हेल्मेट न घालताच निघाली मनसैनिकांची नवी मुंबईत बाईक रॅली

हेल्मेट न घालताच निघाली मनसैनिकांची नवी मुंबईत बाईक रॅली
MNS BIKE RALLY

नवी मुंबई - मनसेचा वर्धापनदिन पहिल्यांदाच मुंबईच्या बाहेर आयोजित करण्यात आला आहे. नवी मुंबईत मनसैनिकांनी बाईक रॅली काढत शक्तिप्रदर्शन केलं. अनेक मनसैनिकांनी यावेळी आपल्या दुचाकींवर मनसेचा नवा झेंडा लावला होता. बाईक आणि स्कूटीवर निघालेल्या या रॅली मात्र एक विचित्र गोष्ट दिसली. एकाही मनसैनिकानं यावेळी डोक्यात हेल्मेट घातल्याचं पाहायला मिळालं नाही. 

गेले काही दिवस संपूर्ण देशभरात लाखो रुपयांचं चलान वाहतूक पोलिसांकडून काढण्यात आल्याचं वृत्त समोर आलं होतं. महाराष्ट्रात मात्र वाहतूक नियम सक्तीचे करण्यास विरोध झाला होता. मुंबईपाठोपाठ पुण्यातही हेल्मेटसक्ती करण्यात आली आहे. मात्र नवी मुंबईतल्या बाईक रॅली वाहतुकीचे नियम सर्रास मनसैनिकांकडून पायदळी तुडवण्यात आले आहेत. आता ई-चलानद्वारे या दुचाकीस्वार मनसैनिकांवर वाहतूक पोलिस काय कारवाई करणार, असा प्रश्न उपस्थित झालाय.  मनसेचा आज 14 वा वर्धापन दिन सोहळा साजरा होणार आहे. वाशी टोल नाका ते विष्णूदास भावे नाट्यगृह मनसेची बाईक रॅली आयोजित करण्यात आली होती. अमित ठाकरेही या रॅलीमध्ये सहभागी झाल्याचं पाहायला मिळालंय. दरम्यान, हेल्मेट न घातल्यानं खळ्ळखट्याक स्टाईलसाठी ओळखला जाणारे मनसैनिक पुन्हा एकदा चर्चेत आले. 

राजमुद्रा असलेला मनसेचा नवा झेंडा बाईकवर लावून यावेळी नवी मुंबईत मनसैनिकांकडून जोरदार शक्तिप्रदर्शन करण्याचा प्रयत्न करण्यात आला. राज ठाकरेंचं (Raj Thackey) सुपुत्र अमित ठाकरे (amit thackrey) यांनी नवी मुंबईतील छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण केला. यानंतर त्यांनी नवी मुंबईत आज होणाऱ्या कार्यक्रमाचा आढावादेखील घेतला. यावेळी मनसैनिकांकडून अमित ठाकरे यांचं जोरदार स्वागत करण्यात आलं. कोण आला रे कोण आला, राज ठाकरेंचा वाघ आला, असा नारा लावत अमित ठाकरेंचं यावेळी औक्षण करण्यात आलं. 

पाहा व्हिडीओ - 

mns bike rally without helmet navi mumbai 

Related Stories

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com