
Ashok Saraf Turns 76: नेहमीच आपल्या विनोदाने प्रेक्षकांचे निखळ मनोरंजन करणाऱ्या विनोदाच्या बादशाहाचा आज ७५ वा वाढदिवस. मराठी चित्रपटसृष्टीत मामा या नावाने ओळखल्या जाणाऱ्या अशोक सराफ यांचा आज वाढदिवस. अभिनेते अशोक सराफ यांच्या वयाची पंच्याहत्तरीपूर्ण झाली असून त्यांनी मराठी सिनेसृष्टीतील कारकिर्दिचं अर्धशतक अर्थात पन्नास वर्ष देखील पूर्ण केले आहेत.
आपल्या अभिनयामुळे, उत्कृष्ट संवादामुळे आणि प्रत्येक भूमिकेतील हावभावामुळे त्यांनी आपल्या चाहत्यांचे लक्ष स्वत:कडे वेधले. वयाच्या अठराव्या वर्षी अशोक मामांनी वि.वा.शिरवाडकर यांच्या ययाती आणि देवयानी या नाटकातून रंगभूमीवर पदार्पण केलं. तर जानकी या मराठी चित्रपटातून त्यांनी रूपेरी पडद्यावर पदार्पण केले. अशोक मामांनी आपल्या सिनेकारकिर्दित चित्रपटसृष्टीसोबतच नाट्य क्षेत्रातही आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला.
ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांनी नाट्यसृष्टीतही आपल्या अभिनयाची चुणूक प्रेक्षकांना दाखवली. त्यांनी 'प्रेमा तुझा रंग कसा..', 'हमीदाबाईची कोठी', 'मनोमिलन', 'संगीत संशयकल्लोळ', 'हसत खेळत', 'लगीनघाई' अशा अनेक नाटकातून आपली ओळख प्रस्थापित केली.
तर 1980 ते 1990 च्या काळामध्ये अशोक मामांनी अनेक हिट आणि ब्लॉकबस्टर चित्रपटातून आपली ओळख निर्माण केली. ‘अशी ही बनवाबनवी’, ‘धुमधडाका’, ‘आयत्या घरात घरोबा’, ‘साडे माडे तीन’, ‘शेजारी शेजारी’, ‘आमच्यासारखे आम्हीच’, ‘बिनकामाचा नवरा’, ‘गंमत जंमत’ या चित्रपटांतून त्यांनी आपल्या भूमिका अजरामर केल्या आहेत. सोबतच ‘करण अर्जुन, येस बॉस’ या हिंदी चित्रपटात त्यांनी भूमिका साकारली.
गेल्या काही दिवसांपुर्वी ‘झी चित्र गौरव पुरस्कार २०२३’ सोहळा पार पडला. यामध्ये दरवर्षी एका ज्येष्ठ अभिनेत्याला जीवनगौरव पुरस्काराने गौरविण्यात येते. यावर्षी अशोक सराफ यांना जीवनगौरव पुरस्काराने गौरविण्यात आले. या निमित्त पत्नी आणि ज्येष्ठ अभिनेत्री निवेदिता सराफ यांनी पोस्ट शेअर केली होती. यावेळी त्यांनी अशोक सराफ यांचा सन्मान करतानाचा एक व्हिडीओ शेअर केला होता.
त्या व्हिडीओवर अनेक चाहत्यांनी कमेंट करत अशोक सराफ यांचे अभिनंदन केले. ज्येष्ठ मराठी अभिनेत्री निवेदिता सराफ यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून पोस्ट लिहित झी मराठीचे आभार मानले. निवेदिता सराफ सोशल मीडियाच्या माध्यमातून म्हणतात, “मी झी मराठीची खूप ऋणी आहे अशोकला जीवनगौरव पुरस्कार देताना इतका अविस्मरणीय सोहळा केल्याबद्दल” असे कॅप्शन निवेदिता सराफ यांनी या फोटोला दिले आहे.
निवेदिता सराफ यांनी शेअर केलेल्या पोस्टमध्ये, अभिनेता सिद्धार्थ जाधव, रितेश देशमुख, आदिनाथ कोठारे, सुबोध भावे, अंकुश चौधरी, उमेश कामत, श्रेयस तळपदे ही कलाकार मंडळी बसून अशोक सराफ यांना हा पुरस्कार देताना दिसत आहेत.
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.