मानवी त्वचेवर 9 तास जिंवत राहू शकतो कोरोना, जगातील 10 पैकी एका व्यक्तीला कोरोना  

साम टीव्ही
मंगळवार, 6 ऑक्टोबर 2020

 

  • मानवी त्वचेवर 9 तास जिंवत राहू शकतो कोरोना 
  • संशोधकांनी पुन्हा दिला धोक्याचा इशारा 
  • जगातील 10 पैकी एका व्यक्तीला कोरोना 

कोरोनाबाबत नवनवीन माहिती समोर येतीय. आता तर मानवी त्वचेवर कोरोना 9 तास जिवंत राहू शकतो असा धक्कादायक अहवाल शास्त्रज्ञांनी दिलाय. तर WHO अर्थात जागतिक आरोग्य संघटनेनंही एक धक्कादायक माहिती दिलीय. 

कोरोनाचं समूळ उच्चाटन कधी होणार याची प्रतीक्षा साऱ्या जगाला लागलीय. पण कोरोना आपली वेगवेगळी रूपं दाखवतोय. आता तर कोरोना माणसाच्या त्वचेवर 9 तास जिवंत राहू शकतो असं धक्कादायक संशोधन समोर आलंय. कोरोनाबाबत रिसर्च करताना जपानच्या क्योटो प्रीफेक्चुरल युनिव्हर्सिटी ऑफ मेडिसिननं हा धक्कादायक दावा केलाय. वातावरण अनुकूल असेल तर कोरोना मानवी त्वचेवर 9 तास जिवंत राहू शकतो असा दावा संशोधकांनी केलाय. 

विद्यापीठाच्या म्हणण्यानुसार, या टीमनं अनेक प्राणी आणि माणसांच्या त्वचेवर कोरोना अस्तित्वाचा अभ्यास केला. त्यात माणसाच्या त्वचेवर  इन्फ्लूएंझा-A व्हायरसपेक्षा कोरोना जास्त काळ  टिकू शकतो असं लक्षात आलं..संशोधकांच्या म्हणण्यानुसार कोरोनाला रोखायचं असेल तर वारंवार हात स्वच्छ करणं हा एक उत्तम उपाय आहे.  सॅनिटायझर वापरण्यापेक्षा पाण्यानं हात धुणं नेहमीच फायदेशीर ठरते.शास्त्रज्ञांच्या पथकाने या अभ्यासात असे म्हटले आहे की वारंवार हात स्वच्छ करणे किती आवश्यक आहे हे सिद्ध करते. संशोधन पथकाच्या म्हणण्यानुसार, सॅनिटायझर वापरण्यापेक्षा पाण्यानं हात धुणे नेहमीच फायदेशीर ठरतं.

दुसरीकडे, जागतिक आरोग्य संघटनेच्या अहवालानुसार जगातील एकूण लोकसंख्येपैकी 10 टक्के लोक कोरोना व्हायरसनं संक्रमित आहेत. जगातील 10 पैकी एका व्यक्तीला कोरोनाची लागण झाल्याचा अंदाज WHOनं वर्तवलाय. यावरून जगभरातील किती लोक कोरोनाच्या विळख्यात सापडले आहेत याची कल्पना येईल. आत लस येईपर्यंत तरी प्रत्येकानं काटेकोरपणे नियम पाळायला हवेत. नाहीतर कोरोनाचा उद्रेक अटळ आहे. 


संबंधित बातम्या

Saam TV Live