गारपिटीमुळे कांदा पिकांचं मोठं नुकसान अनेक भागांतील कांदा पिकं जमीनदोस्त

Great damage to crops due to hail
Great damage to crops due to hail

अवकाळी आणि गारपिटीचा तडाखा बसला आणि कांद्याच्या शेतीवर अक्षरश: वरवंटा फिरवला गेलाय आधी लॉकडाऊन नंतर अवकाळी आणि आता गारपिटीचं अस्मानी संकट या सगळ्या संकटात कांद्याची शेती आर्थिकदृष्ट्या कुजून गेलीय . 

संपूर्ण शेतात गारांचा खच आणि चिखल, गारांच्या मारामुळे आडवं झालेलं पीक.. हे चित्र काल नाशिकच्या बागलाण तालुक्यातील अंतापूरसह अनेक गावांमध्ये होतं.अगदी हातातोंडाशी आलेलं आणि काल दुपारपर्यंत अगदी वाऱ्यावर डोलणारी कांद्याची पात आणि कांद्याचं पीक काल संध्याकाळी झालेल्या गारपिटीने अक्षरशः जमीनदोस्त झालं. अवघ्या काही वेळात होत्याच नव्हतं झालं. अवकाळी आणि गारपिटीच्या तडाख्याने नाशिक जिल्ह्यातील कांदा उत्पादक पूर्णपणे उध्वस्त झालाय.

मागील वर्षी लांबलेल्या पावसामुळे पीक वाहून गेल्यानं कांदा उत्पादक शेतकऱ्यांना कांद्याची दुबार तिबार लागवड करावी लागली. अगदी महागडं बियाणं विकत घेऊन शेतकऱ्यांनी कांदा लागवड केली. त्यामुळे यंदा  शेतकऱ्यांच्या उत्पादन खर्चातही मोठ्या प्रमाणात वाढ झाली होती. त्यात जानेवारीमध्ये कांद्यावर रोगाचा प्रादुर्भाव झाल्यानं कांदा वाचवण्यासाठी शेतकऱ्यांना महागड्या औषधांची फवारणी करावी लागली. अशा बिकट परिस्थितीत निसर्गानं पुन्हा अवकृपा केल्यानं कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी तरळलंय.

एकट्या सटाणा तालुक्यात जवळपास 2800 हेक्टरवरील कांद्याचं पूर्णपणे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. एक एकरात साधारणपणे 200 क्विंटल कांद्याचं उत्पादन होतं. असा हिशेब गृहित धरला तर आजच्या बाजारभावाप्रमाणे कोट्यवधींचं नुकसान सोसायची वेळ शेतकऱ्यांवर आलीय

मागील वर्षीच्या अतिवृष्टी आणि अवकाळी पावसामुळे यंदा कांद्याच्या उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट झालीय. अशा परिस्थितीत निसर्गाच्या तडाख्यातून कसेबसे वाचवलेल्या कांद्याला बाजारात चांगला दाम मिळेल, हाती चार पैसे पडतील, अशी आशा शेतकऱ्यांना होती. मात्र कालच्या गारपिटीने केवळ कांदा पीकचं जमीनदोस्त केलं नाही, तर शेतकऱ्यांची स्वप्नं, कष्टही वाहून गेलंय. सातत्याने अवकाळीचं संकट आणि बाजारात मिळणारा बेभरवशाचा बाजारभाव यामुळे आधीच संकटांचा सामना करणारा बळीराजा कालच्या निसर्गाच्या तडाख्याने कोलमडून पडलाय.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com