कोविड योद्ध्ये कोरोनाच्या विळख्यात, डॉक्टर पोलिस, सरकारी कर्मचाऱ्यांना मृत्यूचा विळखा

साम टीव्ही
शनिवार, 19 सप्टेंबर 2020
  • कोविड योद्ध्ये कोरोनाच्या विळख्यात
  • डॉक्टर पोलिस, सरकारी कर्मचाऱ्यांना मृत्यूचा विळखा
  • चंद्रपुरात प्रसिद्ध बालरोगतज्ज्ञाचा कोरोनामुळे मृत्यू

कोरोनाचं रूप किती घातक आहे याचा वारंवार प्रत्यय येतोय. कोरोनानं कोरोना योद्ध्यांना देखील सोडलेलं नाही. कोरोनामुळे देशातील अनेक कोविड योद्ध्यांना आपला जीव गमवावा लागलाय. 

कोरोनाचं रूप किती भयानक असू शकतं याची कल्पना एव्हाना तुम्हाला आली असेलच. आता तर कोविड योद्ध्येसुद्धा कोरोनाच्या संसर्गाला बळी पडू लागलेत. चंद्रपूर जिल्ह्यातील ख्यातनाम बालरोगतज्ज्ञ डॉ. मनोहर आनंदे यांचं कोरोनानं निधन झालंय. संसर्ग झाल्यानंतर नागपूरच्या रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. मात्र कोरोनानं त्यांना सर्वांपासून हिरावन घेतलं. 

मार्च महिन्यात कोरोनानं भारतात शिरकाव केला तिथपासून ते आजतागायत कोरोना रूग्णांची संख्या वाढतच आहे. देशात सरासरी दिवसाकाठी दीड हजार लोकांचा मृत्यू होतोय. तर महाराष्ट्रात हा आकडा 350 ते 400 च्या आसपास आहे. चिंतेची बाब म्हणजे यात कोविड योद्ध्यांची संख्या वाढतीय. 

कोविड योद्ध्ये कोरोनाच्या विळख्यात
राज्यातील पोलिसांच्या मृत्यूचा आकडा 202 इतका झालाय. मुंबईत मंत्रालयातील 15 कर्मचाऱ्यांचं कोरोनानं निधन झालंय. तर इंडियन मेडिकल असोसिएशनच्या दाव्यानुसार, देशात  382 तर महाराष्ट्रात  36 डॉक्टरांचा कोरोनामुळे मृत्यू झालाय. 

मात्र जे इंडियन मेडिकल असोसिएशनचे सभासद नाहीत, त्यांची मृत्यूची नोंद नाही. याचाच अर्थ हा आकडा जास्त असू शकतो.  कोविड योद्धेच संकटात सापडल्यानं चिंता वाढलीय यावर विरोधी पक्षानेही आक्रमक पवित्रा घेतलाय. 

 संकट आल्यापासून सरकारकडून अनेक सोयी-सुविधांचे दावे केले जातायेत. मात्र वस्तुस्थिती वेगळंच चित्र दाखवतीय. सामान्य रूग्णांसोबत कोरोनाविरोधात लढा देणाऱ्यांनाही आपला जीव गमवावा लागतोय. त्यामुळे सरकारनं याकडे वेळीच लक्ष द्यायला हवं. कोरोनाला नेस्तनाबूत करण्याची सारी भिस्त कोरोना योद्ध्यांवरच आहे. त्यांच्याकडेच दुर्लक्ष झालं तर येणारा काळ आणखी कठीण असेल. 

 


संबंधित बातम्या

Saam TV Live