गणेशोत्सवानिमित्त करण्यात आला वाहतुकीत बदल 

 गणेशोत्सवानिमित्त करण्यात आला वाहतुकीत बदल 


पुणे - गणेशोत्सवासाठी मूर्ती खरेदी व प्रतिष्ठापनेच्या कार्यक्रमानिमित्त रविवारी (ता.१) व सोमवारी (ता.२) शहराच्या मध्यवस्तीमधील काही भागामध्ये वाहतुकीत बदल केला आहे. त्यामुळे चालकांनी पर्यायी मार्गांचा वापर करावा, असे आवाहन वाहतूक शाखेने केले आहे.

गणेशमूर्ती विक्रीचे बहुतांश स्टॉल्स हे डेंगळे ते शिवाजी पुलादरम्यान, पालिकेजवळील श्रमिक भवनासमोरील अण्णा भाऊ साठे चौक, शनिवारवाड्याजवळील कसबा पेठ चौकी ते जिजामाता चौक, मंडईपर्यंत रस्त्याच्या दुतर्फा आहेत. त्यामुळे कोंडी होऊन चालकांची व भाविकांची गैरसोय होऊ शकते. 

दुसऱ्या दिवशी प्रतिष्ठापनेवेळी कोंडी होण्याची शक्‍यता असल्यामुळे वाहतुकीमध्ये तात्पुरता बदल केला आहे, असे वाहतूक शाखेचे पोलिस उपायुक्त पंकज देशमुख यांनी सांगितले.

बंद रस्ते व पर्यायी मार्ग 
शिवाजी रस्ता -
गाडगीळ पुतळा चौक ते गोटीराम भैया चौक बंद असेल. चालकांनी गाडगीळ पुतळा चौकातून डावीकडे वळण घेऊन कुंभारवेस चौक, शाहीर अमर शेख चौक मार्गे इच्छितस्थळी जावे. शिवाजीनगरकडून स्वारगेटकडे जाणाऱ्या वाहनांनी स. गो. बर्वे चौकातून डावीकडे वळण न घेता सरळ जंगली महाराज रस्त्याने खंडुजीबाबा चौक, टिळक चौकमार्गे पुढे जावे. झाशीची राणी चौक ते खुडे चौक, डेंगळे पूलमार्गे कुंभारवेसकडे जाणाऱ्या चालकांनी खुडे चौकातून पालिकेसमोरील प्रीमियम गॅरेज चौक शिवाजी पूलमार्गे गाडगीळ पुतळा चौक, डावीकडे वळून कुंभारवेस चौक या मार्गाचा वापर करावा. 

पार्किंग व्यवस्था
  कामगार पुतळा चौक ते शिवाजी पुतळादरम्यान न्यायालयाच्या एका बाजूला
  वीर संताजी घोरपडे पथावर महापालिका वीजबिल भरणा केंद्र ते गाडगीळ पुतळा या रस्त्याच्या दुतर्फा
  टिळक पूल ते भिडे पूल दरम्यानचा नदीपात्रातील रस्ता
  मंडईतील मिनर्व्हा व आर्यन पार्किंग तळ
  शाहू चौक (फडगेट चौकी चौक) ते राष्ट्रभूषण चौक - रस्त्याच्या डाव्या बाजूस


Web Title: Changes in traffic in the city for Ganeshotsava
 

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com