सीरम इन्स्टिट्यूटच्या आगीतून संशयाचा धूर? कोरोना लशी सुरक्षित, पण आगीचं कारण काय?वाचा सविस्तर

साम टीव्ही
शनिवार, 23 जानेवारी 2021
  • सीरम इन्स्टिट्यूटच्या आगीतून संशयाचा धूर?
  • महत्त्वाच्या ठिकाणी आग लागतेच कशी?
  • कोरोना लशी सुरक्षित, पण आगीचं कारण काय?

सीरम इन्स्टिट्यूटमध्ये लागलेली आग विझली असली तरी, कोरोनासारख्या जागतिक आजारावर लस बनलेल्या ठिकाणी आग लागल्याने, अनेक प्रश्चांचं कोंडाळं उभं राहिलंय. लस सुरक्षित असली तरी, आगीची कारणं नेमकी काय? असा प्रश्न उरतोच.

उरात धडकी भरवणारे धुराचे लोळ आणि संपूर्ण आसमंत काळवंडलेला. हे चित्र काल पुण्यातील मांजरीत निर्माण झालं होतं. आभाळाकडे झेपावणारा हा धूर कुठल्या झोपडपट्टी किंवा केमिकल कंपनीच्या आगीतून निघालेला नाहीय. तर ही आग आहे सीरम इन्स्टिट्यूटमधली. हे तेच इन्स्टिट्यूट, जिथं कोरोनाच्या संकटात होलपडणाऱ्या जगाला बाहेर काढणारी लस बनली, त्याच सीरमच्या प्लांट मध्ये हा आगडोंब उसळला. ही आग लागली आणि क्षणार्धात संपूर्ण प्लांटच आगीच्या विळख्यात सापडला. त्यामुळे, तर्क-वितर्कांना उधाण आलंय. कोरोनावरील लशीमुळे भारतासह अवघ्या जगाचं लक्ष लागलेल्या सीरम इन्स्टिट्यूटने याबाबत काय म्हटलंय पाहूयात.

सीरमच्या स्थापनेपासून म्हणजे, 1966 पासून आतापर्यंत संस्थेत किरकोळ आगीच्या घटना घडल्यात. मात्र, एवढी भीषण आग पहिल्यांदाच लागली असल्याचं समोर आलंय. तेही कोरोनाची लस बनवल्यानंतर अवघ्या काही महिन्यांतच आगीचा हा भडका उडालाय. त्यामुळेच ही आग, घातपात की निव्वळ दुर्घटना, यावर आता चर्चा सुरु झाल्यायत.

 सीरमच्या आगीबाबतचे प्रश्न?

सीरम इन्स्टिट्यूटमध्ये आग प्रतिरोधक यंत्रणा कार्यान्वित केली होती का? असा प्रश्न आता विचारला जातोय. त्याचसोबत, ही आग कमी वेळात इतकी कशी भडकली? असाही सवाल अनेकांनी विचारलाय. महत्त्वाचं म्हणजे, आगीने कमी वेळात संपूर्ण मजला कसा व्यापला? असाही प्रश्न अनेकांना पडलाय.

सीरम इन्स्टिट्यूटमध्ये आग भडकली, त्यात पाच जणांचा होरपळून बळी गेलाय. त्याचसोबत जीवघेण्या आगीच्या कचाट्यातून अनेक मजुरांना बाहेरही काढण्यात आलंय. या आगीतून ज्यांना वाचवण्यात आलंय त्यांनी सांगितलेला अनुभव अंगाचा थरकाप उडवणारा आहे.

आगीतून वाचलेल्या कर्मचारी म्हणातात...

गेल्या काही महिन्यांपासून संपूर्ण जगाचे लक्ष सीरमच्या कोव्हिशील्ड या कोरोना प्रतिबंधक लशीकडे लागले होते. त्यात 12 जानेवारीपासून संपूर्ण देशभरात या लशीचं वितरणही सुरू झालय. खरंतर, ही आग जिथं लागली तिथं कोरोनाची लस बनवण्यात येत नव्हती आणि तिथं कोरोना लशींचा साठाही नव्हता, असं सीरम इन्स्टिट्यूटने स्पष्ट केलंय. त्याचसोबत, कोरोनाच्या लशी सुरक्षित असल्याचा निर्वाळाही देण्यात आलाय. मात्र तरीही, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिथं लस बनली, त्या अत्यंत महत्त्वाच्या ठिकाणी आग लागलीच कशी? हा महत्त्वाचा प्रश्न उभा राहिलाय. त्यामुळेच, एकीकडे लसीचे वितरण आणि ही आगडोंबाची घटना, यांचाही काही संबंध आहे का, यादृष्टीने तपासाची चक्रे फिरू लागली आहेत. या तपासातून काय समोर येतं, याकडेच सर्वांचे डोळे लागलेयत.


संबंधित बातम्या

Saam TV Live