मेट्रोवरून सेना-भाजप आमने सामने

सकाळ न्यूज नेटवर्क
शुक्रवार, 21 डिसेंबर 2018

डोंबिवली - ठाणे-भिवंडी-कल्याण मेट्रोवरून शिवसेना आणि भाजपमध्ये श्रेयवाद रंगला असतानाच डोंबिवली-तळोजा मेट्रोमार्गावरून दोन्ही पक्ष आमने-सामने आल्याचे चित्र आहे. दोन्ही पक्षांनी गुरुवारी शहरात ठिकठिकाणी बॅनरबाजी करत मेट्रोचे श्रेय घेण्याचा प्रयत्न केला. मात्र बॅनरबाजीतूनही एकमेकांवर कुरघोडी करण्याचा प्रयत्न दोन्ही पक्षांकडून करण्यात आला.

डोंबिवली - ठाणे-भिवंडी-कल्याण मेट्रोवरून शिवसेना आणि भाजपमध्ये श्रेयवाद रंगला असतानाच डोंबिवली-तळोजा मेट्रोमार्गावरून दोन्ही पक्ष आमने-सामने आल्याचे चित्र आहे. दोन्ही पक्षांनी गुरुवारी शहरात ठिकठिकाणी बॅनरबाजी करत मेट्रोचे श्रेय घेण्याचा प्रयत्न केला. मात्र बॅनरबाजीतूनही एकमेकांवर कुरघोडी करण्याचा प्रयत्न दोन्ही पक्षांकडून करण्यात आला. एकमेकांचे बॅनर फाडणे, ते चोरणे, असे प्रकार सुरू असल्याने या दोन्ही पक्षांचे राजकारण खालच्या पातळीवर गेल्याची टीका विरोधकांनी केली.  कल्याणमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेत राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांनी डोंबिवलीसाठीही मेट्रोची मागणी केली. या मागणीला दुजोरा देत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी डोंबिवली-तळोजा मेट्रो प्रकल्प मंजूर केल्याचे जाहीर केले. यानंतर राज्यमंत्र्यांचे अभिनंदनपर बॅनर डोंबिवली शहरात भाजपच्या वतीने लावण्यात आले; परंतु ही बाब सेनेला काही रुचली नाही. या मेट्रो प्रकल्पासाठी खासदार श्रीकांत शिंदे यांनी आधीपासून पाठपुरावा केला होता. त्यानंतरच याला मुख्यमंत्र्यांनी मंजुरी दिली, असे शिवसेनेचे म्हणणे असून गुरुवारी सेनेने भाजपला डिवचत ‘झूठ बोले कौआ काटे’ अशा आशयाचे बॅनर झळकावले. 

सेनेचा भाजपवर निशाणा
एमएमआरडीएने सुचविलेला मेट्रोचा आराखडा आणि खासदार शिंदे यांनी यासाठी देण्यात आलेले निवेदन शिवसेनेने आपल्या बॅनरवर झळकावले आहे. तसेच भाजपची घोषणा ही फक्त श्रेय लाटण्यासाठी असून बॅनरच्या खाली ‘पब्लिक है ये सब जानती है’ असा मजकूरही प्रसिद्ध केला आहे. 

सत्ताधारी पक्षांनी डोंबिवलीकरांना मूर्ख बनविण्याचा प्रयत्न करू नये. आगामी निवडणुकांमध्ये मतदारांना आकर्षित करण्याचा हा खटाटोप आहे. आराखडा बनविताना डोंबिवलीकरांची मते जाणून घेणे सत्ताधाऱ्यांना महत्त्वाचे वाटले नाही. 
- राजेश कदम, डोंबिवली शहर अध्यक्ष, मनसे.

Web Title: Debate in shivsena & BJP on Metro


संबंधित बातम्या

Saam TV Live