अतिवृष्टीनं पिकं जमीनदोस्त, निसर्गाच्या रौद्रावतारापुढे शेतकरी हतबल

साम टीव्ही
शनिवार, 17 ऑक्टोबर 2020

 

  • अतिवृष्टीनं पिकं जमीनदोस्त
  • निसर्गाच्या रौद्रावतारापुढे शेतकरी हतबल
  • नुकसानीमुळे राज्यात 5 शेतकऱ्यांची आत्महत्या

अतिवृष्टीनं शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावून घेतलाय. मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रात शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान झालंय. निसर्गापुढे हतबल झालेला बळीराजा पुन्हा आत्महत्येच्या वाटेवर जातो की काय? अशी भीती वाटू लागलीय. 

आधी नापिकी, त्यानंतर आलेलं कोरोना संकट आणि आता अतिवृष्टी. राज्यातल्या शेतकऱ्याच्या मागे लागलेलं हे शुक्लकाष्ठ संपता संपत नाहीयेत. प.महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भाच्या अनेक भागात परतीच्या पावसानं अक्षरश: धुमाकूळ घातलाय. या पावसानं सोयाबीन, कापूस, तूर, उडीद, मका, ज्वारीचं पीक जमीनदोस्त केलंय. तोंडाशी आलेला घास निसर्गानं हिरावून घेतल्यानं शेतकरी पुन्हा व्यथित झालाय. दुर्दैवाची बाब म्हणजे राज्यात 5 शेतकऱ्यांनी आत्महत्या केलीय. सांगा आम्ही जगायचं कसं असा आवाज राज्यातल्या शेतकऱ्यांमधून येतोय. 

 

  • परतीच्या पावसाचा सोलापूर जिल्ह्यात 58 हजार 
  • हेक्टरमधील पिकांना फटका बसलाय. 
  • तर पंढरपूर तालुक्यातील 95 गावांना अतिवृष्टी आणि पूराचा तडाखा बसलाय. 
  • एकूण 86 हजार हेक्टर पैकी 30  हजार हेक्टर क्षेत्रावरील ऊस,केळी,डाळिंब,दाक्ष मका,बाजरी,तूर आदी पिकांचे नुकसान झालंय. 
  • जवळपास पाच लाख टन उसाचं नुकसान झाल्याचा अंदाज आहे. 

नांदेड जिल्ह्यात 16 तालुक्यातील पाच लाख 63 हजार 72 शेतकऱ्यांना परतीच्या पावसाचा फटका बसलाय. यात 3 लाख 61 हजार हेक्टरवरील खरिप पिकांचं नुकसान झालंय. 

पावसानं होत्याचं नव्हतं करून टाकलंय. आधीच पाठीवर कर्जाचा बोजा, त्यात कुटुंब कसं चालवायचं हा प्रश्न...आता बळीराजाची सारी भिस्त आहे ती सरकारी मदतीवर.


संबंधित बातम्या

Saam TV Live