अखेर खडसेंचा राष्ट्रवादीत प्रवेश निश्चित, मात्र रक्षा खडसेंचा भाजप सोडण्यास नकार! वाचा ही सविस्तर माहिती

अखेर खडसेंचा राष्ट्रवादीत प्रवेश निश्चित, मात्र रक्षा खडसेंचा भाजप सोडण्यास नकार! वाचा ही सविस्तर माहिती

एकनाथ खडसे यांनी आज भाजप पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा देत भाजपला रामराम ठोकला. खडसेंच्या राजीनाम्यानंतर जयंत पाटील यांनी पत्रकार परिषद घेत शुक्रवारी खडसे राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याचंही सांगितलंय. एकनाथ खडसे शरद पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहेत. एकनाथ खडसेंवर भाजपात अन्याय झाला असंही जयंत पाटील यांनी म्हंटलंय. खडसे कुटुंबातील सदस्यही भाजपमधून राजीनामा देणार असल्याचं समजतंय. कार्यकर्त्यांशी चर्चा करून खडसे जळगावहून मुंबईकडं रवाना होतील. एकनाथ खडसेंबरोबर अनेक आमदारही राष्ट्रवादीच्या संपर्कात असल्याचं जयंत पाटील यांनी म्हंटलंय.

वाचा काय म्हणाले खडसे -

"मी पक्षनेतृत्वावर नाराज नाही. माझी नाराजी ही फक्त देवेंद्र फडणवीसांवर आहे, असं म्हणत एकनाथ खडसेंनी देवेंद्र फडणवीसांवर हल्लाबोल केलाय. कुणाचीही तक्रार नसताना माझी नाहक बदनामी करण्यात आली. मला अतिशय वाईट वागणूक देण्यात आलीय यापेक्षा मोठं दुर्दैव काय असू शकतं. पक्षासाठी मी 40 वर्ष काम केलं. पक्ष मोठा करण्यात माझाही वाटा आहे. कोणत्याही पदाच्या लालसेनं मी कधीच काम केलं नाही. मी लाचार नाही आणि लाचार होणारही नाही" असं म्हणत खडसेंनी आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिलीय. 

मी भाजप सोडणार नाही - रक्षा खडसे

आजचा दिवस आमच्यासाठी अत्यंत दुःखदायक आहे. नाथाभाऊंच्या निर्णयाचे आम्हाला दुःख आहे. पण, मी भारतीय जनता पक्ष सोडणार नाही. मी भाजपची खासदार म्हणून निवडून आले आहे, त्यामुळे मी भाजपतच काम करत राहणार आहे,' अशी प्रतिक्रिया ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्या स्नूषा खासदार रक्षा खडसे यांनी नाथाभाऊंच्या राजीनाम्यावर दिली. 

एकनाथ खडसे यांनी आज भारतीय जनता पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा देत राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये जाण्याचा निर्णय घेतला. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी माध्यमांना याबाबतची माहिती दिली. 

नाथाभाऊंच्या या बहुचर्चित राजीनाम्यानंतर रक्षा खडसे बोलत होत्या. त्या म्हणाल्या की, ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी व्यक्तीगत कारणामुळे भारतीय जनता पक्षाचा राजीनामा दिला आहे. आजचा दिवस आमच्यासाठी अत्यंत दुखदायक आहे. नाथाभाउंच्या निर्णयाचे आम्हाला पक्ष म्हणून दुःख आहे. 

पक्ष सोडण्याच्या बाबत रक्षा खडसे म्हणाल्या की मी भाजपकडून निवडून आले आहे. भाजपचा उमेदवार म्हणून लोकांनी मला निवडून दिले आहे. मी भाजपतच राहणार असून पक्षाचे काम करत राहणार आहे. पक्ष जो काही जबाबदारी देईल, ती मी पूर्ण करणार आहे, असे सांगत आपण पक्ष सोडणार नसल्याचे रक्षा खडसे यांनी सांगितले. 

भाजपने त्यांना भरपूर काही दिले आहे, हे त्यांनीसुद्धा नमूद केले आहे. सर्वजण पक्षामुळेच मोठे होत असतात. पण नाथाभाऊंचेही योगदान पक्षवाढीसाठी होते, हे नाकारता येत नाही. त्यांनी 40 वर्षे पक्षासाठी दिली आहेत. त्यांच्यामुळे राज्यात पक्ष मोठा झाला, हे मान्यच करावे लागेल. 

मी सांगितले तसेच झाले पाहिजे, असा आग्रह नाथाभाऊंचा कधी नव्हता. त्यांनी माझ्यावर कधीही दबाव टाकला नाही. त्यांनी राजीनामा दिला म्हणजे मीही राजीनामा दिला पाहिजे, असे काही नाही, असेही त्यांनी नमूद केले. 

आपण भाजपमध्ये कधीपर्यंत राहणार, या प्रश्‍नावर रक्षा खडसे म्हणाल्या की, याचे भाकित कुणीही करू शकत नाही. ज्यासाठी लोकांनी निवडून दिले आहे, त्यासाठी आपल्याला काम करत राहावे लागते. 

चंद्रकांत पाटील काय म्हणाले -

एकनाथ खडसेंनी राजीनामा दिला हे कटूसत्य असून, नाथाभाऊंचा राजीनामा आपल्याकडे पोहोचल्याची माहिती भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दिलीय. खडसे पक्ष सोडतील असं वाटत नव्हतं, त्यामुळे त्यांचा राजीनामा हातात पडेपर्यंत आम्ही आशावादी होतो, असंही ते म्हणालेत. खरंतर त्यांनी राजीनामा देण्याची गरज नव्हती कारण त्यांच्या आरोपावर फडणवीसांनी अगोदरच खुलासा केल्याचंही पाटील म्हणाले. त्यांनी आमचं नेतृत्व करावं, अशी आमची इच्छा असल्याचं सांगत पाटील यांनी खडसेंना पुढील राजकीय वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. 

भाजप नेत्यांच्या खडसेंच्या राजीनाम्यावर प्रतिक्रिया

एकनाथ खडसेंच्या राजीनाम्यावर भाजप नेते देवेद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिलीय. खडसेंच्या राजीनाम्याची अधिकृत माहिती मिळालेली नाही. याबाबत भाजप प्रदेशाध्यक्षच योग्य ती प्रतिक्रिया देतील असं फडणवीसांनी म्हंटलंय. तर एकनाथ खडसेंना भाजपात जी किंमत होती ती राष्ट्रवादीत मिळणार नाही...खडसेंना पश्चाताप होईल अशी प्रतिक्रिया प्रा. राम शिंदे यांनी दिलीय.

दरम्यान, एकनाथ खडसेंनी भाजपचा राजीनामा दिलाय. खडसेंच्या या निर्णयानंतर जळगावात खडसे समर्थकांनी जल्लोष केलाय. खडसेंवर भाजपमध्ये अन्याय झाल्याची भावना खडसे समर्थकांनी व्यक्त केलीय.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com