शिक्षणाने स्वप्ने साकार करू शकता!

शिक्षणाने स्वप्ने साकार करू शकता!

प्रभादेवी - विश्‍वसुंदरी मानुषी छिल्लर शनिवारी प्रभादेवीत अवतरली आणि तिने महापालिकेच्या शाळेतील वातावरण अक्षरशः स्वप्नवत केले. बेस्टच्या उघड्या डबल डेकर बसमधून तिची मिरवणूक काढण्यात आली. तिला पाहण्यासाठी रस्त्याच्या दुतर्फा मोठी गर्दी झाली होती. शिक्षणाने तुम्ही तुमचे ध्येय गाठू शकता. सर्व स्वप्ने साकार करू शकता. शिक्षणामुळेच आत्मविश्‍वास वाढतो, असा कानमंत्र मानुषीने विद्यार्थ्यांना दिला.

शाळेतील विद्यार्थ्यांशी संवाद घडवून आणणारी विश्‍वसुंदरीची सुखद भेट अविस्मरणीय अशीच ठरली. कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे महापालिकेच्या सर्व शाळांतून करण्यात आले. मानुषी प्रभादेवीतील शाळेत आल्यावर विद्यार्थ्यांनी स्वागत गीत सादर केले. विद्यार्थ्यांचे गायन आणि नृत्याचे तिने कौतुक केले. युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे, महापौर विश्‍वनाथ महाडेश्‍वर, उपमहापौर हेमांगी वरळीकर आदी मंडळी कार्यक्रमास उपस्थित होती. माझी आई हीच माझा आदर्श आहे. आपली आईच आपले भवितव्य उत्तम प्रकारे घडवू शकते, असे तिने सांगितले तेव्हा विद्यार्थ्यांनी टाळ्यांचा कडकडाट केला.

भरपूर शिका. शिक्षणाने तुम्ही ध्येय गाठू शकता. शिक्षण शेवटपर्यंत तुमच्या सोबत राहते. विश्‍वसुंदरी स्पर्धेत देशाच्या वतीने सादरीकरण करताना शिक्षणाने दिलेला आत्मविश्‍वास उपयोगी पडला, असे मानुषी  म्हणाली. लहान मुले मला फार आवडतात. एवढ्या मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या विद्यार्थ्यांशी संवाद साधायला मिळणे खरेच अविस्मरणीय आहे, असे म्हणत तिने विद्यार्थ्यांनाही जिंकले.

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com