वाचा, दिवाळीत कसा बदलला महाराष्ट्र?

वाचा, दिवाळीत कसा बदलला महाराष्ट्र?

कोरोनाच्या संकटात ही दिवाळी आल्याने हवा आणि ध्वनिप्रदूषणाच्या चिंता व्यक्त करण्यात आल्या होत्या. पण यंदा मुंबईकरांनी संयम आणि जागरूकता बाळगत दिवाळी साजरी केल्याने हवेचं प्रदूषण कमी झालंय. महत्त्वाचं म्हणजे पुण्यापेक्षा यंदा मुंबईची हवा शुद्ध आहे. मुंबईत प्रदूषणाची पातळी 107 मायक्रॉन असताना, पुण्यात मात्र ही पातळी 302 मायक्रॉनवर पोहोचलीय. याचाच अर्थ मुंबईकरांनी यंदा खऱ्या अर्थाने शुद्ध हवा केलीय. 

थिएटर उघडले, प्रेक्षकांची मात्र पाठच

अनलॉकमध्ये प्रेक्षकांच्या निम्म्या क्षमतेची अट टाकून थिएटर उघडली आहेत, मात्र महाराष्ट्रातील बहुतांश थिएटरकडे प्रेक्षकांनी पाठ फिरवलीय. दिवाळीच्या सणात थिएटरमध्ये अक्षरश: झुंबड उडत असताना यंदा मात्र कोरोनाच्या धास्तीने प्रेक्षकांनी थिएटरला जाणं टाळलंय.

सलग सुट्ट्या, ट्राफिकचा दट्ट्या

दिवाळीत सलग सुट्ट्या आल्यामुळे अनेकांनी पर्यटनस्थळी किंवा आपल्या गावाची वाट पकडलीय. लॉकडाऊनच्या सात-आठ महिन्यांच्या कोंडमाऱ्यानंतर मोकळीक मिळाल्याने मुंबई-पुणे एकस्प्रेस-वेसह अनेक रस्त्यांवर वाहतुकीची कोंडी बघायला मिळाली.

कोरोनाच्या संकटात... पर्यटनही जोरात

अनेक महिन्यांच्या लॉकडाऊनमुळे घरातच बसून राहिलेल्या अनेकांनी दिवाळीच्या सुट्ट्यांमध्ये पर्यटनाला पसंती दिलीय. त्यामुळे पाचगणी, महाबळेश्वर, रायगडसह अनेक समुद्रकिनारी पर्यटकांची मांदियाळी पाहायला मिळाली. महत्त्वाची गोष्ट ही की, कोरोनाबाबतची काळजी घेत लोकांनी सुट्ट्यांची मजा लुटलीय.

दिवाळीत कसा बदलला महाराष्ट्र

कोरोनाच्या संकटात एकाच जागी बसून राहिलेला प्रत्येकजण मानसिकदृष्ट्या अवघडून गेला होता. पण अनलॉकमध्ये आलेल्या दिवाळीत महाराष्ट्रानं खऱ्या अर्थानं कूस बदललीय. ही सकारात्मक गोष्ट असली तरी, कोरोना अजून गेलेला नाही. त्यामुळे दिवाळीत उत्साहाचा दिवा लावताना आपल्या आयुष्यातला आरोग्यदीप मात्र कायम तेवत ठेवा.

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com