VIDEO | रश्मी ठाकरे ठरतायंत सेनेच्या नव्या माँ साहेब?

VIDEO | रश्मी ठाकरे ठरतायंत सेनेच्या नव्या माँ साहेब?

शिवसेनेच्या सत्तासंघर्षात एक व्यक्ती अशी आहे जी पडद्यामागून सर्व सूत्र हातात ठेवतेय. कोण आहे ही व्यक्ती जी शिवसेना आमदारांसह शिवसैनिकांसाठीही माँसाहेब-2 बनलीय. पाहुयात

20 दिवसांपासून शिवसेनेचा सत्तासंघर्ष महाराष्ट्र पाहतोय. मातोश्रीवरनं येणाऱ्या आदेशाचा परिणाम महाराष्ट्र पाहतोय. मात्र मातोश्रीकडून येणाऱ्या प्रत्येक फर्मानामागे आवाज कुणाचा आहे याचे आराखडे हळू हळू बांधले जाऊ लागलेत. रश्मी ठाकरे... शिवसेनेच्या महिन्याभराच्या सत्तासंघर्षात माँ-साहेब-2 म्हणून समोर येतायंत. बाळासाहेबांच्या पत्नी मीनाताई ठाकरे यांची ओळख माँसाहेब म्हणून शिवसैनिकांसह अवघ्या महाराष्ट्राला आहे. पण आता मातोश्रीत रश्मी ठाकरेंच्या रुपानं माँ-साहेब - 2 अवतरल्यात.

रश्मी ठाकरे.. उद्धव ठाकरेंच्या अर्धांगिनी.. उद्धव यांच्या रणनीतीकार.. त्यांच्या मार्गदर्शक.. त्यांच्या खंद्या समर्थक.. असं म्हटलं जातं की वर्षा बंगल्याची महत्त्वाकांक्षा उद्धव यांनी बाळगली ती रश्मी ठाकरेंच्या आग्रहावरनंच.. ग्राऊंड लेव्हलला पक्षात काय परिस्थिती आहे याचा लेखाजोखाच रश्मी ठाकरे ठेवतात. भाजपमागे शिवसेनेची फरफट होतेय, आता पुरे.. ही तळागाळातल्या शिवसैनिकांची भावना रश्मी ठाकरेंच्या माध्यमातून मातोश्रीपर्यंत पोहचल्याचं बोललं जातं. केवळ भाजपशी दोन हात कऱण्याबाबत नाही, तर पक्षांतर्गत होणाऱ्या बारीक-सारीक हालचालींवर रश्मी ठाकरेंची नजर असते. कोणतीही नकारात्मकता उद्धव ठाकरेंपर्यंत त्या पोहचू देत नाहीत. म्हणूनच शिवसैनिकांसाठी रश्मी ठाकरे माँ-साहेब ठरतायंत.

बाळासाहेबांनी उद्धव ठाकरेंना उत्तराधिकारी घोषित करावं यामागेही रश्मी ठाकरेच असल्याचं बोललं जातं. राज ठाकरे जेव्हा शिवसेना सोडून गेले तेव्हा उद्धव ठाकरेंसोबत रश्मी ठाकरे खंबीरपणे उभ्या राहिल्या. शिवसेना महिला आघाडीची धुरा सांभाळण्याचा अनुभव असलेल्या रश्मी ठाकरे नीता अंबानींपासून ते ऐश्वर्या राय-बच्चन कुणासोबतही अगदी सहजपणे मिसळतात. संघाचा बालेकिल्ला असलेल्या डोंबिवलीत रश्मी ठाकरे लहानाच्या मोठ्या झाल्यात. भाजपविरोधात शिवसेनेनं जी ठाम भूमिका घेतली त्यात रश्मी ठाकरेंचा पूर्वानुभव कामी आल्याचीही चर्चा आहे. शिवसेनेच्या मुख्य रणनीतीकार असल्या तरीही पडद्याआड राहणंच रश्मी ठाकरे पसंत करतात. म्हणूनच पडद्यामागून सूत्र चालवणाऱ्या रश्मी ठाकरे आज माँ-साहेब-२ म्हणून समोर येतायंत.

Web Title - Rashmi Thakarey is guide of shivsena 

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com