बूलबल वादळाचे आतापर्यंत 10 बळी

सकाळ न्यूज नेटवर्क
सोमवार, 11 नोव्हेंबर 2019


बांगलादेशात ‘बुलबुल’ चक्रीवादळामुळे दहा जणांचा मृत्यू झाला असून, १५ जण जखमी झाले आहेत. रविवारी सकाळी हे चक्रीवादळ बांगलादेशच्या किनारपट्टीला १२० कि.मी. प्रतितास वेगाने धडकले. तत्पूर्वी, किनारपट्टीलगतच्या २१ लाख जणांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले असल्याची माहिती बांगलादेशचे कनिष्ठ आपत्ती व्यवस्थापन मंत्री इनामूर रहमान यांनी दिली. मृतांमधील सहा जणांचा मृत्यू हा अंगावर झाड कोसळून झाला, तर वादळात अडकल्याने एका महिलेचा मृत्यू झाल्याचे अधिकाऱ्यांनी या वेळी सांगितले.
 

बक्‍खाली - बुलबुल चक्रीवादळाने पश्‍चिम बंगालला मोठा तडाखा दिला असून, २४ परगणा जिल्ह्यातील किनारपट्टीच्या भागात प्रचंड नुकसान झाले आहे.
ओडिशात नऊ जणांचा मृत्यू; चक्रीवादळ तीव्र होणार  
कोलकता - ओडिशा आणि पश्‍चिम बंगालच्या तटवर्ती भागात निर्माण झालेल्या ‘बुलबुल’ चक्रीवादळामुळे कोलकत्यामध्ये सोसाट्याचा वारा आणि मुसळधार पाऊस पडत आहे. शनिवारपासून कोलकता आणि २४ उत्तर परगणामध्ये वादळामुळे कमीत कमी सात जण ठार झाले, तर ओडिशात दोघांचा मृत्यू झाल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.

कोलकता येथे झाड कोसळून एकाचा मृत्यू झाला, तर २४ उत्तर परगणा भागात झाड अंगावर कोसळल्याने ३ जणांचा, शॉक लागल्याने एकाचा मृत्यू झाला असून, भिंत कोसळल्याने दोन जणांचा मृत्यू झाल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. तर, ओडिशात दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोघांचा मृत्यू झाल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.

हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, हे वादळ सुंदरबनला पार करीत उत्तर-पूर्व भारताकडे वळले आहे. त्यामुळे पुढील तीन तास या वादळाचा प्रभाव वाढण्याची शक्‍यता आहे. त्यानंतर हे वादळ थोडे कमकुवत होण्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. शनिवारी सायंकाळी पश्‍चिम आणि पूर्व मिदनापोर, दक्षिण आणि उत्तर परगणा जिल्ह्यांमध्ये वाऱ्याचा वेग ताशी ८० ते ९० किमी इतका होता. तो आज (ता. १०) ताशी १२० ते १३० इतका वाढण्याची शक्‍यता असल्याचे हवामान खात्याने म्हटले आहे.

‘बुलबुल’ वादळामुळे कोलकता विमानतळावरील संचालनही १२ तासांसाठी बंद करण्यात आले. रविवारी सकाळी ६ वाजेपर्यंत विमान वाहतूक बंद होती. याशिवाय, किनारपट्टी भागातील एक लाखापेक्षा अधिक नागरिकांना सुरक्षितस्थळी हलविण्यात आले आहे.

चक्रीवादळ ‘बुलबुल’च्या पार्श्‍वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांनी पश्‍चिम बंगालमधील परिस्थितीसंदर्भात मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्याशी संवाद साधला. तसेच, ममता बॅनर्जी यांना केंद्राकडून सर्वतोपरी मदत करण्याचे आश्‍वासन त्यांनी या वेळी दिले.

Web Title: Bulbul storm west bengal


संबंधित बातम्या

Saam TV Live