
नाटक (Drama), मालिका (Serial), चित्रपट (Movie) हे तिन्ही क्षेत्र गाजवणारे मराठमोळे अभिनेते प्रशांत दामले यांनी काही महिन्यांपूर्वीच नाटकाचा १२ हजार ५०० वा विक्रमी प्रयोग केला. वेगवेगळ्या नाटकांच्या माध्यमांतून ते प्रेक्षकांच्या भेटीला येत असतात. त्यांच्या नाटकांना प्रेक्षकांकडून भरघोस प्रतिसाद देखील मिळतो. प्रशांत दामलेंच्या नाटकांची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहतात. फक्त महाराष्ट्रातच नाही तर परदेशातही प्रशांत दामले यांचा मोठा चाहता वर्ग आहे. महाराष्ट्रात वेगवेगळ्या ठिकाणी नाटकांचे प्रयोग केल्यानंतर आता परदेशात प्रशांत दामले यांच्या नाटकांचे प्रयोग होणार आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शैक्षणिक निधीसाठी प्रशांत दामले लवकरच अमेरिका दौरा करणार आहे. 'एका लग्नाची पुढची गोष्ट' (eka lagnachi pudhchi goshta) आणि 'नियम व अटी लागू' या त्यांच्या नाटकांचे २१ प्रयोग अमेरिकेमध्ये होणार आहे. त्यामुळे आता अमेरिकेतील प्रशांत दामले यांच्या चाहत्यांसाठी या दोन नाटकांची मेजवाणी असणार आहे.
परदेशी स्थायिक असलेल्या मराठीजनांची आपल्या मराठी संस्कृतीशी असलेली नाळ अधिक घट्ट व्हावी यासाठी बृहन्महाराष्ट्र मंडळातर्फे अनेक उपक्रम राबविण्यात येत असतात. या उपक्रमासाठी महाराष्ट्रातील अनेक मान्यवरांचे सहकार्य लाभत असते. अशाच एका उपक्रमासाठी प्रसिद्ध अभिनेते प्रशांत दामले यांनी पुढाकार घेतला आहे. बृहन्महाराष्ट्र मंडळाच्या शैक्षणिक निधी उभारणीसाठी ‘एका लग्नाची पुढची गोष्ट’ आणि ‘नियम व अटी लागू’ या दोन नाटकांचा अमेरिका दौरा त्यांनी आयोजित केला आहे.
८ सप्टेंबर ते ८ ऑक्टोबर दरम्यान ‘नियम व अटी लागू’ चे प्रयोग तर ३० सप्टेंबर ते १५ ऑक्टोबर दरम्यान ‘एका लग्नाची पुढची गोष्ट’ नाटकाचे प्रयोग अमेरिकेत होणार आहेत. या दोन नाटकांचे २१ कलाकार ६ आठवड्यात २१ प्रयोग सादर करणार आहेत. या प्रयोगांतून मिळणाऱ्या उत्पन्नाचा हिस्सा बृहन्महाराष्ट्र मंडळ शैक्षणिक निधी उभारणीसाठी देण्यात येणार आहे. त्यातून २०२३ मध्ये १३-१८ वयोगटातील १०० मुलामुलींसाठी $३०,००० आणि २०२४ मध्ये ५०० मुलामुलींसाठी अंदाजे $१५०,००० असा $२ मिलीयनचा फंड उभारण्याचा बृहन्महाराष्ट्र मंडळाचा मानस आहे.
मराठी अमेरिकेन मुलांचे मराठीशी नाते अतूट राहावे या उद्देशाने बृहन्महाराष्ट्र मंडळ हा नवीन उपक्रम राबवत आहे. या उपक्रमासाठी प्रशांत दामले आणि त्यांच्या टीमचा हातभार लागणे ही सर्व उत्तर अमेरिकेतील मराठी समाजासाठी एक अभिमानाची गोष्ट असल्याचे बृहन्महाराष्ट्र मंडळाचे अध्यक्ष श्री. संदीप दीक्षित यांनी सांगितले. अमेरिकेत या नाटकांचे प्रयोग होणार असल्यामुळे अमेरिकेतील मराठी प्रेक्षकांसाठी ही आनंदाची बातमी आहे. ते या नाटकांची आतुरतेने वाट पाहत आहेत.
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.