चंद्रकांत पाटील अडकणार मतदारसंघात....

चंद्रकांत पाटील अडकणार मतदारसंघात....


भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी कोथरूड मतदारसंघातून निवडणूक लढविण्याचे ठरविल्यानंतर, त्यांच्याविरोधात पक्षांतर्गत नाराजी उफाळून आली असतानाच त्यांच्याविरोधात सर्व पक्षीय विरोधकांकडून सामाजिक कार्यकर्ते विश्‍वंभर चौधरी यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरविण्याची तयारी सुरू केली आहे. त्यामुळे, पुण्यातील कोथरूड मतदारसंघातील लढत राज्यात सर्वांत महत्त्वाची लक्षवेधी ठरेल. 

हा मतदारसंघ तसा भाजपचा बालेकिल्ला. पक्षाची उमेदवारी मिळाली की आमदार म्हणून विधानसभेत प्रवेशाची निश्‍चिती. पण, या सेफ मतदारसंघात पाटील यांची उमेदवारी जाहीर होताच भाजपमधील नाराजी उफाळून आली. विद्यमान आमदार मेधा कुलकर्णी यांची समजूत पक्षश्रेष्ठी घालत असतानाच, सलग दुसऱ्यांदा संधी हुकलेले मुरलीधर मोहोळ यांचीही नाराजी दूर करावी लागणार आहे. 

होय, मी गुन्हा केलाय म्हणणारे खडसे संपले की संपविले?

पाटील हे पुण्याबाहेरचे उमेदवार असल्याचा प्रचार सुरू झाल्यानंतर, तसे फलकही मतदारसंघात झळकले. त्यामुळे, पाटील यांनी काल सायंकाळी ट्विट करून, ते पुण्याचे जावई असल्याचे सांगितले. गेले बारा वर्षे ते पुणे पदवीधर मतदारसंघाचे पालकमंत्री आहेत, पुण्यात त्यांचे घर आहे, गेले तीन महिने ते पुण्याचे पालकमंत्री आहेत, असे सांगत त्यांनी खुलासे केले. 

पक्षांतर्गत नाराजीचे दुसरे कारण म्हणजे, पाटील पुण्यातून निवडून आल्यास, ते पुण्याचे पालकमंत्री होणार. त्यामुळे, स्थानिक नेतृत्व आपोआपच डावलले जाणार आहे. दुसऱ्या बाजूला पूर्वीचा शिवाजीनगर आणि सध्याच्या कोथरूड मतदारसंघाचे शिवसेनेने 25 वर्षे प्रतिनिधीत्व केले. 2014 मध्ये भाजपने पुण्यातील आठही जागा जिंकल्यानंतर, आता या निवडणुकीतही युतीमध्ये पुण्यातील एकही जागा शिवसेनेच्या वाट्याला आली नाही. त्यामुळे शिवसैनिक नाराज आहेत. त्याचा फटकाही भाजपला सर्वच मतदारसंघात थोड्याफार प्रमाणात बसणार आहे. 

पुण्यातील शिवसैनिकांनी केवळ सतरंज्या उचलायच्या का? 

दुसऱ्या बाजूला कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेस या पक्षांकडेही कोथरुडमध्ये सक्षम उमेदवार नाही. त्यामुळे, आघाडीच्या जागा वाटपात ही जागा राजू शेट्टी यांच्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेला सोडण्यात आली. शेट्टी यांनी पाटील यांच्या विरोधात तगडी लढत देण्याचे गेल्या आठवड्यात कोल्हापूरात जाहीर केले होते. पाटील यांनी कोल्हापूरातून जागा मिळविण्यासाठी गेले वर्षभर आटापिटा केला. मात्र, शिवसेनेने तेथे त्यांनी डाळ शिजू दिली नाही. त्यामुळे, पाटील हे कोल्हापूरातून पुण्यात स्थलांतरीत झाले. 

शेट्टी यांनी सामाजिक कार्यकर्ते विश्‍वंभर चौधरी यांना त्यांच्या पक्षाकडून निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची विनंती केली. चौधरी यांचे सामाजिक चळवळीतील अनेक संस्था संघटनांशी संबंध आहेत. त्यांच्याशी त्यांनी चर्चा केल्यानंतर, सर्वांनी त्यांना अपक्ष लढण्याची सुचना केली. 

मुख्यमंत्री फडणवीस यांचे विश्वासू बंडखोरीच्या तयारीत

चौधरी या संदर्भात ई सकाळशी बोलताना म्हणाले, "शेट्टी यांनी संपर्क साधल्यानंतर, मी सामाजिक चळवळीतील सहकाऱ्यांशी चर्चा केली. विरोधी पक्षांनी पाठिंबा दिल्यास, मी अपक्ष उमेदवार म्हणून निवडणुकीच्या रिंगणात उतरण्यास तयार असल्याचे त्यांना कळविले आहे. त्यामुळे, आघाडीचे नेते काय निर्णय घेतात, त्यावर ते अवलंबून राहील.' 

कोथरूडमध्ये थेट लढत झाल्यास, पाटील यांना निवडून येण्यासाठी खूप परीश्रम घ्यावे लागतील. पक्षांतर्गत नाराजी, मित्रपक्षाचा विरोध, मतदारसंघाबाहेरील असल्याचा प्रचार याबरोबरच सर्व विरोधी पक्ष आणि सामाजिक संघटनांकडून विरोधी उमेदवाराला मिळणारा पाठिंबा अशा बाबींमुळे पाटील यांना मतदारसंघात अडकून पडावे लागणार आहे. 


Web Title: Chandrakant patil will be limited for his constituency kothrud article by dnyaneshwar Bijale

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com