
Marathi Actress Mansi Naik: मराठमोळी अभिनेत्री मानसी नाईकच्या (Actress Mansi Naik) घटस्फोटानंतर तिच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला होता. मानसी गेल्या काही दिवसांपासून तिच्या घटस्फोटामुळे चर्चेत आहे. मानसीने घटस्फोट का घेतला? असा प्रश्न अनेकांना पडला होता. आपल्या घटस्फोटाबाबत मानसी सोशल मीडियावर (Social Media) अनेकदा व्यक्त होताना दिसते. पण आता मानसीने पुन्हा फेसबुकवर घटस्फोटाबाबत भली मोठी पोस्ट करत आपल्या मनातील खदखद व्यक्त केली आहे.
या फेसबुक पोस्टच्या माध्यमातून मानसीने तिला झालेल्या त्रासाचा देखील उल्लेख केला आहे. मानसीच्या या पोस्टवर तिच्या चाहत्यांनी कमेंट्स करत तिचं सांत्वन करण्याचा प्रयत्न केला आहे. 'अनुभवातून माणूस शहाणा होतो', 'योग्य व्यक्तीची पारख करता आली पाहिजे', अशा प्रकारच्या कमेंट्स नेटिझन्सनी केल्या आहेत. मानसीची ही फेसबुक पोस्ट सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
मानसी नाईकने फेसबुक पोस्टमध्ये असे लिहिले आहे की, 'ज्यांच्याबद्दल अतोनात विश्वास असतो ती माणसं कधीकधी इतकी धक्कादायक वागतात की त्या धक्क्याने आपण कोसळून जाऊ असं वाटू लागतं. जवळच्या माणसांनी केलेले विश्वासघात फार जिव्हारी लागणारे असतात. त्यामुळे लौकिक अर्थाने आपलं फारसं नुकसान झालेलं नसलं तरी भावनिक पातळीवर कधीही न भरून निघणारी हानी झालेली असते. माणसांवरचा विश्वास उडू लागतो अशाने फार हट्ट करावासा वाटत नाही.'
मानसी घटस्फोटाआधी तिला आलेला अनुभव सांगिताना म्हणाली, 'मग कशासाठी आणि कोणासाठी अर्थात या पासिंग फेजेस असतात त्या येतात आणि पुरेशी वेदना सोसून झाल्यावर जातातही आपण आपल्या मूळ स्वभावावर येतोच पुनःपुन्हा पण तरीही फार जवळून अनुभवलं की प्रत्येकाचेच पाय मातीचे आहेत हे दिसू लागतं. मग आपण उदास होऊ लागतो एवढ्या तेवढ्याने भारावून जाण्याचा आपला स्वभाव असू नये आणि कोणालाही पराकोटीचा आदर्श मानून बसू नये. माणसं म्हटली की, वर्तनात कमी जास्त गोष्टी व्हायच्याच आणि ते अगदी नैसर्गिक आहे.
'माणसांतली नाती पूर्णतः नि:स्वार्थ कधीही नसतात आणि त्यात वावगंही काही नाही हे आपण लक्षात ठेवायला हवं म्हणजे अपेक्षाभंगाचं दुःख वाट्याला येत नाही प्रत्येक मानवी नात्यात अडचणी येतातच. पण त्या सगळ्या अडचणींवर कसोट्यांवर मात करून अखेरपर्यंत आपल्यासोबत उरतात ती खरी आपली माणसं ज्यांचे हात उगीचच निसटले ते प्रवासातले तात्पुरते सोबती होते. इतकंच समजायचं आणि पुढे चालू लागायचं.', असं मानसी म्हणाली.
मानसीने पुढे सांगितले की, 'रस्त्यात सांडून गेलेले सगळेच मोती वेचून आणायचं त्राण आपल्यात नसतं आणि प्रत्येकवेळी तसा हट्टही आपण करायचा नसतो. निमूटपणे विनातक्रार आपल्यासोबत चालत आलेल्या पावलांवर भिस्त ठेवायची फक्त ती आणि तेवढीच माणसं फक्त आपली समजायची ऊस काढताना कोयत्याने पाचट सोलून काढतात तशी माणसांची निवड करत रहावी लागते. कायम सरावाने ओरिजिनल माणसं ओळखू येतात. आपल्याला भले ती चुकत असतील. लाखदा पण आपला हात सोडून जाणार नाहीत त्यांची आपल्यावर असलेली माया कदापी आटणार नाही अशी चांगली माणसंही असतात. आपल्या आयुष्यात अनेक ती मात्र जपायला हवीत.'
तसंच, 'काही लोकांसाठी आपण केवळ सोय असतो ते त्यांच्या सोयीने आपल्याशी वागतात. गैरसोय वाटेल तेव्हा दूर जातात. आपल्याला कोणीतरी स्वतःच्या सोयीनुसार वापरलं आणि आपण मात्र किती जेन्युईनली तो माणूस जपण्याचा प्रयत्न केला हे जेव्हा लक्षात येतं तो क्षण फार फार दुखरा असतो. जगताना सगळीच माणसं लागतात आपल्याला नाही असं नाही पण कोणावर विश्वास टाकायचा कोणाला जवळ करायचं आणि कोणासाठी नात्यात काही अदृश्य भिंती कायम घालून ठेवायच्या हे आपल्याला ठरवावंच लागतं. नाहीतर आपला साधेपणा हा भाबडेपणाच्या मार्गाने जाऊन बावळटपणा ठरू शकतो.'
'माणसं जोखणं जमायलाच हवं समोरच्या माणसाचं असत्य रूप आपल्याला माहिती असूनही आपण ते माहिती नसल्यासारखं दाखवणं आणि त्याच्या वागण्यातून दिसणारे विरोधाभास अनुभवणं ही गमतीदार गोष्ट असते. खोटंनाटं उलटंपालटं बोलून वागून आपण समोरच्याला फसवू शकतो असं काही लोकांना वाटत असतं. त्यांच्या वर्तनातल्या विसंगती आपल्या लक्षात आलेल्या असतात. मग तर त्यांची कीव येते. अक्षरशः का वागत असतील माणसं अशी स्वतःसह इतरांना का फसवत असतील ज्यांच्याशी अगदी पटतच नाही त्यांच्यासोबत सुद्धा वाद घालून किंवा स्पष्टीकरणं देऊन आपण आपलं मानसिक स्वास्थ्य घालवू नये असं मला वाटतं. कटुता आणून खळखळ आवाज करत नाती संपवू नयेत. झाडावरून जितक्या सहजतेने फूल निसटतं तितकी सहजता आपल्यात असावी एखाद्या व्यक्तीच्या आयुष्यातून बाजूला होताना...'असे मानसीने म्हटलं आहे.
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.