'विमानतळावरील पदार्थ करमुक्त 

सकाळ न्यूज नेटवर्क
शुक्रवार, 11 ऑक्टोबर 2019

मुंबई : 'मुंबईतील छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळावरील करमुक्त दुकानांतील (ड्युटीफ्री शॉप्स) पदार्थ व वस्तूंवर जीएसटी लावता येणार नाही', असा महत्त्वपूर्ण निर्वाळा मुंबई उच्च न्यायालयाने दिला आहे.'सीमाशुल्क किंवा जीएसटी हे सीमाशुल्क विभागाच्या अखत्यारीतील गोदामांतील वस्तू बाहेर पडल्यानंतरच आकारता येते. म्हणजेच विमान प्रवासाने आलेला प्रवासी सीमाशुल्क विभागाच्या हद्दीतून बाहेर पडल्यानंतरच ही आकारणी लागू होते. ड्युटीफ्री शॉप्स हे सीमाशुल्क विभागाचा प्रदेश सोडत नाहीत. त्यामुळे त्यांना सीमाशुल्क किंवा जीएसटीही लागू होत नाही. आंतरराष्ट्रीय विमानतळावर विमान प्रवासाने जाणाऱ्या व आलेल्या प्रवाशांसाठी ही दुकाने आहेत. त्यांच्यावर स्थानिक कराचा भार टाकला तर किंमती आणखी वाढतील आणि जगभरातील आंतरराष्ट्रीय विमानतळांवरील ड्युटीफ्री शॉप्ससोबत स्पर्धा करण्यात भारतातील अशा ड्युटीफ्री शॉप्सना अडथळे निर्माण होतील', असे खंडपीठाने आपल्या निर्णयात स्पष्ट केले.

राज्याच्या विक्रीकर विभागाने विक्रीवर आकारलेल्या जीएसटीचा परतावा मिळावा 'इनपूट टॅक्स क्रेडिट'ची मागणी विक्रीकर उपायुक्तांनी १० जानेवारी २०१९ रोजी फेटाळून लावली होती. त्याला फ्लेमिंगो ट्रॅव्हल रिटेल लिमिटेड व अन्य काहींनी रिट याचिकांद्वारे आव्हान दिले होते. याविषयीच्या सुनावणीअंती न्या. रणजित मोरे व न्या. भारती डांगरे यांच्या खंडपीठाने नुकताच हा निर्णय दिला.

 

Web Title duty free shops at mumbai international airport are exempt from gst
 


संबंधित बातम्या

Saam TV Live