शेतकरी हवालदिल! आधी दुष्काळ, मग पूर आता अवकाळी पावसाने कोंडी

सकाळ न्यूज नेटवर्क
शुक्रवार, 8 नोव्हेंबर 2019

द्राक्षाकरिता यातील अवेळी पाऊस, दैनंदिन कमी तापमान आणि गारपीट हे तीनच धोके समाविष्ट आहेत. अवेळी पावसासाठी ४ मिलिमीटरपासून पुढील पावसाचा सहा टप्प्यांत नुकसानभरपाई ग्राह्य धरली असून, दैनंदिन कमी तापमान प्रकारात ३.५१ अंश सेल्सिअसपासून कमी तापमान ग्राह्य धरण्यात आले आहे आणि १ जानेवारी ते ३० एप्रिल दरम्यानचा कालावधी गारपीट प्रकारात ग्राह्य धरला आहे. मात्र, योजना लागू करताना आंबिया बहरातील फळपिकांसाठी असा उल्लेख केला आहे. तसेच ७ नोव्हेंबरला अंतिम मुदतीत अर्ज भरल्यानंतर ८ नोव्हेंबरपासून नैसर्गिक जोखीम ग्राह्य धरण्यात आली आहे. वास्तवात सर्वसाधारणपणे १५ ऑक्टोबरपूर्वी आपल्याकडे पावसाळा संपत असताना, येथून पुढील कालावधी तरी योजनेत ग्राह्य धरण्यात येणे अपेक्षित होते. गेल्या वर्षी याप्रमाणेच कालावधी ग्राह्य धरण्यात आला होता.

पुणे : हवामान आधारित पीकविम्यात द्राक्षाकरिता किमान १६ ऑक्टोबरपासून पीकविमा ग्राह्य धरणे अपेक्षित असताना ८ नोव्हेंबरपासून तो ग्राह्य धरण्यात आल्याने बागायतदारांची मोठी कोंडी झाली आहे. याच कालावधीत मोठे नुकसान झाल्याने आणि हंगाम पुरता गेल्याने द्राक्ष उत्पादकांसाठी आता पीकविमा ‘बैल गेला आणि झोपा केला’चा ठरला असून, याबाबत संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. अशातच ‘आंबिया बहरा’त द्राक्ष पीक व्यवस्थापन मोडत नसताना या कालावधीसाठी द्राक्षाकरिता पीकविमा जाहीर करण्यामागील गौडबंगाल काय असा प्रश्‍न उपस्थित केला जात आहे. 

राज्य सरकारने नुकताच ३१ ऑक्टोबरला हवामान आधारित पीकविमा जाहीर केला. यात द्राक्षाचा समावेश करण्यात आला असून, ७ नोव्हेंबर (आज) ही अर्ज भरण्याची अंतिम मुदत दिली आहे. पाऊस, तापमान, सापेक्ष आर्द्रता, गारपीट व वेगाचे वारे यांच्या मुळे पिकात निर्माण होणारे जोखीम स्तर विम्यात विविध टप्प्यांत ग्राह्य धरण्यात आले आहेत. 

द्राक्षाकरिता यातील अवेळी पाऊस, दैनंदिन कमी तापमान आणि गारपीट हे तीनच धोके समाविष्ट आहेत. अवेळी पावसासाठी ४ मिलिमीटरपासून पुढील पावसाचा सहा टप्प्यांत नुकसानभरपाई ग्राह्य धरली असून, दैनंदिन कमी तापमान प्रकारात ३.५१ अंश सेल्सिअसपासून कमी तापमान ग्राह्य धरण्यात आले आहे आणि १ जानेवारी ते ३० एप्रिल दरम्यानचा कालावधी गारपीट प्रकारात ग्राह्य धरला आहे. मात्र, योजना लागू करताना आंबिया बहरातील फळपिकांसाठी असा उल्लेख केला आहे. तसेच ७ नोव्हेंबरला अंतिम मुदतीत अर्ज भरल्यानंतर ८ नोव्हेंबरपासून नैसर्गिक जोखीम ग्राह्य धरण्यात आली आहे. वास्तवात सर्वसाधारणपणे १५ ऑक्टोबरपूर्वी आपल्याकडे पावसाळा संपत असताना, येथून पुढील कालावधी तरी योजनेत ग्राह्य धरण्यात येणे अपेक्षित होते. गेल्या वर्षी याप्रमाणेच कालावधी ग्राह्य धरण्यात आला होता.

 

मात्र, तसे न होता महाराष्ट्रातील ६० टक्के बागांचे नुकसान १५ ऑक्टोबर ते ७ नोव्हेंबरदरम्यान झाल्याने वेळेत पीकविमा जाहीर झाला असता, तर द्राक्ष बागायतदारांना सर्वांत मोठा दिलासा ठरला असता, मात्र तसेच न झाल्याने शेतकरी संतप्त झाले आहेत. पीकविमा जाहीर करण्यात मागे वेळकाढू धोरणामागील गौडबंगाल काय आहे, यामागे कंपन्यांचे हित जोपासण्याचेच कृषी विभागाचे धोरण कारणीभूत आहे का, असे अनेक प्रश्‍न शेतकऱ्यांनी उपस्थित केले असून, या दिरंगाईची सीआयडी चौकशी करण्याची मागणी केली आहे. 
 

‘ऑक्टोबर फळछाटणीनंतरची द्राक्षबाग’ असा शब्द प्रयोग योग्य...
द्रा क्षातील जोखीम व्यवस्थापनाबाबत बोलताना डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. एस. डी. सावंत म्हणाले, की आपल्या नियमितच्या पाऊसमानाप्रमाणे साधारणतः १५ ऑक्टोबरपर्यंत महाराष्ट्रामध्ये पावसाची शक्यता असते. यानंतरही पाऊस पडला, तरी फारसा पडत नाही, मोठा पडत नाही आणि पडलाच तर चक्रीवादळासारखी कारणे त्यास असतात. विमा कंपन्या केवळ ‘अनपेक्षित जोखीम’ (अन्‌एक्सपेक्टेड रिस्क) ग्राह्य धरतात. मग, सप्टेंबरच्या प्रारंभापर्यंत फळछाटणी केलेल्या द्राक्षबागा आहेत, त्यांचा अंतर्गत जोखीम स्तर जास्त असतो. त्यांचे फळ पावसामुळे अधिक बाधित होण्याचे, तसेच उत्पादन खर्च वाढविणारे असू शकेल, अशा कालावधीतील जोखीम स्तर आम्ही ग्राह्य धरणार नाही, असे कंपन्या म्हणतात. नियमित स्वरूपात सप्टेंबरच्या दुसऱ्या आठवड्यापासून जे फळछाटणी करतात, त्यांचा जोखीम स्तर विमा कंपन्या साधारणतः ग्राह्य धरतात. द्राक्षाकरिता आंबिया बहर हा शब्द वापरत नाही. लिंबाकरिता मुख्यतः हा शब्द वापरतात. ‘ऑक्टोबर फळछाटणीनंतरची द्राक्षबाग’ असे ‘आंबिया बहर’ऐवजी शब्द प्रयोग करणे योग्य ठरेल. आज ४० ते ४५ टक्के अर्ली फळछाटणीत होत्या त्या सर्व खराब झाल्या आहेत. ऑक्टोबर छाटणीतही बागा पावसात सापडल्या. यानंतरही पुढेही सामान्यतः बागांची स्थिती चांगली राहिलेली नाही, ३० ते ४० टक्के बागा आहेत, ज्या उशिरा फळछाटणी करतात, अशातही सध्याचा विमा उपयोगी ठरेल. 

रा ष्ट्रीय द्राक्ष संशोधन केंद्राचे वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. आर. जी. सोमकुंवर म्हणाले, ‘‘द्राक्ष पिकात आंबिया बहर ही संकल्पना नाही. ही संकल्पना संत्रा, मोसंबी तसेच अन्य फळांना लागू होते. द्राक्षात खरड छाटणी व फळछाटणी असे दोन मुख्य हंगाम आहेत. विम्याच्या अनुषंगाने बोलायचे झाल्यास फळछाटणीनंतर पाच ते सात दिवसांनी या पिकात हवामानाची जोखीम सुरू होते. द्राक्षांची काढणी होईपर्यंत ही जोखीम कायम राहते. अवस्थानिहाय बोलायचे झाल्यास पोंगा अवस्था हवामानाच्या अंगाने जोखमीची ठरू शकते. त्याचबरोबर घड निघण्याची अवस्था, फुलोरा, बेरी (मणी) सेटिंग, मणी विकसित होण्याची अवस्था, मण्यात पाणी उतरण्याची अवस्था अशा काढणीपर्यंतच्या सर्वच अवस्था महत्त्वाच्या आहेत. पाऊस अवस्थेत डाऊनी मिल्ड्यूचा धोका मोठ्या प्रमाणात असतो.’’
 
फळछाटणीनंतर सर्वच अवस्था जोखमीच्या : डॉ. जी. एम. खिलारी

द्रा क्ष पिकातील शास्त्रज्ञ व प्रयोगशील द्राक्ष बागायतदार अशी ओळख असलेले पुणे येथील डॉ. जी. एम. खिलारी म्हणाले की मुळात द्राक्ष पिकात आंबिया बहार ही संकल्पनाच नाही. या पिकात एप्रिलची खरड छाटणी व ऑक्टोबरमधील फळछाटणी हे दोन मुख्य हंगाम आहेत. काही भागात फळछाटणी जुलैच्या दरम्यानही केली जाते. हा आगाप हंगाम असतो. तर सप्टेंबरमध्येही ही छाटणी होते.

महत्त्वाच्या जोखीम काय आहेत?
खरे तर द्राक्षात फळछाटणीनंतरच खरी जोखीम सुरू होते. फुलोरा अवस्था व सेटिंग या द्राक्ष पिकातील सर्वांत महत्त्वाच्या जोखीम अवस्था आहेत. छाटणीनंतर काळ्या व व्हाइट जातींनुसार ३० ते ३५ दिवसांनी फुलोरा येण्यास सुरवात होते. या काळात पाऊस पडत राहिल्यास बागांचे शंभर टक्के नुकसान होते. कारण फुलोराच गेला तर पुढे बागेतून उत्पादन काय घ्यायचे? असे मत डॉ. खिलारी यांनी व्यक्त केले.

धुके व दहिवर
पाऊस थांबल्यानंतरही मग रात्री १० ते सकाळी १० वाजेपर्यंत दहिवर पडत राहते. केवळ पाऊस नव्हे तर धुके, दहिवर या बाबीदेखील बागांचे संपूर्ण नुकसान करतात. ही बाब दुर्लक्षित असून, त्याविषयी फार कमी बोलले जाते. त्यामुळे पीकविम्याचा विचार करताना पाऊस या घटकाबरोबर या घटकांचाही विचार करायला हवा, अशी मागणी डॉ. खिलारी यांनी नोंदविली. 

मुळांची घटलेली कार्यक्षमता व घड जिरणे
सततच्या पावसामुळे बागांमध्ये पाणी साठून राहिले आहे. त्यामुळे पिकांच्या मुळांना ऑक्सिजन मिळत नाही. घड फुटण्याच्या दृष्टीने जी हार्मोन्स झाडात पाहिजेत तीच उपलब्ध होत नाहीत. अशा वेळी घड जिरण्याची सर्वांत गंभीर समस्या यंदा तयार झाली आहे. घडच जिरले तर पुढे फळांची अपेक्षा काय ठेवायची? हा मुद्दाही पीकविम्यासाठी महत्त्वाचा मानला गेला पाहिजे. अनेकांकडे घड जिरण्याचे प्रमाण ९५ टक्के आहे. त्यांना आता काहीच उत्पादन हाती लागणार नाही.

ज्यांच्या छाटण्या अर्ली किंवा ऑक्टोबरच्या पूर्वी झाल्या आहेत त्यांनी फुलोरा अवस्था ओलांडली असली, तरी आता सततच्या प्रतिकूल वातावरणात डाऊनी, करपा, भुरी यांसारख्या रोगांची मोठी समस्या तयार झाली आहे. हे रोग नियंत्रणात आणणे अवघड झाले आहे. शिवाय अर्ली हंगामातील बागांत मण्यात पाणी उतरण्यास सुरवात झाली आहे. तेथे मण्यांचे क्रॅकिंग होऊ लागले आहे. अशी द्राक्षे व्यापारी घेण्यास तयार नाही. त्यामुळे उत्पन्न हाती लागेल अशीही परिस्थिती नाही. जोखमेच्या वरील सर्व पीक अवस्थांचा विचार पीकविम्यासाठी होणे गरजेचे आहे. शिवाय त्यासाठी ठरावीक मुदतीत अर्ज करायची अटदेखील काढून टाकली पाहिजे. अन्यथा, नुकसानग्रस्त शेतकरी त्यापासून वंचित राहण्याची शक्यता आहे असेही डॉ. खिलारी यांनी सांगितले.

डॉ. खिलारी म्हणाले की द्राक्षातील पीकविम्याला कोणत्या तारखेत अडकवता कमा नये. त्याला वर्षभर विम्याचे संरक्षण अत्यावश्‍यक आहे. वास्तविक द्राक्षाला केवळ फळछाटणीतच धोका असतो असे नाही. तर एप्रिल छाटणीतही गारपीट होऊ शकते. या काळात नुकसान झाले, तर त्याचा परिणाम पुढे फळछाटणीवर होतो. माझा अनुभव सांगायचा तर एप्रिल छाटणीनंतर माझ्या बागेत गारपीट झाली. त्या वेळी नव्या तयार झालेल्या काड्यांचे मोठे नुकसान झाले. त्यानंतर ज्या नव्या काड्या फुटल्या, त्या वाढल्या, मात्र त्या माल तयार करू शकल्या नाहीत. कारण पहिल्या काड्यांसाठी झाडांतील अन्नसाठा वापरण्यात आला होता. त्यामुळे नव्या काड्यांसाठी तो पुरेसा ठरला नाही.


संबंधित बातम्या

Saam TV Live