पराग शहांच्या गाडीची तोडफोड

सकाळ न्यूज नेटवर्क
शुक्रवार, 4 ऑक्टोबर 2019

मुंबई: फडणवीस मंत्रीमंडळात गृहनिर्माण मंत्रिपदाची जबाबादारी सांभाळलेले प्रकाश मेहता हे सहा वेळा आमदार म्हणून निवडून आले आहेत. यंदाच्या विधानसभा निवडणुकीसाठी आपल्याला तिकीट मिळावे यासाठी प्रयत्नशील असलेल्या प्रकाश मेहता यांना भारतीय जनता पक्षाच्या चौथ्या यादीतही स्थान मिळू शकलेले नाही. या वेळी नवा चेहरा देण्याच्या प्रयत्नात असलेल्या भारतीय जनता पक्षाने घाटकोपर पूर्व विधानसभा मतदारसंघासाठी प्रकाश मेहता यांचे तिकीट कापून विद्यमान नगरसेवक पराग शहा यांनी उमेदवारी दिली. यामुळेच संतप्त झालेल्या कार्यकर्त्यांनी पराग शहा यांच्या गाडीवर हल्ला चढवत गाडीची तोडफोड केली. यानंतर संतप्त कार्यकर्त्यांनी पराग शहा यांना अडवून धरले.घाटकोपरमध्ये भारतीय जनता पक्षामधील गटबाजी चव्हाट्यावर आली असून आज भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी प्रकाश मेहता यांना डावलून उमेदवारी दिलेल्या पराग शहा यांची गाडी अडवून गाडीची तोडफोड केली. या घटनेमुळे घाटकोपरमध्ये तणावाचे वातावरण पसरले आहे.

या वेळी संतप्त झालेल्या प्रकाश मेहता यांच्या कार्यकर्त्यांनी पराग शहा यांना शिवीगाळही सुरू केली. पराग शहा यांनी प्रकाश मेहता यांच्याशी गद्दारी केली असून आम्ही त्यांना सोडणार नाही, अशा प्रतिक्रिया संतप्त कार्यकर्त्यांनी व्यक्त केल्या. 'प्रकाश मेहता, तुम आगे बढो, हम तुम्हारे साथ है', अशा घोषणाही हे संतप्त कार्यकर्ते देत होते. परिस्थिती आटोक्याबाहेर जाऊ नये यासाठी स्वत: प्रकाश मेहता आणि किरीट सोमय्या यांनी कार्यकर्त्यांना समजावण्याचा प्रयत्न केला. प्रकाश मेहता यांनी सतंप्त कार्यकर्त्यांना शांत राहण्याची विनंती केली. 'ही आपली संस्कृती नाही. पक्षाचा आदेश आपण पाळला पाहिजे', अशा शब्दात मेहता कार्यकर्त्यांना समजावत होते. मात्र तरी देखील संतप्त झालेल्या कार्यकर्ते ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. उमेदवारी जाहीर झाल्यातर पराग शहा हे प्रकाश मेहता यांच्या भेटीसाठी मेहता यांच्या घरी येत होते. मात्र, प्रकाश मेहता यांच्या संतप्त कार्यकर्त्यांनी त्यांची गाडी रस्त्यातच अडवली.
घाटकोपरमध्ये घडलेला प्रकार हा अतिशय चुकीचा प्रकार असून कार्यकर्त्यांनी शांतता पाळावी, असे आवाहन भारतीय जनता पक्षाचे नेते प्रविण छेडा यांनी केले आहे. पक्षाने जाहीर केलेला निरणय कार्यकर्त्यांनी मानला पाहिजे. असे प्रकार न करता कार्यकर्त्यांनी पक्षाने ठरवलेल्या उमेदवारांना पाठिंबा देत त्यांना निवडून आणण्यासाठी काम केले पाहिजे,असेही छेडा म्हणाले. एखाद्या घटनेवरून पक्षात दुफळी माजली आहे, असे म्हणणे योग्य ठरणार नाही असेही ते म्हणाले.दरम्यान, परिस्थितीचे गांभिर्य लक्षात घेत घटनास्थळी आणि घाटकोपरमध्ये पोलिसांचा फौजफाटा मागवण्यात आला आहे. घोटकोपमध्ये पोलिसांचा बंदोबस्तही ठेवण्यात आला आहे.

Web Title enraged activists attacked parag shahs vehicle after bjp rejected ticket of prakash mehta to contest election from ghatkopar east

 


संबंधित बातम्या

Saam TV Live