आशिया खंडातली सर्वात मोठ्या महापालिकेच्या बजेटला कोरोनाची बाधा, वाचा कालच्या बजेटमध्ये काय घडलं?

SAAM TV
गुरुवार, 4 फेब्रुवारी 2021
  • महामुंबईचं 39 हजार कोटींचं महाबजेट
  • कोरोनाची मुंबईच्या बजेटला बाधा
  • कोस्टल रोड, लिंक रोडसाठी निधीचा वादा

आशिया खंडातली सर्वात मोठी महापालिका म्हणून मुंबई महापालिकेची ओळख आहे. मुंबई महापालिकेचं ३९ हजार कोटींचं बजेट सादर करण्यात आलं. कोरोना काळात महसुली उत्पन्न घटूनही गेल्या वर्षापेक्षा १६ टक्के जास्तीचा अर्थसंकल्प मांडण्यात आलाय.

देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईचा अर्थसंकल्प सादर करण्यात आला. मुंबईच्या यंदाच्या अर्थसंकल्पाला कोरोनाची बाधा झाल्याचं स्पष्ट झालंय. मुंबई  महापालिकेचं एकूण महसूली उत्पन्न 5 हजार 876 कोटींनी घटलंय. तरीही मुंबई महापालिकेनं यंदा तब्बल 39 हजार 38 कोटींचा अर्थसंकल्प सादर केला. मागच्या आर्थिक वर्षापेक्षा यंदा तब्बल 16.74 %नी अर्थसंकल्पीय तरतूद वाढवण्यात आलीय. कोरोनामुळं महापालिकेचं उत्पन्न मोठ्या प्रमाणात घटलंय.

 मुंबईकरांसाठी अतिशय महत्त्वाच्या असलेल्या कोस्टल रोडसाठी 2 हजार कोटींची तरतूद करण्यात आलीय. गोरेगाव लिंक रोडसाठी 1300 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आलीय. आरोग्य विभागासाठी 4 हजार 728 कोटींची तरतूद करण्यात आलीय.  पुढच्या 3 महिन्यांत 22 हजार शौचालयं बांधण्यात येणार आहेत.  मुंबई महापालिका हद्दीतल्या 500 स्क्वेअर फुटापर्यंतच्या घरांसाठी मालमत्ता करमाफी करण्यात आलीय. 

मालमत्ता करमाफी म्हणजे हातचलाखी असल्याचा आरोप विरोधकांनी केलाय.  मालमत्ता करातील फक्त सर्वसाधारण करमाफ करण्यात आलाय. त्यामुळं मुंबईकरांची फसवणूक असल्याचा आरोप विरोधकांनी केलाय.

मुंबईतल्या प्रकल्पग्रस्तांचं पुनर्वसन करताना आहे तिथंच पुनर्वसन असं धोरण मुंबई महापालिकेनं आखलंय. पण ज्यांचं पुनर्वसन शक्य नसेल अशा लोकांना रोख रकमेत मोबदला देण्यात येणार आहे.

मुंबईत सध्या सुरु असलेल्या प्रकल्पांसाठी विशेष निधी उभारण्यात येणार आहे. कोरोनाचा मुंबई महापालिकेच्या तिजोरीला फटका बसणार असला तरी येत्या काळात तो भरुन काढण्याचा विश्वास महापालिका आयुक्तांनी व्यक्त केलाय. तरीही येत्या काळात महापालिका उत्पन्नाची नवनवी साधनं शोधणार असल्याचा दावा करण्यात येतोय. महापालिकेनं 16 टक्क्यांचा अधिकचा अर्थसंकल्प सादर केला असला तरी जाहीर केलेल्या सर्व योजना मार्गी लावल्या जातील अशी अपेक्षा मुंबईकरांकडून व्यक्त केली जातेय.

 


संबंधित बातम्या

Saam TV Live