चिंताजनक! महाराष्ट्रातील कोरोना रुग्णांची संख्या 31वर
चिंताजनक! महाराष्ट्रातील कोरोना रुग्णांची संख्या 31वर
प्रमिल क्षेत्रे
रविवार, 15 मार्च 2020
आतापर्यंत 31 जणांना राज्यात कोरोनाची बाधा झाली आहे. तर सौदी अरेबिया येथील उमरा या धार्मिक यात्रेवरून भारतात परतलेल्या एका 71 वर्षीय कोरोना संशयित वृद्धाचा काल बुलडाणा येथे मृत्यू झाल्याचं नोंदवण्यात आलं आहे.
मुंबई - राज्यातील कोरोनाग्रस्तांची संख्या दिवसागणिक वाढते आहे. काल एका दिवसात राज्यात कोरोनाचे 14 नवे रुग्ण आढळल्याने खळबळ माजली आहे. राज्यात कोरोनाचा झपाट्याने फैलाव होत असून, आतापर्यंत 31 जणांना राज्यात कोरोनाची बाधा झाली आहे. तर सौदी अरेबिया येथील उमरा या धार्मिक यात्रेवरून भारतात परतलेल्या एका 71 वर्षीय कोरोना संशयित वृद्धाचा काल बुलडाणा येथे मृत्यू झाल्याचं नोंदवण्यात आलं आहे. महाराष्ट्रातील हा पहिला कोरोना बळी ठरलाय.
राज्यातील कोरोनाचा फैलाव आता मुंबईबाहेर ठाणे, कल्याण आणि नवी मुंबईतही झाल्याचं स्पष्ट झालं आहे. पुण्यात आतापर्यंत सर्वाधिक 10, पिंपरी चिंचवड आणि मुंबईमध्ये प्रत्येकी 5 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. तसंच नागपूरमध्ये 4 पॉझिटिव्ह रुग्ण असून पनवेल, कल्याण, नवी मुंबई, ठाणे, नगरमध्ये प्रत्येकी एक कोरोनाग्रस्त समोर आला आहे. याशिवाय यवतमाळमध्ये दोन कोरोनाग्रस्तांवर उपचार सुरू आहेत. देशातील सर्वाधिक कोरोनाचे रुग्ण महाराष्ट्रात आढळून आले आहेत. या रुग्णांना बरं करण्याचं आव्हान आता आरोग्य यंत्रणेसमोर उभं ठाकलंय.
महाराष्ट्रात कुठे किती रुग्ण?
मुंबई - 5 रुग्ण
पुणे - 10 रुग्ण
ठाणे - 1 रुग्ण
नवी मुंबई - 1 रुग्ण
पनवेल - 1 रुग्ण
यवतमाळ - 2 रुग्ण
नागपूर - 4 रुग्ण
अहमदनगर - 1 रुग्ण
पिंपरी चिंचवड - 5 रुग्ण
कल्याण - 1 रुग्ण
दुसरीकडे करोना व्हायरसचा वाढता प्रादुर्भाव पाहता केंद्र सरकारने , कोरोना व्हायरसची आपत्ती घोषित केली आहे. देशातील कोरोना रुग्णांची संख्या शनिवारी 105 वर पोहोचली आहे. कोरोनाग्रस्तांचा आकडा सातत्याने वाढतच आहे.
केंद्र सरकारने करोना व्हायरस ही आपत्ती घोषित केली.. तसंच करोनामुळे मृत्यू झाल्यास संबंधित कुटुंबीयांना 4 लाखांची मदत दिली जाईल, अशी घोषणा केंद्रीय गृहमंत्रालयाने केली आहे.
देशातील निम्म्याहून अधिक राज्यांनी 31 मार्चपर्यंत शाळा महाविद्यालयं बंद ठेवण्याचे आदेश दिलेत. महाराष्ट्रात शाळा, कॉलेजेससोबत मॉल्सही बंद ठेवण्याचे आदेश दिले गेलेत. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे भारताने सर्व आंतरराष्ट्रीय सीमा बंद करण्याचा निर्णय घेतलाय. पाकिस्तान, बांगलादेश, नेपाळ, भूतान आणि म्यानमार सीमेवरील प्रवासी वाहतूक आजपासून बंद करण्यात आली आहे.