चीनवर अमेरिकेकडून होऊ शकतो हल्ला, चीनवर हल्ला करण्याचा ट्रम्प यांचा इरादा?

साम टीव्ही
बुधवार, 30 सप्टेंबर 2020
  • चीनवर अमेरिकेकडून होऊ शकतो हल्ला
  • चीनवर हल्ला करण्याचा ट्रम्प यांचा इरादा?
  • अमेरिकेला गृहित धरण्याची चूक नको
  • चिनी विचारवंतांचा जिनपिंग सरकारला सल्ला

अमेरिकेच्या राष्ट्रध्यक्षपदाच्या निवडणुकीपुर्वी राष्ट्रवादाचा मुद्दा उपस्थित करण्याचा ट्रम्प यांचा प्रयत्न आहे. याच प्रयत्नांचा एक भाग म्हणून अमेरिका चीनवर हल्ल्याचा प्रयत्न करेल, असा संशय युद्ध विश्लेषक व्यक्त करतायत. चीननेही हीच भीती व्यक्त केलीय.

अमेरिकेत राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीचे वारे वाहू लागलेत. गेल्या निवडणुकीत दिलेली आश्वासनं पूर्ण करण्यात ट्रम्पना अद्यापही म्हणावं तसं यश आलेलं नाहीए. त्यामुळे या निवडणुकीच्या प्रचारात राष्ट्रवादाचा मुद्दा तापवण्याचा ट्रम्प यांचा इरादा दिसतोय. त्यासाठी ट्रम्प आपल्यावर हल्ला करू शकतात, अशी भीती चीनने व्यक्त केलीय.

दक्षिण चीन समुद्रातील चिनी बेटांवर अमेरिका ड्रोन विमानांच्या सहाय्याने क्षेपणास्त्र हल्ला करू शकतो, असा दावा चिनी माध्यमांनी केलाय. दक्षिण चीन समुद्रात तैवानसोबत चीनचे सातत्याने खटके उडतायत. या संघर्षाचं निमित्त करून अमेरिका चीनवर हल्ला करू शकते. मात्र तसं दुस्साहस केल्यास अमेरिकेला त्यांच्याच शब्दांत तोडीस तोड उत्तर देऊ अशी दर्पोक्तीही चिनी सरकारचं मुखपत्र ग्लोबल टाईम्सने केलीय.

कोरोनामुळे अगोदरच सर्वच देशांच्या अर्थव्यवस्था अडचणीत आल्यात. अमेरिकाही त्याला अपवाद नाहीए. पण आंतरराष्ट्रीय पातळीवर असलेला अमेरिकी डॉलर्सचा दबदबा, अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि सर्वात मोठी बाजारपेठ या बळावर अमेरिकी अर्थव्यवस्था काही दिवसांतच सावरेल. त्यामुळे अमेरिकीची अर्थव्यवस्था कमकुवत असल्याचा गैरसमज जिनपिंग सरकारने करून घेऊ नये, असा सल्ला चिनी विचारवंतांनी दिलाय. त्यामुळे चिनी विचारवंतांचा सल्ला जिनपिंग मानणार की अतिराष्ट्रवादाला बळी पडत अमेरिकला भिडण्याची चूक करणार हे पाहणं महत्वाचं असेल.


संबंधित बातम्या

Saam TV Live