प्रवेश केला. 80 च्या दशकात ही चळवळ गडचिरोली, गोंदिया आणि राज्याला लागलेल्या छत्तीसगडच्या सीमावर्ती भागात पाय पसरायला लागली. त्याची सुरुवात शंकर अण्णा नावाच्या नक्षल्याने केली. गडचिरोली जिल्ह्यातील दक्षिण भागात म्हणजे सिरोंचा आणि अहेरी भागात त्याने सुरुवातीला पाय ठेवला. त्याला सक्रिय मदत करणारे मोठे नेते आंध्रप्रदेश-महाराष्ट्राच्या सीमेवर कार्यरत होते. यात किशन जी, गणपती, तिरुपती यासारख्या मोठ्या नेत्यांचा समावेश होता. शंकर अण्णा चकमकीत ठार झाल्यानंतर सूरन्नाने सूत्रे हाती घेतली. आणि त्याला आणि चळवळीला मोठे करण्यासाठी किशन जीसह इतरही मोठे नेते आंध्रप्रदेशची सीमा ओलांडून महाराष्ट्रात आले. चळवळ पाय पसरत असतानाच 1990 च्या सुमारास नर्मदाक्का नावाच्या एका तरुण महिला नक्षलीने येथे प्रवेश केला. त्यानंतर सुरन्ना आणि नर्मदाक्काने झपाटल्यागत कामाला सुरुवात केली. त्यावेळी तेंदूपत्ता (ज्याला विडीपत्ता असेही म्हणतात) ठेकदारांकडून स्थानिक मजुरांना दिली जाणारी मजुरी अत्यल्प होती. सोबतच निरक्षर-निर्धन आदिवासींवर होणारे अत्याचार, हे दोन मुद्दे घेऊन ही चळवळ येथे सक्रिय झाली. या प्रश्नांवरून आदिवासींची दिशाभूल करीत त्यांना हिंसक चळवळीत सहभागी करण्याचा यशस्वी प्रयत्न येथे झाला. बंदुकीच्या भीतीमुळे गावकऱ्यांची साथ मिळू लागली, तर दुसरीकडे बंदुकीच्या ग्लॅमरला भाळून शेकडो नवतरुण चळवळीत सहभागी होऊ लागले. ज्या भागात विकासाचा पत्ता नाही, रोजगाराचे साधन नाही, अशा भागातून तरुण-तरुणी चळवळीकडे आकर्षिले गेले. मुळात, या भागात विकास पोचू नये, यासाठीच चळवळ सक्रिय होती की काय, असा प्रश्न पडतो. स्थानिक आदिवासींना विकासापासून दूर ठेवण्यातच आपले भले आहे, हे लक्षात आल्यामुळेच नक्षलवादी रस्ते-पूल निर्मितीला विरोध करू लागले. प्रसंगी हिंसा घडवली जाऊ लागली. यामुळेच गडचिरोली जिल्ह्यातील अनेक गावांत अजूनही एसटी बस पोचू शकलेली नाही. माओवाद्यांनी ही चळवळ येथे उभी करताना केवळ लाल दहशतीचे वातावरणच तयार केले नाही, तर याच दहशतीच्या बळावर चळवळीला आर्थिक संपन्न करण्यासाठी प्रयत्न सुरू झाले. याचाच एक भाग म्हणजे खंडणी. तेंदूपत्ता आणि बांबू कंत्राटदार, रस्ता-इमारत बांधकाम कंत्राटदार यांच्याकडून मोठ्या रकमेची खंडणी घेतली जाऊ लागली. हीच प्रथा आजही सुरू आहे. कामे करण्यासाठी आणि जीव वाचवण्यासाठी ही खंडणी दिली जाऊ लागली. या खंडणीचे स्वरूप आज कोट्यवधींमध्ये आहे.

कम्युनिस्ट (माओवादी) पार्टीच्या सर्वोच्च अशा केंद्रीय समितीचा सदस्य आणि जहाल नक्षली सह्याद्री उर्फ मिलिंद तेलतुंबडे याचा चकमकीत खात्मा झाल्यानंतर नक्षल चळवळ खिळखिळी झाल्याच्या चर्चेने जोर पकडलाय. एखाद्या चळवळीतीळ मोठे नेते जेव्हा केव्हा मारले जातात किंवा अटकेत जातात, तेव्हा त्या चळवळीवर जबरदस्त आघात होत असतो. हादरा बसत असतो. मिलिंद हा तर महाराष्ट्र, मध्यप्रदेश-छत्तीसगड या तीन राज्यांचा प्रमुख होता. अनेक सशस्त्र कारवाया त्याने यशस्वी केल्या, त्याचे नियोजन केले. 2019 मध्ये नर्मदाक्का पतीसोबत पकडली गेल्यानंतर सर्व जबाबदारी मिलिंदवर आली होती. तो शहर आणि जंगल या दोहोतील महत्त्वाचा दुवा होता. महाराष्ट्रात ही चळवळ प्रसारित करण्यात त्याचे एकट्याचे फार मोठे योगदान होते. शहरी नक्षलवाद रुजवण्यात त्याचा मोठा वाटा आहे. कोरेगाव भीमा दंगलीत त्याचे नाव समोर आल्यावर तो महाराष्ट्रात कशा पद्धतीने कार्यरत आहे, हे दिसून आले होते. डाव्या विचारांचे बुद्धिवंत, समविचारी विद्यार्थी आणि युवक संघटना, शासकीय-निमशासकीय कर्मचारी अशा विविध गटांत त्याने माओवादी विचारांची यशस्वी पेरणी केल्याचेही दिसून आले. तोच आता चकमकीत मारला गेल्याने, स्वाभाविकपणे चळवळीचे मोठे नुकसान झाले आहे. मिलिंदच्या ठार होण्याने चळवळ चुटकीसरशी गतप्राण होईल, असे नाही. पोलिसांनाही ते कळते. पण एखादा कर्ता माणूस किंवा नेतृत्व हरवल्यावर घर किंवा चळवळ जशी, दिशाहीन होते, तसे काहीसे नक्षल चळवळीचे आता होऊ शकते. त्यातच मिलिंद तेलतुंबडेची जागा घेऊ शकणारा दुसरा प्रभावी नेता नक्षल्यांकडे सध्या नसल्याने, उपरोक्त शक्यतेला मोठी बळकटी मिळते.

मिलिंद तेलतुंबडे असो किंवा नर्मदाक्का, अशा मोठ्या नेत्यांना मारून किंवा अटक करून गडचिरोली पोलिसांनी नक्षल चळवळीचे कंबरडे मोडले आहे. गेल्या आठ-दहा वर्षांत नक्षल्यांनी स्थानिकांत पेरलेल्या विखारी विचारांचा प्रभाव कमी करून, त्यांना मुख्य प्रवाहात आणण्याचा प्रभावी उपाय शासन आणि प्रशासन करीत आहे. दुर्गम आणि अतिदुर्गम भागात पोलीस संरक्षणात रस्ते-पूल निर्मितीची कामे केली जात आहेत. प्रशासन गावापर्यंत पोचू लागले आहे. जनजागरण मेळाव्यांच्या माध्यमातून प्रशासन गावाचे प्रश्न जागेवर सोडवू लागले. शेतकऱ्यांना सातबारा, रेशनकार्ड, रोजगार प्रशिक्षण, शैक्षणिक उपक्रम आदींचा लाभ दिला जात आहे. सोबतच केंद्रीय पोलीस दले तैनात झाल्याने या भागातील गस्त वाढली, नक्षल्यांवर एक मानसिक दबाव निर्माण करण्यात पोलीस यशस्वी झाले आहेत. परिणामी, स्थानिकांना आता आपली दिशाभूल झाल्याचे लक्षात येऊ लागले. अलीकडे राज्यातील-देशातील सामाजिक संघटनाही आदिवासींच्या प्रबोधनासाठी आणि मदतीसाठी या भागात येऊ लागल्या.

या चळवळीला खिळखिळी करण्यात सर्वात महत्त्वाचे योगदान कुणाचे असेल, तर ते गडचिरोलीच्या सी-60 या पोलिस पथकाचे. 1992 मध्ये गडचिरोलीत या विशेष कृती दलाची स्थापना करण्यात आली. यात स्थानिक आदिवासी युवकांना भरती करण्याचे धोरण ठरवण्यात आले. या युवकांना स्थानिक भाषा, भौगोलिक स्थिती आणि परिसराची माहिती अवगत होती. त्यांना गनिमी काव्याचे प्रशिक्षण दिल्यावर हे पथक नक्षल्यांचे कर्दनकाळ म्हणून नावारूपास आले. ग्यारापत्ती येथे मिलिंद तेलतुंबडे याच्यासह 27 जणांचा खात्मा असो किंवा इतर कोणत्याही मोठ्या सशस्त्र मोहिमा असो, याच दलाने त्या फत्ते केल्या. योग्य खबऱ्यांचे जाळे त्यांनी तयार केले. आता तर सॅटेलाईट फोनचे जाळे, केंद्रीय पोलिसांचे पाठबळ, वाढलेली गस्त आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे नक्षल्यांकडे असलेला शस्त्रांचा तुटवडा यामुळे नक्षल चळवळ या भागात शेवटचे ओचके देत आहे, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.

Edited By: Pravin Dhamale

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com