कोरोनाचं घातक रूप आता महाराष्ट्रात? पुणे, सातारा, नाशिकमध्ये धोका वाढला?

साम टीव्ही
सोमवार, 21 सप्टेंबर 2020

 

  • कोरोनाचं घातक रूप आता महाराष्ट्रात?
  • कोरोना विषाणूच्या रचनेत होतोय बदल 
  • पुणे, सातारा, नाशिकमध्ये धोका वाढला?

कोरोनासंदर्भात दररोज नवनव्या बातम्या समोर येताय. कोरोना विषाणूच्या रचनेत सातत्यानं बदल होतोय. आता महाराष्ट्रातही त्याचं हे बदलतं घातक रूप दिसू लागलंय. पाहूयात कोरोना आता कोणत्या घातक रूपात आलाय. 

जगभरात कोरोना विषाणूमुळे हाहाकार माजलाय. लस शोधण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. अशातच एक चिंता वाढवणारी बाब समोर आलीय. ती म्हणजे कोरोनाचं बदलतं रूप. पुण्यातल्या तीन संस्थांनी केलेल्या अभ्यासात कोरोना विषाणूमध्ये म्युटेशन झाल्याचं आढळून आलंय. बीजे वैद्यकीय महाविद्यालय, लष्कराचं आर्म्ड फोर्सेस मेडिकल कॉलेज आणि नॅशनल सेंटर फॉर सेल्स सायन्स या तीन संस्थांनी मिळून  90 कोरोना रुग्णांतील विषाणूंचा अभ्यास केला, तेव्हा कोरोना अधिक संक्रमणीय झाल्याचं आढळून आलं. तसेच स्पाईक प्रोटीन म्हणजे विषाणूच्या बाह्य भागावरील काटेरी आवरणांची संख्या वाढल्यानं त्याची संक्रमण क्षमताही वाढलीय. 

या तीनही संस्थांनी एप्रिल ते मे दरम्यान जवळपास 90 नमुन्यांचा अभ्यास केलाय. वय, लिंग, प्रवासाचा इतिहास, लक्षणांनुसार हे नमुने घेण्यात आले. यात पुणे, सातारा, नाशिक जिल्ह्यातील नमुन्यांचा समावेश होता. यात 61 ते 80 वयोगटातील नमुन्यांमध्ये कोणताही बदल दिसून आला नाही. 

कोरोनाचं वारंवार बदलणारं रूप सर्वांसाठी घात ठरू शकतं. कारण या बदलत्या रूपासोबत आजाराची लक्षणंही बदलत जातात. सर्वात महत्वाचं म्हणजे कोरोना सातत्यानं बहुरूप्यासारखा आपलं रूप बदलत राहिला तर  लसीच्या संशोधनातही अडथळे येऊ शकतात. जे सध्या जगाला अजिबात परवडणारं नाही. 


संबंधित बातम्या

Saam TV Live