
Kiran Mane Post: गौतमी पाटील नावातच वाद. गौतमी पाटीलच्या सध्या आडनावाचा वाद खूपच चर्चेत आला आहे. काहींनी तिला पाठिंबा दर्शवला आहे, तर काहींनी तिच्या विरोधात तक्रार देखील दाखल केली आहे. असा कोणता दिवस जात नाही, की गौतमीची चर्चा नाही. गौतमीने ‘पाटील’ आडनाव बदलून घ्यावं अन्यथा तिचे महाराष्ट्रात कार्यक्रम होऊ देणार नाही, अशी भूमिका एका मराठा संघटनेने घेतली आहे. अशातच गौतमी पाटीलला आता बिग बॉस मराठीमुळे ‘सातरचा सलमान’ नावाने चर्चेत आलेल्या किरण मानेनी तिच्या आडनावावरून सपोर्ट दिला आहे.
गौतमी पाटीलने नुकतंच एका मराठा संघटनेला उत्तर देत म्हणाली, “मी 'पाटील' आहे, तर पाटीलच लावणार आहे.” असं थेट उत्तर दिलंय. मला कोणीही काही बोलले तरी कसलाच फरक पडणार नाही अशी भुमिकाच खुद्द गौतमीनं घेतली. तिच्या गावातील प्रसिद्ध टेलिव्हिजन अभिनेता किरण मानेने इतक्या दिवस मौन बाळगले होते. अखेर त्याने या प्रकरणावर आपले मत मांडले आहे. नेहमीच सोशल मीडियावर सक्रिय असलेला किरण मानेने गौतमीबद्दल एक पोस्ट शेअर केली.
टेलिव्हिजन अभिनेता किरण माने गौतमीचा फोटो शेअर म्हणतो, “ “एक छोटीशी चिमणीसुद्धा आपल्या घरट्यात स्वच्छंदपणे चिवचिव करते रे…” गौतम बुद्धांनी अंबठ्ठाला सांगितलेलं हे वाक्य हे भारतीय साहित्यातलं नितांतसुंदर आणि आशयघन वाक्य आहे असं आ.ह. साळुंखे तात्या नेहमी म्हणतात. आपल्या संविधानातल्या ‘स्वातंत्र्य’ या मुल्याचं इतकं समर्पक स्पष्टीकरण दुसरीकडे कुठे क्वचितच सापडेल.”
“चिमणीला सुद्धा स्वत:च्या मनाप्रमाणं चिवचिवण्याची मुभा आहे… आपण तर माणूस आहोत. आपल्याला असं व्यक्त होण्याचं, मनाप्रमाणे वागण्याचं स्वातंत्र्य का मिळू नये??? एखाद्यानं काय बोलायचं… कसं वागायचं… स्वत:च्या घरात काय खायचं… कसले कपडे घालायचे… यावर बंधनं आणण्याचे प्रकार सुरू आहेतच… पण आता कळस झालाय. एका मुलीने पोटापाण्यासाठी काय करावं? किती पैसे घ्यावेत?? इथंपासून ते आता, तिनं कुठलं आडनांव लावावं??? यासाठी सुद्धा दुसरंच कुणीतरी जबरदस्ती करत आसंल… धमक्या देत आसंल तर हे लै म्हंजे लैच संतापजनक आणि लाजीरवाणं हाय.”
“गौतमी, जेव्हा तू चुकली होतीस, तुझ्या व्हल्गर हातवार्यांवर गदारोळ उठला होता, तेव्हा तू माफी मागीतली होतीस… पुन्हा ती चूक होणार नाही याची जाणीवपूर्वक काळजी घेतलीस. खरंतर त्यानंतरच तू लोकप्रियतेच्या पायर्या चढू लागलीस. आज तू जे करतेस त्यात आता ‘बिभत्स’ असं काहीही नाही. परफॉर्मन्स करताना अंगभर कपडे असतात..”
“तू ज्या अदाकार्या करतेस त्यावर ग्रामीण भागातली तरूण पोरं जीव ओवाळून टाकतात.. तुझ्या क्षेत्रात अशी लोकप्रियता लाखात एखादीला लाभते. तुझा डान्स हा उच्च दर्जाचा आहे की नाही, याविषयी प्रत्येकाचं वेगवेगळं मत असू शकतं आणि त्या प्रत्येक मताचा आदर आहे… पण तरीही कुणीही हे नाकारू शकत नाही,की आजच्या तरूणाईमध्ये तुझी जबरदस्स्त ‘क्रेझ’ आहे..”
“तुझ्या स्टेजवरच्या फक्त एंट्रीनं तरूणाई पागल होते.. गांवखेड्यांत तू लोकप्रियतेचा कळस गाठला आहेस. तिथे मराठी सिनेमा-सिरीयलमधल्या टॉपच्या अभिनेत्रींपेक्षा तू पॉप्युलर आहेस. तू हे यश एंजॉय कर. बर्याचदा अशा यशाचा काळ छोटा असतो. जोवर आहे तोवर धमाल कर. तुझ्यात जिद्द आणि चिकाटी असेल तर याहूनही मोठे यश मिळवशील पुढे जाऊन. पण ‘आम्हाला वाटतंय तसंच तू वागावंस, तस्संच नाचावंस आणि आम्ही सांगतोय तेच नांव लावायचंस’ असं दरडावू पहाणार्यांना उंच उंच लांब उडवून लाव.”
“आज तरी तू आमच्या ग्रामीण भागातल्या मनोरंजनक्षेत्रातली ‘पाटलीण’ हायेस… रुबाबात नाच, बिनधास्त नाच !”
गौतमी पाटीलच्या आडनावावरून जरी अनेकांनी विरोध दर्शवला असली तरी, ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे, किरण माने यांच्यासह मार्गदर्शक सुरेंद्र पाटील यांनी ही पाठिंबा दर्शवला...
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.