भारतासाठी धोक्याची घंटा, दररोज पावणेतीन लाख रूग्ण वाढण्याची भीती

साम टीव्ही
गुरुवार, 9 जुलै 2020

 

  • भारतासाठी धोक्याची घंटा 
  • दररोज पावणेतीन लाख रूग्ण वाढण्याची भीती
  • कोरोनासंकटात 2021 धोक्याचं वर्ष ?

कोरोनाबाधितांच्या वाढत्या संख्येमुळे भारताची चिंता वाढलीय कोरोना रूग्णांच्या बाबतीत भारत सध्या जगात तिसऱ्या क्रमांकावर आहे. कोरोना संसर्गाचं प्रमाण कमी न झाल्यास 2021 पर्यंत भारत पावणे तीन लाखांचा आकडा गाठेल अशी भीती व्यक्त होतीय. 

जगभरात करोनाच्या संसर्गाचं थैमान सुरू आहे. भारतात तर दिवसेंदिवस बिकट अवस्था बनत चाललीय. त्यातच आता MITनं एक धक्कादायक अहवाल सादर केलाय. या अहवालानुसार कोरोनावर औषध सापडलं नाही आणि कोरोनावर नियंत्रण मिळवण्यात अपयश आलं तर भारतात 2021 पासून दररोज पावणे तीन लाख नवीन कोरोना रूग्ण सापडू शकतात. ही भीती खरी ठरल्यास भारत हा सर्वाधिक करोनाबाधितांचा देश होऊ शकतो, असा इशाराही देण्यात आलाय. तर, दुसरीकडे मार्च ते मे 2021 पर्यंतच्या कालावधीत जगभरात 20 ते 60 कोटी रुग्ण संख्या होण्याचा धोका असून सुमारे 17 लाखांहून अधिकजणांचा मृत्यू होण्याची भीती व्यक्त करण्यात आलीय. एका गृहीतकाच्या आधारे हा अंदाज व्यक्त करण्यात आला असल्याचंही संस्थेनं स्पष्ट केलंय 

या संस्थेच्या अहवालानुसार 2021 मध्ये भारतात दररोज पावणे तीन लाख कोरोना रूग्ण आढळू शकतात. तर फेब्रुवारी 2021 दरम्यान, अमेरिकेत दररोज 95 हजार 400, दक्षिण अफ्रीकेत 20 हजार 600, इराणमध्ये 17 हजार, इंडोनेशियात 13 हजार 200, तर ब्रिटनमध्ये दररोज 4200 रूग्ण आढळून येण्याचा अंदाज वर्तवण्यात आलाय. 

दरम्यान, जागतिक आरोग्य संघटनेकडून 29 जून रोजी प्रसिद्ध झालेल्या ताज्या माहितीनुसार वैद्यकीय प्रक्रियेच्या माध्यमातून पाच मायक्रॉनहून लहान थेंब अथवा एरोसोल तयार झाले, तरच या विषाणूचा हवेतून प्रसार शक्य आहे. मास्कचा वापर, सुरक्षित वावर आणि सतत हात धुणे ही काळजी घेतली तर करोना विषाणूपासून दूर राहता येणं शक्य आहे, असं जागतिक आरोग्य संघटनेचं म्हणणं आहे. त्यामुळे येणारा काळ अत्यंत खडतर असून भारतीयांना सतर्क राहण्याची गरज आहे.


संबंधित बातम्या

Saam TV Live