फडणवीसांनी राजर्षी शाहू महाराजांच्या त्या पोस्टसाठी माफी मागावी- संभाजीराजे भोसले

सकाळ न्यूज नेटवर्क
गुरुवार, 7 मे 2020

माजी मुख्यमंत्री @Dev_Fadnavis कालच्या प्रकारावर सर्व शिव-शाहू भक्तांची माफी मागावी. माझ्यासाहित संपूर्ण राज्यातील शिव-शाहू भक्तांच्या भावना दुखावल्या आहेत.

'माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कालच्या (राजर्षी शाहू महाराज स्मृतीदिन पोस्ट) प्रकारावर सर्व शिव-शाहू भक्तांची माफी मागावी. माझ्यासाहित संपूर्ण राज्यातील शिव-शाहू भक्तांच्या भावना दुखावल्या आहेत', अशी प्रतिक्रिया खासदार संभाजीराजे भोसले यांनी दिली आहे.

राजर्षी शाहू महाराज यांच्या पुण्यस्मरणाच्या सोशल मीडिया पोस्टमध्ये फडणवीस यांच्याकडून 'सामाजिक कार्यकर्ते' असा उल्लेख झाल्याने संतापाची लाट आहे. काहीच वेळात संबंधित पोस्ट डिलीट केली खरी, मात्र तोवर त्या पोस्ट स्क्रिनशॉट सर्वत्र व्हायरल झाले होते. यात या पोस्टनंतर २४ तासांनी खासदार संभाजीराजेंनी आपली भूमिका मांडली आहे. यावर फडणवीस काय प्रतिक्रिया देतात हे पाहणे, महत्त्वाचे आहे.

माजी मुख्यमंत्री @Dev_Fadnavis कालच्या प्रकारावर सर्व शिव-शाहू भक्तांची माफी मागावी. माझ्यासाहित संपूर्ण राज्यातील शिव-शाहू भक्तांच्या भावना दुखावल्या आहेत.

— Sambhaji Chhatrapati (@YuvrajSambhaji) May 7, 2020

माफी मागण्याच्या मागणीचे ट्विट करत खासदार संभाजीराजे यांनी म्हटले आहे की शिवाजी महाराज, राजर्षी शाहू महाराज हे माझ्यासाठी सर्वस्व आहेत. त्यांच्या चरित्रातील आदर्शावर चालण्याचा माझा प्रयत्न असतो. म्हणूनच, दिल्ली ध्ये ऐतिहासिक शिवजयंती साजरी केली. राष्ट्रपती असतील किंवा परदेशी राजदूत असतील या सर्वांना महाराजांच्या चरणी नतमस्तक व्हायला मी भाग पाडले. आज जगभर त्या शिवजयंतीची दखल घेतली जात आहे.

ते पुढे म्हणाले, 'संसदेच्या प्रांगणात राजर्षी शाहू महाराजांची जयंती साजरी करण्यास सुरुवात केली. त्यात देश भरतील सर्वपक्षीय नेत्यांना बोलावलं होतं. जवळपास 70 खासदार जमले होते. शाहू महाराजांवरील जयसिंगराव पवारांचे हजारो पुस्तके मी देशीविदेशी अतिमहत्वाच्या व्यक्तींना भेट म्हणून दिले आहेत. त्यातून महाराजांचा इतिहास पोचवण्यास मदतच होत आहे. सांगायचा मुद्दा एवढाच आहे की, प्रत्यक्ष कृतीतून काम करून दाखवण्याचा माझा स्वभाव आहे. शिवरायांपासून राजर्षी पर्यंत माझ्या सर्व पूर्वजांनी हीच शिकवण दिली आहे'.


संबंधित बातम्या

Saam TV Live