अनलॉकच्या पहिल्याच दिवशी गर्दीच गर्दी! सोशल डिस्टन्सिंगचा पुरता बोजवारा 

साम टीव्ही
सोमवार, 8 जून 2020
  • अनलॉकच्या पहिल्याच दिवशी गर्दीच गर्दी ! 
  • बससाठी नोकरदारांच्या रांगाच रांगा 
  • वेस्टर्न एक्स्प्रेस वेवर ट्रॅफिक जाम 
  • सोशल डिस्टन्सिंगचा पुरता बोजवारा 

राज्यात आजपासून मिशन अनलॉकचा पुढचा टप्पा सुरू झालाय. खासगी कार्यालयं आणि मंदिरांसह बाजारपेठा आजपासून सुरू झाल्यात. पण आजच्या पहिल्याच दिवशी सोशल डिस्टन्सिंगचा पुरता फज्जा उडाल्याचं चित्र मुंबईत पाहायला मिळालं.अनलॉकच्या पहिल्याच दिवशी गर्दीच गर्दी पाहायला मिळाली. बससाठी नोकरदारांच्या रांगाच रांगा पाहायला मिळाल्या. वेस्टर्न एक्स्प्रेस वेवर ट्रॅफिक जाम झालं होतं.
 

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशभरात लॉकडाऊन करण्यात आलं होतं. मात्र, आता टप्प्याटप्प्याने लॉकडाऊन अनलॉक करण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. त्यातूनच आता सर्व कार्यालयं आणि मंदिरांसह बाजारपेठा उघडायला मुभा देण्यात आलीय. त्यामुळे अनलॉकच्या पहिल्याच दिवशी अनेक ठिकाणी गर्दीच गर्दी झाल्याचं चित्र पाहायला मिळालं. डोंबिवलीत नोकरदारांचे चांगलेच हाल झाले. लोकल बंद असल्यानं त्यांना बसची वाट पाहण्यासाठी लांबच लांब रांगा लावाव्या लागल्या. 

तर तिकडे वेस्टर्न एक्स्प्रेस वेवर वाहनांची तोबा गर्दी दिसून आली. त्यामुळे वेस्टर्न एक्स्प्रेस वे सकाळच्या टप्प्यात अक्षरशः ठप्प झाला होता. मुलुंड टोलनाक्यावरही वाहनांच्या लांबच लांब रांगा दिसून आल्या. सोमवारपासून खासगी कार्यालयं १० टक्के कर्मचाऱ्यांसह सुरू करायला परवानगी देण्यात आलीय. त्यामुळे अनेकजण आपली वाहनं घेऊन घराबाहेर पडले. त्यामुळे वेस्टर्न एक्स्प्रेस वेवर वांद्रे, कांदिवली दहिसर भागात वाहनांच्या रांगा लागल्याचं पाहायला मिळालं. सरकारनं आता हळूहळू अनलॉक करण्याचं धोरण अवलंबलं असलं तरी नागरिकांनीही थोडा संयम बाळगणं आवश्यक आहे. अन्यथा कोरोनाचा राक्षस पुन्हा उसळी मारण्याची शक्यता नाकारता येत नाही. 

 


संबंधित बातम्या

Saam TV Live