VIDEO | आयारामांचा झाला गयाराम! सत्ता गेल्यानं आयाराम विरोधी बाकावरच...

VIDEO | आयारामांचा झाला गयाराम! सत्ता गेल्यानं आयाराम विरोधी बाकावरच...

राज्यात पुन्हा भाजपचं सरकार येणार असल्याचं वातावरण होतं...त्यामुळं निवडणुकीपूर्वी काँग्रेस-राष्ट्रवादीचे दिग्गज नेते मेगाभरतीतून भाजपमध्ये सामील झाले...पण, हातची सत्ता गेल्यानं भाजपमध्ये आलेल्या आयारामांचा गयाराम झालाय. यावर पाहूयात सविस्तर विश्लेषण...

केंद्रात भाजपचं सरकार आल्यावर आता राज्यातही भाजपचंच सरकार येईल असा ठाम विश्वास भाजपला होता. काहीही झालं तर राज्यात भाजपच असं चित्रं दिसत होतं. यामुळं सत्तेसाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील काही नेत्यांनी निवडणुकीआधी भाजपत प्रवेश केला. विकासासाठी भाजपसोबत आलोय सांगत मोठे नेते मेगाभरतीतून भाजपच्या गोटात सामील झाले. पण, हातची सत्ता गेल्यानं आता या आयारामांचा गयाराम झालाय. विधानसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांनी पक्ष सोडल्यामुळं दोन्ही पक्षाची अवस्था बिकट झाली होती...मात्र, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी प्रचारात मुसंडी मारली आणि दोन्ही काँग्रेसचे मिळून 98 आमदार निवडून आणले...निवडणुकीच्या निकालानंतर शरद पवारांनी राजकीय घडामोडींची सूत्रं स्वत: हातात घेतली...आणि सर्वांत मोठा पक्ष असलेल्या भाजपला सत्तेपासून रोखलं. यामुळं पक्ष सोडून भाजपमध्ये सामील झालेल्या नेत्यांवर पुन्हा विरोधात बसण्याची वेळ आलीय.

यात काँग्रेसचे विरोधीपक्षनेते असलेले राधाकृष्ण विखे पाटील, नारायण राणेंचे पुत्र नितेश राणे, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, जयकुमार गोरे यांच्यासह अनेक दिग्गज नेते काँग्रेसमधून भाजपत दाखल झाले. तर राष्ट्रवादीतून गणेश नाईक, शिवेंद्रराजे भोसले, बबनराव पाचपुते, प्रसाद लाड, वैभव पिचड, राणा जगजितसिंह पाटील यांनीही भाजपत प्रवेश केला.

पण, मुख्यमंत्री पदावरून शिवसेना-भाजपमध्ये जुंपली आणि महाराष्ट्र विकास आघाडीनं भाजपला सत्तेपासून रोखलं. यामुळं भाजपकडे 105 आमदार असूनही आयारामांचा गयाराम झाला. तर भाजपचे सहयोगी पक्ष असलेल्या नेत्यांची अवस्थाही केविलवाणी झालीय. गेल्या सरकारमध्ये महादेव जानकर,सदाभाऊ खोत, अविनाश महातेकर मंत्री होते. तर यावेळी विनायक मेटे यांनी देखील नवीन सरकारमध्ये मंत्री होण्याची इच्छा व्यक्त केली होती. मात्र, सरकार बदललं आणि आयारामांचा गयाराम झाला. त्यामुळं पुन्हा विरोधी पक्षात बसावं लागल्यानं होतं तेच चांगलं होतं म्हणण्याची वेळ आलीय..

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com