संगमेश्वर तालुक्यात युतीचे पालन होण्याबाबत साशंकता

संगमेश्वर तालुक्यात युतीचे पालन होण्याबाबत साशंकता

संगमेश्‍वर - वरिष्ठ पातळीवरून युतीची घोषणा झाली असली तरी संगमेश्‍वर तालुक्‍यात भाजपमध्ये यामुळे नाराजी आहे. भाजप रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघावर दावा करत आहे. संगमेश्‍वर तालुका त्यात आघाडीवर आहे. अशा स्थितीत भाजपकडून युती धर्माचे पालन होण्याबाबत साशंकता आहे. 

भाजपने कधीही ग्रामपंचायत निवडणुका मनावर घेतल्या नव्हत्या. मात्र, अडीच वर्षांपूर्वी झालेल्या ७० ग्रामपंचायतींच्या निवडणुकीत ३५ ग्रामपंचायती ताब्यात घेतल्या. पंचायत समिती, जिल्हा परिषद निवडणुकीत भाजपचा केवळ १ पं. स. सदस्य निवडून आला. मात्र, दुसऱ्या क्रमांकावर झेप घेतली. देवरूख नगरपंचायतीत सेनेला पराभूत करीत थेट नगराध्यक्ष निवडून आणला. सभागृहात मोठा पक्ष होण्याचा मान मिळवला. आपली ताकद दाखवण्यासाठी हीच योग्य वेळ असल्याचे सांगत भाजप तयारीला लागली होती. मात्र, स्थानिकांच्या आकांक्षावर पाणी फेरले. शिवसेनेला पुन्हा झुकवले अशा गमजा काही कार्यकर्ते मारत असले तरी अनेक जण गेल्या तीन वर्षांची मेहनत वाया गेल्याची भावना व्यक्‍त करीत आहेत. वरिष्ठांच्या निर्णयाने निष्ठावान भाजप कार्यकर्ते युतीचे काम करतीलही. असे असले तरी तीन वर्षात सेनेला कंटाळून भाजपात आलेले कार्यकर्ते युती धर्म निभावतील, अशी शक्‍यता नाही. 

युतीबाबत वरिष्ठांनी घेतलेला निर्णय मान्य आहे. पण स्थानिक कार्यकर्त्यांच्या भावनांचा विचार करून सुरेश प्रभूंना उमेदवारी मिळावी, अशी अपेक्षा आहे.
- अमित केतकर,
 तालुका सरचिटणीस

युती आम्हाला मान्य नाही. आमच्या भावनांचा विचार करून पक्षाने इथे निर्णय घ्यायला हवा. मतदारसंघ सेनेकडे राहिल्यास आम्ही केलेली मेहनत वाया जाईल. भाजपने इथून मैत्रीपूर्ण लढत करावी व सुरेश प्रभूंना रिंगणात उतरवावे.
- सूर्यकांत साळुंखे, 
जिल्हा उपाध्यक्ष

‘स्वाभिमान’शिवाय पर्याय नाही
युती धर्म मोडून मदत करायची म्हणजेच एनडीएचा घटक पक्ष असलेल्या स्वाभिमानशिवाय दुसरा पर्याय नाही. स्वाभिमानकडून येथे नीलेश राणे रिंगणात असतील. भाजपने त्यांना मदत केल्यास सेनेचे मताधिक्‍य घटण्याची शक्‍यता अधिक आहे. याचा परिणाम विधानसभेतही दिसण्याची शक्‍यता आहे.

Web Title:  Due to the compliance of the alliance in Sangameshwar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com