
Kiran Mane: नाटक, मालिकेतून आणि चित्रपटातून प्रकाशझोतात आलेल्या ‘सातारचा बच्चन’ची सोशल मीडियावर नेहमीच चर्चा असते. आपल्या गावरान भाषेत प्रेक्षकांना आपलंसं करणाऱ्या किरण मानेने ‘बिग बॉस मराठी ४’ मधून त्याने आपली प्रतिमा तयार केली. सामाजिक विषयासोबतच मनोरंजनसृष्टीतील अनेक मुद्द्यांवर आपले परखड मत मांडण्याचे काम किरण माने उत्तम रित्या करतो. जे खटकेल त्यावर परखड टीका करणारा. पटेल त्याचे तोंड भरून कौतुक करणारा अभिनेता म्हणजे किरण मानेची अशी ओळख सर्वत्र आहे.
‘सातारचा बच्चन’ या नावाने त्याला प्रसिद्धी मिळाली, त्याच सातारबद्दल त्याने एक नवी कोरी पोस्ट चाहत्यांसोबत शेअर केली आहे. आपल्या मायभूमीबद्दल नेहमीच तोंडभरून बोलताना, साताऱ्याने आज त्याचा मोठा सन्मान केला आहे. याच निमित्ताने किरण मानेने त्या आठवणींना उजाळा दिला आहे.
किरण पोस्ट करत म्हणतो, “ ‘सातारा आर्ट फ्यूजन फेस्टिव्हल 2023’ मध्ये मला ‘सातारा नाट्य गौरव’ पुरस्कारानं सन्मानित करण्यात येणार आहे. ज्या शाहू कलामंदिरच्या मंचावर मी सुरूवातीला उभा राहिलो... पहिली एकांकिका स्पर्धा केली... पहिलं नाटक केलं... जिथल्या पायर्यांवर बसून मी अभिनेता बनायची स्वप्नं बघितली... ज्या मंचावर निळु फुले, डाॅ. श्रीराम लागू, राजा गोसावी, यशवंत दत्त, नाना पाटेकर यांची नाटकं बघत स्वत:ला घडवायचा प्रयत्न केला..”
“जिथं मी प्रमुख भुमिकेत मुंबईच्या तब्बल दहा व्यावसायिक नाटकांचे दिमाखात प्रयोग केले... त्या स्टेजवर सन्मानित होणं हे माझ्यासाठी खूप खूप मोलाचं आहे, समाधानाचं आहे, संघर्षाचं सोनं करणारं आहे... पुढील वाटचालीसाठी शंभर हत्तींचं बळ देणारं आहे! ज्या रंगकर्मीनं मला प्रायोगिक रंगभुमीची ओळख करून दिली... आशयघन नाटकांच्या अनोख्या विश्वात नेलं... त्या गुरूतुल्य तुषार भद्रे यांनी हा सन्मान मला जाहिर करावा यासारखा आनंद नाही.”
“आर्ट फ्यूजन फेस्टिव्हलमधल्या सातारा नाट्य गौरव पुरस्काराचं हे पाचवं वर्ष. खरंतर पहिल्या वर्षीच तुषार भद्रेंनी मला हा पुरस्कार देऊ केला होता... पण त्यावेळी मी परदेश दौर्यावर असल्यानं शक्य झालं नव्हतं. मागच्या वर्षीही त्यांनी मला विचारलं होतं..”
“पण मी नेमक्या त्या तारखा शुटिंगसाठी दिल्या होत्या. भद्रे म्हणाले, “किरण, खरंतर त्यावेळी शक्य नाही झालं हे बरं झालं. यावर्षी सगळ्या विपरित परिस्थितीशी झुंज देऊन, तू जग जिंकून आला आहेस. आता तुला हा पुरस्कार मिळणं हा या पुरस्काराचा सन्मान वाढवणारं ठरणार आहे. खूप खूप आभार तुषारजी !” अशी पोस्ट किरण मानेने शेयर केली आहे.
किरण मानेच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे तर, नुकताच प्रदर्शित झालेल्या ‘रावरंभा’ चित्रपटात त्याने प्रमुख भूमिका साकारली आहे. त्याच्या सोबत अपुर्वा नेमळेकर देखील मुख्य भूमिकेत होती.
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.