सर्कस नाही भो ही, याला म्हणतात, वाघाशी दोस्ती! पण आज संपलं सगळं

सर्कस नाही भो ही, याला म्हणतात, वाघाशी दोस्ती! पण आज संपलं सगळं

तीन महिने वयाची रुबाबदार "बगीरा' बालगोपाळांत चांगलीच रमली. पंधरा दिवसांच्या वास्तव्यात त्यांचा जीव की प्राण झाली.. बगीराऽऽ अशी हाक मारताच गव्हाच्या शेतातून ती उंच उंच उड्या मारत यायची. बालगोपाळांसमवेत मनसोक्त धिंगामस्ती करायची. कधी गुरगुरत पंजा उगारायची, तर कधी मायेने त्यांच्या हाता-पायांचे तळवे चाटायची.

मुले शाळेत निघाली की सोडवायला त्यांच्यासोबत काही अंतर चालायची. आपले सवंगडी घरी कधी येतात, याची सायंकाळी वाट पाहत बसायची. आईच्या प्रेमाला पारखी झालेली बगीरा आणि शिंगवे येथील चौधरी वस्तीवरील बालगोपाळ यांच्यात प्रेमाचे नाते हे असे घट्ट झाले होते. एकमेकांशिवाय करमत नव्हते. गेल्या पंधरा दिवसांत घट्ट झालेले मायेचे हे पाश आज तटातट तुटले.

  वनाधिकाऱ्यांनी बगीराला ताब्यात घेतले. छोट्याशा पिंजऱ्यात बंदिस्त झालेली बगीरा आपल्या सवंगड्यांकडे टकमक पाहत होती. तिला निरोप देताना बालगोपाळ हिरमुसले. डोळे डबडबले. गोड आठवणी मागे ठेवून बगीरा वनाधिकाऱ्यांच्या गाडीत बसून दूर निघून गेली.

माणसांचे जग तिच्यासाठी नसते. हे तिला आणि तिच्या प्रेमात पडलेल्या बालगोपाळांना ठाऊक नव्हते! 
महिनाभरापूर्वी शिंगवे परिसरातील चौधरी वस्ती परिसरात बिबट्याची मादी आपल्या पिलासह अनेकांच्या नजरेस पडायची. नंतर ती दिसेनाशी झाली.

एके दिवशी अचानक दोन-अडीच महिन्यांचा बछडा बागडत चौधरी वस्तीवरील बालगोपाळांच्या जवळ आला. वस्तीवरील लोकांनी भूतदया दाखवली. त्यांनी आनंदाने त्याचा सांभाळ केला. बालगोपाळांनी त्या बछड्याचे नाव बगीरा ठेवले.

शाळेत जाण्यापूर्वी तिला हाक मारली की ती उंच उंच उड्या मारत त्यांच्यापाशी येई. त्यांच्यासोबत मनमुराद खेळत असे. कुणाच्या अंगावरून, तर कुणाच्या खांद्यावरून उड्या मारी. कुणाचे दप्तर ओढून नेई, तर कुणाचा रुमाल पळवून नेई. मुले शाळेत गेली की ती त्यांना निरोप देऊन पुन्हा गव्हाच्या शेतात दिसेनाशी होई.

पंधरा दिवसांत चांगली धष्टपुष्ट झाली. वस्तीवरील प्रत्येकाला ती हवीहवीशी वाटू लागली. तिने सर्वांना लळा लावला. आज हे प्रेम आणि लळा संपला. 

बगीरा हे नाव दिलेले हे बिबट्याचे बछडे मादी आहे. त्याचे वय तीन ते चार महिने आहे. त्याची आई त्या भागात आता दिसत नाही, असे रहिवासी सांगतात.

आणखी चार महिन्यांत ते कदाचित हिंसक होईल. चौधरी वस्तीवरून त्याला आम्ही ताब्यात घेतले. आणखी चार-सहा महिन्यांनी त्याला जंगलात सोडले जाईल. 

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com