#coronavirusindia दादाला बाहेरही जायचंय, कोरोनाही नकोय, असं कसं चालेल दादा?

ब्युरो रिपोर्ट
बुधवार, 25 मार्च 2020

हे बघ भाऊ, बाहेर नको जाऊ या आवाहनाला हरताळ देणाऱ्यांना कोरोना झाला, तर त्याला जबाबदार कोण असेल?

मुंबई - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशात लॉकडाऊन घोषित केल्यानंतर सुद्धा मुंबईकरांना याचं हवं तसं गांभीर्य पाहायला मिळत नाहीये.. मुंबईत आज सकाळपासून दादर प्लाझा परिसरात नागरिकांची गर्दी पहायला मिळत आहे. राज्य सरकारच्या वतीनं सगळ्यांना आवाहन करण्यात आलं तरीही लोक भाजी, किराणा घेण्यासाठी गर्दी करत आहेत. खरेदीसाठी मुंबईकरांची झुंबड उडालीये. नागरिकांनी प्रशासनाच्या आदेशांची पायमल्ली केल्याचं पहायला मिळतंय.

 

ठाण्यातही दादरसारखीच स्थिती

काल संध्याकाळी संपूर्ण देश लॉकडाऊन झाल्याच्या घोषणेनंतर जवळपास सर्वभागात गोंधळ उडाला होता. लोक घराबाहेर पडली. दादरमध्ये आज जशी लोकं बाहेर पडली आहे, तशीच काल मुलुंड, ठाणे परिसरात पडली होती. खरेदी करण्यासाठी डीमार्ट बाहेर लोकांनी तोबा गर्दी केली. प्रशासनाच्या सूचनांना हरताळ फासत लोकांनी आणखी मोठी समस्या ओढावून घेणारं पाऊल उचलल्यामुळे समस्या आणखी वाढणार आहेत. त्यामुळे लोकांना खबरदारी बाळगण्याचं आवाहन आम्ही सातत्यानं करतो आहोत. घरात थांबा. भाजी, दूध, औषधं, सगळं मिळेल. फक्त गर्दी करु नका. लगेच बाजारात जाऊन महिन्याभराचं सामान घेण्याची गरज नाही आहे. थोडं धीरानं आणि शांतपणे वागा, असं आवाहन आम्ही प्रेक्षकांना करतो आहोत.

 

गर्दीचा परिणाम सांगलीत 5 रुग्ण वाढले - 

सांगलीमध्ये भाजी खरेदीसाठी लोकांनी गर्दी केलीये. सांगली शहरात आजपासून महापालिका आणि जिल्हा प्रशासनाकडून सकाळी 7 ते 11 या वेळेत 18 ठिकाणी भाजीपाला विक्री केंद्रे सुरू केली आहेत. यामध्ये भाजी खरेदीसाठी नागरिकांची झुंबड उडाली आहे. शहरात भाजी खरेदीसाठी मोठी गर्दी झाल्याने चिंतेचे वातावरण आहे. नागरिकांच्या सोयीसाठी भाजीपाला केंद्रे वेगवेगळ्या ठिकाणी सुरू केले आहेत. तरीही शहरातील मंडईत नागरिकांची झुंबड उडाली आहे. प्रशासनाने  गर्दी नं करता भाजीपाला न्यावा असं आवाहन केलंय. मात्र सकाळची गर्दी पाहिली तर सांगलीमध्ये कोरोनाचा संसर्ग व्हायला वेळ लागणार नाही अशी परिस्थिती आहे. 

 

औरंगाबादेतही लोकांना घरात बसवेना

औरंगाबादच्या जाधववाडी भाजी मार्केटमध्ये प्रचंड गर्दी झाली होती. राज्य सरकार, स्थानिक प्रशासन आणि व्यापारी महासंघाच्या वतीनं सगळ्यांना आवाहन करण्यात आलं तरीही लोक भाजी, किराणा घेण्यासाठी गर्दी करीत आहेत. शहराच्या बाहेर असलेल्या भाजी मंडईमध्ये ही गर्दी झाली, पोलिसांना ही माहिती मिळाल्यानंतर पोलीस दाखल होऊन कोरोनाचे संक्रमण होऊ नये याची काळजी घेण्याचं आवाहन केलं. त्यानंतर दुकानं बंद केली. नागरिकांची ही जीवघेणी गर्दी कधी कमी होणार असा प्रश्न आहे.

 

विदर्भाही कुणीच ऐकेना

नागपूरमध्ये नागरिकांनी किराणा दुकानांमध्ये गर्दी केलीये. किराणा दुकानं सुरू राहणार असतानाही नागरिक विनाकारण दुकानांमध्ये गर्दी करताना दिसले. प्रशासनाने गर्दी टाळण्यासाठी लॉकडाऊन जारी केलाय. मात्र आशात नागपुरकरांनी किराणाच्या दुकानात गर्दी केल्याचं चित्र पहायला मिळालं.  बुलडाण्यात भाजीपाला घेण्यासाठी नागरिकांनी बाजारात एकच गर्दी केलीय. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता गर्दी करु नका असं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलं. मात्र तरीही जीवनावश्क वस्तूंचा साठा करण्यासाठी लोकं गर्दी करत आहेत. त्यामुळे प्रशासनही हतबल झालंय..वारंवार सूचना करुनही जनतेकडून सूचनांचं पालन केलं जात नसल्याने संक्रमणाचा धोका अधिक आहे.

 

सिलिंडर घ्यायला भलीमोठी रांग - 

मुंबईच्या एन्टॉप हिल परिसरात लोकांनी गॅस खरेदीसाठी मोठी लाईन लावल्याचं चित्र आज सकाळी पाहायला मिळालं. यामुळे मोठी गर्दी झाली होती. या गर्दीमुळे कोरोनाचा संसर्ग वाढण्याचा धोकाही जास्तय. त्यामुळे लोकांना गर्दी करुनही नये आणि गर्दीच्या ठिकाणी जाणं तातडीनं बंद करावं, असं आवाहन केलं जात आहे. सिलिंडर घेण्यासाठी मोठ्या प्रमाणात लोकं संचारबंदीचा आदेश धुडकावून बाहेर पडलेत. ज्यामुळे प्रत्येकाच्याच जिवाला धोका निर्माण होण्याची शक्यताय. कांदिवली मधील गावदेवी रोडवरही गॅस सिलिंडर घेण्यासाठी लोकांनी गर्दी केली होती. त्यात भारतगॅसच्या कर्मचाऱ्यांनी घरपोच गॅस सिलिंडर देण्यास नकार दिल्याने लोकांनी एकच गर्दी केल्याची माहिती आहे.

 

दहीसरमध्ये पेट्रोलसाठी गर्दी

मुंबईमध्ये नागरीकांनी पेट्रोल भरण्यासाठी तुफान गर्दी केली आहे. दहिसरमध्ये पेट्रोल पंपावर मोठी रांग पाहिला मिळतेय. सगळ्या पंप मालकांनी दुचाकीला २०० रुपयाचं तर चारचाकी गाड्यांना ५०० रूपयांचं पेट्रोल देण्याच्या निर्णय घेण्यात आलाय.

TWEET - 

 

coronavirusindia people gatheres in large number to buy essentials marathi maharashtra


संबंधित बातम्या

Saam TV Live