किसान सभेच्या लाँग मार्चला आजपासून सुरवात

सकाळ न्यूज नेटवर्क
बुधवार, 20 फेब्रुवारी 2019

नाशिक - गेल्या वर्षाच्या लाँग मार्चनंतर दिलेल्या आश्‍वासनांना सरकारने वाटाण्याच्या अक्षता लावल्याने बुधवारी (ता. २०) दुपारी चारपासून पुन्हा किसान सभेच्या लाँग मार्चला  नाशिकमधून सुरवात होणार आहे. 

नाशिक - गेल्या वर्षाच्या लाँग मार्चनंतर दिलेल्या आश्‍वासनांना सरकारने वाटाण्याच्या अक्षता लावल्याने बुधवारी (ता. २०) दुपारी चारपासून पुन्हा किसान सभेच्या लाँग मार्चला  नाशिकमधून सुरवात होणार आहे. 

किसान सभेतर्फे गेल्या वर्षी ६ मार्चला लाँग मार्च काढण्यात आला होता. त्या वेळी शासनाने त्यांना बरीच आश्‍वासने दिली होती. सर्व मागण्या मंजूर केल्याचे जाहीर केले होते. त्यातील वनजमिनींचा प्रश्‍न काहीअंशी मार्गी लागला. बाकीच्या मागण्यांबाबत काहीच प्रगती दिसली नाही. बाकी आश्‍वासनांना वाटण्याचा अक्षता लावल्याने यंदाही किसान सभेने सात दिवसांचा लाँग मार्च आयोजित केला आहे. दुपारी चारला मुंबई नाका येथून ५० हजार शेतकरी, शेतमजूर आदिवासी बांधवांच्या साक्षीने या लाँग मार्चला सुरवात होणार आहे. आमदार जे. पी. गावित, किसान सभेचे नेते डॉ. अशोक ढवळे, अजित नवले, किसन गुजर, सुनील मालुसरे, इरफान शेख, उमेश देशमुख, उदय नारकर, सखाराम पवार यांच्या नेतृत्वाखाली या लाँग मार्चला सुरवात होणार आहे. येत्या २७ फेब्रुवारीला हा मोर्चा मुंबईत पोचणार आहे. त्या वेळी राज्यातील कामगारही मुंबईतील आंदोलनात सहभागी होणार आहेत. यंदाचा लाँग मार्च गत वर्षापेक्षा जास्त प्रखर करण्याचा किसान सभेचा प्रयत्न आहे. 

महाराष्ट्राचे एक थेंबही पाणी गुजरातला जाणार नाही, ही हमी घेतल्याशिवाय लाँग मार्च हटवायचा नाही, असा निर्धार आमदार गावित यांनी व्यक्त केला. दोन दिवसांपूर्वी मुख्यमंत्र्यांनी बोलविलेल्या बैठकीत तोडगा निघाला नाही. उद्यासुद्धा आंदोलक विल्होळीपर्यंत गेल्यानंतर जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन हे लाँग मार्चच्या शिष्टमंडळाचे निवेदन स्वीकारून त्यांचे मत परिवर्तन करण्याचा प्रयत्न करण्याची शक्‍यता आहे. मात्र मोर्चेकऱ्यांचे समाधान न झाल्यास मोर्चा पुढे सरकणार आहे. सुरवातीला ‘सीटू’चे केंद्रीय उपाध्यक्ष डॉ. डी. एल. कराड हे लाँग मार्चमध्ये सहभागी होतील. मात्र ते शेवटपर्यंत जाणार नाही. २७ फेब्रुवारीला ते मुंबईत उपस्थित राहणार आहेत. तेथे मोठ्या प्रमाणावर शक्तिप्रदर्शन केले जाणार आहे. त्या दिवशी कामगारांचा महाराष्ट्र बंद ठेवण्याचा प्रयत्न आहे. लाँग मार्चच्या पार्श्‍वभूमीवर पोलिस यंत्रणा सतर्क झाली असून, सर्वत्र चोख बंदोबस्त तैनात केला आहे. सध्यातरी गनिमी काव्यानेच लाँग मार्चची व्यूहरचना सुरू आहे.

Web Title: Today the Kisan Sabha will be started from Nashik on long March


संबंधित बातम्या

Saam TV Live