'मे महिन्याच्या अखेरपर्यंत मुंबईतील कोरोना रुग्णांची संख्या तब्बल 70 हजारपर्यंत जाईल'

'मे महिन्याच्या अखेरपर्यंत मुंबईतील कोरोना रुग्णांची संख्या तब्बल 70 हजारपर्यंत जाईल'

एक अत्यंत महत्त्वाची बातमी मुंबईकरांसाठी. महाराष्ट्रात कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण मुंबईत आहेत. रोज मुंबईत वाढणाऱ्या रुग्णांची संख्याही काळजी करायला लावणारी आहे. धक्कादायक बाब म्हणजे मे महिन्याच्या अखेरपर्यंत मुंबईतील कोरोना रुग्णांची संख्या तब्बल 70 हजारपर्यंत जाईल, असा अंदाज वर्तवण्यात आलाय.

 मे महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यात मुंबईत कोरोना रुग्णांची संख्या 70 हजारांवर पोहचण्याचा धक्कादायक अंदाजही वर्तवण्यात आला आहे. मुंबई महापालिकेच्या कोरोना टास्क फोर्सच्या आयएएस अधिकारी मनिषा म्हैसकर यांच्या फेसबुक पोस्टद्वारे ही माहिती मिळत आहे. लॉकडाऊन असूनही कोरोना रुग्णांची संख्या दिवसागणिक वाढत असल्याचं चित्र आहे. सध्या मुंबईत सात दिवसांनी रुग्णांची संख्या दुप्पट होत आहे.

17 एप्रिलला 2120 असणारी रुग्णसंख्या आठवड्यानंतर 23 एप्रिल रोजी 4232 वर पोहचली आहे. रुग्णसंख्या दुप्पट होण्याचा कालावधी 7 दिवसांऐवजी तो 8, 9 किंवा 10 दिवसांवर नेण्यासाठी मुंबई महापालिका प्रयत्नशील असल्याचं मनिषा म्हैसकर यांनी सांगितलंय. तसंच रुग्णसंख्या दुप्पट होण्याचा हा कालावधी कमी होऊन 4 किंवा 5 दिवसांवर येऊ नये, याबाबतही काळजी घेतली जात असल्याचं त्या म्हणाल्या.

त्यातच, महाराष्ट्रातील रेड झोन असलेल्या जिल्ह्यांमध्ये वाढ झाली असल्याची आकडेवारी समोर येते आहे. तब्बल 6 नवे जिल्हे रेड झोन मध्ये आले आहेत. त्यामुळे महाराष्ट्रात कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याचं स्पष्टपणे जाणवतंय. 
महिन्याभराच्या लॉकडाऊनंतर महाराष्ट्रात रेडझोन वाढलेत. 15 एप्रिलला महाराष्ट्रात 11 जिल्ह्यांना रेड झोन जाहीर करण्यात आलं होतं. तर 18 जिल्हे हे ऑरेंज झोनमध्ये होते. मात्र 24 एप्रिलला नोंदवण्यात आलेल्या आकडेवारीनुसार महाराष्ट्रात नव्या 6 जिल्ह्यांनाही रेड झोन घोषित करण्यात आलं आहे. या जिल्ह्यांमधील कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याचं दिसतंय. नंदुरबार, परभणी, नांदेड या जिल्ह्यांमध्ये 15 एप्रिलपर्यंत एकही कोरोनाचा रुग्ण नव्हता. मात्र 15 एप्रिलनंतर या ठिकाणी रुग्ण आढळून आल्यानंतर काही जिल्ह्यांमध्ये संसर्ग वाढत असल्याचं कोरोना रुग्णांच्या वाढत्या आकडेवारीवरुन स्पष्ट होतंय. त्यामुळे महाराष्ट्र सरकारसमोरील आव्हानंही वाढली आहेत.

Web Title - 'By the end of May, the number of corona patients in Mumbai will reach 70,000'

 

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com