
९०च्या दशकातील सुप्रसिद्ध अभिनेत्री महिमा चौधरीचा आज ५०वा वाढदिवस. महिमाचा जन्म १३ सप्टेंबर १९७३ रोजी पश्चिम बंगालमधील दार्जिलिंग शहरातला. १९९० मध्ये महिमाने शिक्षण सोडून मॉडेलिंग क्षेत्रामध्ये आपलं करियर करण्याचं ठरवलं. मॉडेलिंग करत असताना महिमाने ऐश्वर्यासोबत अनेक जाहिरातींमध्ये एकत्र काम केलं आहे. महिमाला लहानपणापासूनच अभिनयाची आवड होती. महिमाने आपल्या सिनेकारकिर्दित एका म्युझिक चॅनलमध्ये व्हिडीओ जॉकीचं देखील काही दिवस काम केलं. चला तर जाणून घेऊया अभिनेत्रीच्या करियरबद्दल...
‘परदेस’ चित्रपटामधून महिमाने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं. या चित्रपटामध्ये महिमाने शाहरुख खान सोबत मुख्य भूमिका साकारली होती. ‘परदेस’ बॉक्स ऑफिसवर सुपरहिट ठरला होता. या चित्रपटासाठी महिमाला फिल्मफेअर पुरस्कार मिळाला होता. बॉलिवूडमधील सुप्रसिद्ध निर्माते आणि दिग्दर्शक सुभाष घई यांनी महिमाला १९९७ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘परदेस’ चित्रपटातून ब्रेक दिला.
‘परदेस’च्या यशानंतर महिमाने 'धडकन', 'ऐ दिल है तुम्हारा', 'लज्जा' आणि 'बागवान' यांसारख्या अनेक हिट चित्रपटांमध्ये काम केले. पण २००८ नंतर जास्त सिनेसृष्टीत सक्रीय दिसत नव्हती. त्यानंतर काही चित्रपटात तिने खूप छोटे छोटे पात्र साकारले. फार मोठ्या ब्रेकनंतर अभिनेत्री २०१६ मध्ये एका बंगाली चित्रपटात दिसली होती. त्यानंतर पुन्हा एकदा महिमा चंदेरी दुनियेपासून दूर गेली. (Bollywood Film)
महिमा चौधरीला गेल्या वर्षी स्तनाचा कर्करोग झाल्याचे निदान झाले होते. आपल्या मुलीचे संगोपन करत तिने कर्करोगावर उपचार घेतले. त्या आजारातून अभिनेत्री आता संपूर्णपणे बरी झालेली आहे. तिने कर्करोगासारख्या आजारासोबत कशाप्रकारे लढावे यासाठी समाजात जनजागृती देखील केली आहे.
आपल्या दमदार अभिनयामुळे नेहमीच चर्चेत राहिलेल्या महिमाला खासगी आयुष्यात मात्र अनेक कठीण प्रसंगांना सामोर जावं लागलं होतं.महिमा चौधरीचा १९९९ साली एक अपघात झाला होता. त्यावेळी ती ‘दिल क्या करे’ या चित्रपटामध्ये काम करत होती.
एका कार अपघातात महिमा मोठ्या प्रमाणात जखमी झाली होती. समोरून येणाऱ्या एका ट्रकने तिच्या कारला धडक दिली. या अपघातात महिमा गंभीर जखमी झाली होती. सुमारे 67 काचेचे तुकडे महिमाच्या चेहऱ्यावर अडकले होते. या कार अपघातामुळे अभिनेत्री खूपच नाराज होती.
कंगनाच्या ‘इमर्जन्सी’ चित्रपटातून महिमा पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर पुनरागमन करत आहे. महिमा चौधरी या चित्रपटात सांस्कृतिक कार्यकर्ती आणि लेखक पुपुल जयकर यांच्या भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटातील महिमाचा फर्स्ट लूकही गेल्या वर्षी प्रेक्षकांच्या भेटीला आला होता.
महिमा चौधरीच्या खासगी आयुष्याबद्दल बोलायचे तर, तिने २००७ मध्ये बिझनेसमन बॉबी मुखर्जीसोबत लग्न केले होते, पण त्यांचे लग्न फार काळ टिकू शकले नाही. महिमा आणि बॉबी २०१३ मध्ये एकमेकांपासून वेगळे झाले. त्यांना एक मुलगी देखील आहे, त्या मुलीचे संगोपन अभिनेत्री स्वतः करत आहे.
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.