बोगस बियाणांनंतर शेतकऱ्यांचा निसर्गानंही केला घात...

साम टीव्ही
रविवार, 28 जून 2020
  • मराठवाड्यात दुबार पेरणीचं संकट
  • बोगस बियाणांनंतर निसर्गानंही केला घात
  • शेतकऱ्यांसमोरील संकटांची मालिका संपेना 

राज्यातील शेतकऱ्यांसमोरील संकटांची मालिका संपता संपत नाही. चांगला पाऊस झाला म्हणून शेतकऱ्यांनी मोठ्या आशेनं पेरणी केली. पण त्यांच्या आशेवर अस्मानी आणि सुलतानी संकटांनी पाणी फेरलंय. शेतकऱ्यांवर पुन्हा एकदा दुबार पेरणीचं संकट ओढावलंय. 

यंदा पावसानं वेळेत हजेरी लावत शेतकऱ्यांना सुखद धक्का दिला. पण हे सुख शेतकऱ्यांच्या पदरात फार काळ राहिल असं दिसत नाही. विशेष करून मराठवाड्यातील शेतकऱ्यांच्या पदरी पुन्हा निराशाच आलीय. मोठ्या आशेनं इथल्या शेतकऱ्यांनी शेतात बियाणं पेरलं पण बोगस बियाणांनी घात केला. ज्या भागात उगवण झाली तिथलं पीक पाऊस घेऊन गेला. मराठवाड्यातील औरंगाबाद, जालना, बीड या जिल्ह्यासोबत बुलढाणा, वाशीम, अहमदनगर या जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांना अतिवृष्टीचा मोठा फटका बसलाय. औरंगाबाद जिल्ह्यातील गंगापूर, फुलंब्री तालुक्यातील शेतजमीन पावसाने खरडून गेली. जालना जिल्ह्यातील रोहिलागड इथं एकाच रात्रीत झालेल्या अतिवृष्टीने जवळपास शंभराहून अधिक शेतकऱ्यांची शेतीच वाहून गेली. त्यात पिकांचा तर पत्ताचं नाही.  

  • यंदा पेरणीयोग्य पाऊस झाल्यामुळे शेतकऱ्यांनी आपल्या पेरण्या लवकरच उरकल्या. मात्र आठवडाभरापासून औरंगाबाद आणि जालन्याला पावसानं अक्षरश: झोडपून काढलं. 
  • औरंगाबाद जिल्ह्यातील 26 पेक्षा जास्त मंडळात अतिवृष्टीची नोंद झालीय. त्याठिकाणी 70 मिलिमीटर पेक्षा जास्त पाऊस एकाच दिवशी पडला.
  • जालना जिल्ह्यातील 24 मंडळात अतिवृष्टी झाल्याची नोंद आहे. 
  • परभणी जिल्ह्यातील 31 मंडळांत तुरळक हलका मध्यम ते दमदार पाऊस झाला. जिल्ह्यातील 16 मंडळांत अतिवृष्टीची नोंद झाली.
  • बीड आणि उस्मानाबाद जिल्ह्यातील काही मंडळात अतिवृष्टीची नोंद आहे.
  • लातूर जिल्ह्यातील 49 मंडळांत तुरळक, हलका ते दमदार पाऊस झाला. जिल्ह्यातील 9 अतिवृष्टीची नोंद झाली. 
  • नांदेड जिल्ह्यातील 18 मंडळांत मध्यम ते दमदार पाऊस झाल्याची नोंद झाली.  थोडक्यात काय तर आई जेवू घालीना आणि बाप भीक मागू देईना अशी गत शेतकऱ्यांची झालीय. बोगस बियाणांमुळे शेतकरी आधीच नाडला गेलाय. त्यात जे काही थोडं बहूत पीक आलं तेही पाऊस घेऊन गेलाय. त्यामुळे आता मराठवाड्यातील शेतकऱ्यांपुढे दुबार पेरणीशिवाय गत्यंतर उरेलेलं नाही. 


संबंधित बातम्या

Saam TV Live