शेतकरी हक्कासाठी किसान सभेचा एल्गार, आज राजभवनावर धडकणार मोर्चा

साम टीव्ही
सोमवार, 25 जानेवारी 2021

 

  • शेतकरी हक्कासाठी किसान सभेचा एल्गार
  • शेकडो शेतकरी बांधव मुंबईत दाखल 
  • कृषी कायद्याविरोधात नाशिक ते मुंबई लाल मार्च

चलो दिल्लीनंतर अखिल भारतीय किसान सभेनं पुन्हा एकदा एल्गार पुकारलाय. किसान सभेचा मोर्चा मुंबईत पोहचला असून शेकडो शेतकरी या मोर्चात सहभागी झालेत. आता हा मोर्चा आपल्या हक्कासाठी राजभवनावर धडक देणारंय. 

अखिल भारतीय किसान महासभेचा शेतकऱ्यांचा मोर्चा आज राजभवनावर धडकणार आहे. नाशिकवरून निघालेला शेतकऱ्यांचा हा राज्यव्यापी मोर्चा काल मुंबईत दाखल झाला. दिल्लीतील शेतकरी आंदोलकांच्या समर्थनार्थ मुंबईत शेतकरी रस्त्यावर उतरलेत. केंद्रानं नवीन कृषी कायदे रद्द करावेत, तसंच डॉ. स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशी लागू कराव्यात यासह शेतकऱ्यांच्या अन्य मागण्यांसाठी हे सर्व शेतकरी मुंबईत महामुक्काम आंदोलन करतायत. प्रजासत्ताकदिनी आझाद मैदानावर ध्वजवंदनाने आणि राष्ट्रगीत गाऊन शेतकरी-कामगारांचे हे आंदोलन विजयी करण्याचा निर्धार करुन महामुक्कामाची सांगता होईल.

 

बाळासाहेबांच्या भाषणाचा व्हिडिओ ट्विट करत फडणवीसांचा सेनेला डिवचण्याचा प्रयत्न, राऊतांचंही प्रत्यूत्तर

हातात लाल झेंडा आणि मस्तकात केंद्राच्या कृषी कायद्यांविरोधात धगधगणारी आग असा आक्रमक पवित्रा घेऊन शेकडो शेतकरी महाराष्ट्राच्या राजधानीत अर्थात मुंबईत दाखल झालेत. दिल्लीत शेतकऱ्यांचं आंदोलन सुरूंय. या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी किसान सभेनं नाशिक ते मुंबई आंदोलनाची हाक दिली आणि एक एक करत शेकडो शेतकरी या आंदोलनाशी जोडले गेले.

शेतकरी विरोधी कायदे रद्द करा या मागणीसाठी शेतकरी आक्रमक झालेत. नाशिकहून निघालेलं हे लाल वादळ आता मुंबईत धडकलंय. हे शेतकरी राजभवनावर धडक देणार आहेत. केंद्र सरकारपर्यंत आपला आवाज पोहचावा यासाठी किसान सभेमार्फत राज्यपालांना निवेदन दिलं जाणारंय. जगाच्या पोशिंद्याला सन्मानानं जगता यावं यासाठी हा सारा खटाटोप आहे. 

केंद्राच्या कृषी धोरणांवरून शेतकरी आक्रमक झाले आहेत. एकीकडे दिल्लीत शेतकऱ्यांनी एल्गार पुकारलाय दुसरीकडून देशातले शेतकरीही एकवटतायेत. 26 जानेवारीपासून हे आंदोलन आणखी तीव्र करण्याचा इशारा बळीराजानं दिलाय. यावर आता केंद्राची भूमिका काय असेल हे पाहणं महत्वाचं ठरेल.


संबंधित बातम्या

Saam TV Live