उद्दिष्टपूर्तीसाठी कुटुंब नियोजन शस्त्रक्रियांचा धडाका, वाचा नाशकातला 41 महिलांसोबतचा हा धक्कादायक प्रकार

साम टीव्ही
शुक्रवार, 22 जानेवारी 2021
  • उद्दिष्टपूर्तीसाठी कुटुंब नियोजन शस्त्रक्रियांचा धडाका
  • अवघ्या 5 तासांत 41 महिलांवर शस्त्रक्रिया
  • शिरसगाव प्राथमिक आरोग्य केंद्रातला धक्कादायक प्रकार

नाशिक : सरकारी रुग्णालयं की कोंडवाडा असं विचारण्याची आता वेळ आलीय..त्याला कारण ठरलीय ती कुटुंब नियोजनाच्या शस्त्रक्रियेनंतर महिलांना मिळालेली अमानवी वागणूक. राज्य सरकारच्या आरोग्य विभागाचा भोंगळ कारभार या निमित्ताने समोर आलाय. 

पाहा या बातमीचा व्हिडिओ -

कुटुंब नियोजन शस्त्रक्रियेचं उद्दिष्ट पूर्ण करण्याच्या नादात अवघ्या 5 तासांत 41 महिलांवर शस्त्रक्रिया केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. त्र्यंबकेश्वर तालुक्यातील हरसूलजवळच्या शिरसगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात हा प्रकार घडलाय. खाटा किंवा अत्यावश्यक सेवेची कोणतीही सोय नसताना जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने हा गोंधळ घातलाय.

Video | मेट्रो आहे की डान्सबार? मेट्रोमधील ही दृष्य बघाल तर चकित व्हाल!

शस्त्रक्रियेनंतर रुग्णाला किमान पाच ते सात दिवस दवाखान्यात देखभाल आणि उपचारासाठी ठेवावं लागतं.  मात्र कोणतंही नियोजन नसल्याने शस्त्रक्रियेनंतर या महिलांना एका कोंदट खोलीत जागा आणि बेडअभावी फरशीवरच अंथरूण टाकून दाटीवाटीने झोपण्याची वेळ आली. या महिलांच्या दुर्दैवाचे दशावतार फक्त एवढ्यावरच थांबले नाहीत. तर दिवसभर या महिलांकडे कोणीही लक्षही दिलं नाही.

आता यथावकाश चौकशीचे सोपस्कार पार पाडले जातील..थातूरमातून कारवाईचा फार्सही उभा केला जाईल, पण त्यामुळे सरकारी आरोग्ययंत्रणेत फारसा बदल होईल, याची अजिबात शक्यता नाही.


संबंधित बातम्या

Saam TV Live