VIDEO | कोरोनाच्या या काळ्या वर्षात काय घडलं काय बिघडलं? वाचा वुहानमधून आलेल्या या राक्षसाची पूर्ण गोष्ट...

साम टीव्ही
गुरुवार, 19 नोव्हेंबर 2020
  • कोरोनाचा राक्षस जन्मून वर्ष लोटलं
  • कोरोनामुळे जगाचा चेहरा-मोहरा बदलून गेला
  • तोंडाला मास्क आणि प्रत्येक क्षेत्राची मुस्कटदाबी

कोरोना... कोरोना आणि कोरोना... गेल्या वर्षभरात सर्वात जास्त वापरला गेलेला शब्द कुठला असेल तर, तो म्हणजे कोरोना. चीनमध्ये कोरोनाचा पहिला रुग्ण सापडल्याची तारीख आहे. 17 नोव्हेंबर 2019. म्हणजेच कोरोनाचा पहिला रुग्ण सापडला त्याला आता वर्ष झालंय. कोरोनाच्या या काळ्या वर्षात नेमकं काय काय घडलं.

वुहान. शिकागो ऑफ चायना. अशी ओळख मिरवणारं हे शहर. उत्साहाने धबधब्यासारखं फेसाळणारं तरूण शहर. खाण्या-पिण्याची चंगळ करणाऱ्यांचं माहेरघर. सजलेले रस्ते. लखलख चंदेरी रोषणाईनं भिजलेलं शहर. प्रत्येक दिवस इथं नवा उत्साह घेऊन उगवतो.

17 नोव्हेंबर 2019 ही तारीख उजाडली. आणि या शहराची हालचाल थांबली. कारण, कोरोनाच्या राक्षसानं वर्षभरापूर्वी याच तारखेला वुहानमध्ये जन्म घेतला आणि जगभरात झपाट्याने हातपाय पसरले. जगातील प्रत्येकाची पावलं थबकली. ही शहरं आहेत की स्मशानं असा प्रश्न पडावा, इतकी संपूर्ण दुनिया सुनसान झाली. प्रत्येकाच्या तोंडाला मास्क लावणाऱ्या कोरोनानं जगाचा चेहराच बदलून टाकला. 

कोरोनाने गिळली चालती फिरती माणसं

कोरोनामुळे जगभरात तब्बल 13 लाख 38 हजार 106 लोकांचा बळी घेतलाय. तर आपल्या भारतातील 1 लाख 30 हजार 993 लोकांना जीव गमवावा लागलाय.

व्यापाराला आर्थिक खड्डा

देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय वाहतूक बंद करण्यात आल्यामुळे त्याचा परिणाम व्यापारावर झाला. त्यामुळे जगातील प्रत्येक देशाला अब्जावधींचा आर्थिक खड्डा पडला.

लाखोंच्या नोकऱ्यांवर गदा

कोरोनामुळे सर्वच उद्योग बंद होते. त्यातून झालेल्या मोठ्या आर्थिक तोट्यामुळे अनेक ठिकाणी कामगार कपातही झाली. परिणामी भारतासह जगभरात बेरोजगारांचे तांडेच्या तांडे निर्माण झाले.

शैक्षणिक नुकसानीचं वर्ष

कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठीजगभरातील शाळा, कॉलेज, विद्यापीठं बंद करण्यात आली. ऑनलाईन शिक्षणाचा पर्याय उपलब्ध झाला, मात्र तो तितका अचूक ठरला नाही. त्यामुळे जगभरातील विद्यार्थ्यांचं मोठं आर्थिक नुकसान झालं.

शेती जिवंत... पण खिसा रिकामा

कोरोनाच्या संकटात सगळीकडे टाळेबंदी असताना शेती मात्र तग धरून होती. मात्र लॉकडाऊनमुळे शेतमाल विकण्यात मोठ्या अडचणी आल्या. निर्यात बंद असल्याने शेतमाल शेतातच कुजून गेला. त्यामुळे घाम गाळूनही बळीराजाचे खिसे रिकामेच राहिले.

जगभरातील देशांच्या तिजोऱ्या रिकाम्या

करवसुलीला मोठा ब्रेक लागल्यामुळे सरकारी तिजोऱ्यांमध्ये खडखडाट झाला. परिणामी नागरी सुविधा आणि मूलभूत कामांसाठी सरकारला आर्थिक चणचण भेडसावू लागली.

कोरोनानं जगभरात वर्षभर थयथयाट केला. आपण सर्वांनी मिळून नियमांच पालन केल्यामुळे रुग्णवाढीचं प्रमाणही दिवसागणिक घटतंय. पण म्हणून आपण इतक्यात निर्धास्त होता कामा नये. कारण तो अजून जिवंत आहे. तो आपल्याभोवती फिरतोय. आणि लस अजून आलेली नाही. त्यामुळे कोरोनाविरोधातील अर्धी लढाई जिंकल्याच्या आनंदात पुढची लढाई हारू नये यासाठी प्रत्येकानं सज्ज राहायलाच हवं. 
 


संबंधित बातम्या

Saam TV Live