बेरोजगारीची पायात बेडी, जमेना लग्नाची जोडी! वाचा नोकरी नसलेल्या मुंलांची ही व्यथा

साम टीव्ही
सोमवार, 7 डिसेंबर 2020
  • बेरोजगारीची पायात बेडी, जमेना लग्नाची जोडी
  • शहरी ग्रामीण भागांतही अनेक युवक लग्नाविनाच
  • नोकरी नसल्याने लग्नासाठी मुलगीच मिळेना

तुळशीचं लग्न होऊन पंधरवडा उलटला. पण अजूनही कित्येकांची लग्नच जमेनात. बेरोजगारीची बेडी पायात अडकल्याने अनेक तरुणांची लग्नाची जोडी काही जमेना. अनेक तरुणांचे जथ्थेच्या जथ्थे लग्नाविना हताशपणे बसून आहेत.

ही अशी याचना करण्याची वेळ हल्ली अनेक तरुणांवर आलीय. नोकऱ्या नाहीत, व्यवसायाला भांडवल नाही. शिक्षण घेऊनही अनेकांच्या हाताला काम नाही. असे बेरोजगार युवकांचे तांडेच्या तांडे गावगन्ना फिरताना दिसतायत. लग्नाचं वय उलटून गेलं तरी हात काही पिवळे होईनात.

हेही वाचा -

बुलडाण्यातील बालसुधारगृहात दोन अल्पवयीन मुलांची आत्महत्या! बालसुधारगृह का बनलेत मृत्यूचे सापळे?

खरंतर, दरवर्षी तुळशी विवाहानंतर लग्नाचे बार उडतात. पण हल्ली अनेक बेरोजगार युवकांचे दोनाचे चार हात होतच नाहीयत. गेल्या काही वर्षांत मुलींचा जन्मदर घटल्याने मुलींपेक्षा मुलांची संख्या वाढलीय. त्यातच, अनेक मुली संगणक, शिलाईकाम, ब्यूटीपार्लर असे कोर्स करुन स्वतःच्या पायावर उभ्या राहिल्यात तर, काही मुली बीएड, डीएड, डॉक्टर, इंजीनियर, वकील बनून नोकरी करतायत. त्यामुळे त्यांनाही लग्नासाठी नोकरीवाला किंवा व्यवसाय करणारा मुलगा हवा असतो. मात्र इकडे मुलं शिकून सवरूनही बेरोजगार आहेत. त्यामुळे त्यांच्याशी लग्न करण्यास कुणीही तयार होईना.

ही सगळी परिस्थिती पाहता, उपवर मुलांची अख्खीची अख्खी पिढी लग्नासाठी मुली शोधत फिरतेय. मुलाचं लग्न होईना म्हणून त्यांचे आई-बापही डोक्याला हात लावून बसलेत. त्यामुळे, पायातील बेरोजगारीची बेडी कधी तुटणार आणि लग्नाची जोडी कधी जमणार? अशा प्रश्चाच्या चक्रात तरुण अडकलेत.
 


संबंधित बातम्या

Saam TV Live