कुठलंही फरसाण, वेफर्स किंवा चकल्या खाल तर जाल हॉस्पिटलमध्ये

कुठलंही फरसाण, वेफर्स किंवा चकल्या खाल तर जाल हॉस्पिटलमध्ये

फरसाण, वेफर्स, चकली असे पदार्थ आवडत नाही, असे लोक शोधूनही सापडणार नाहीत. कुरकुरीत, खमंग वेफर्स, फरसाण एका बैठकीत बोकाणा भरून किती खाल्ले याचा हिशेब कोणी ठेवत नाही. पण हे पदार्थ खाण्याआधी तुम्हाला  आता 10 वेळा विचार करावा लागेल. 

कारण, तुमच्यासमोरच्या प्लेटमध्ये येणारं फरसाण किंवा वेफर्स तळण्यासाठी कोणत्या तेलाचा वापर केलाय, हे माहीत करून घ्यावं लागेल. कारणअनेक ठिकाणी हे पदार्थ तळण्यासाठी चक्क काळ्या तेलाचा वापर केला जात असल्याचं धक्कादायक सत्य समोर आलंय.

शहरांतल्या हॉटेलमध्ये वापरण्यात आलेलं तेल गोळा केलं जातं. त्या तेलात विशिष्ट रसायन मिसळलं जातं. त्याच तेलात नंतर फरसाण, वेफर्स तळले जातात. हे तयार केलेले पदार्थ स्थानिक दुकानदारांना विकले जातात.

असाच एक प्रकार नवी मुंबईतल्या ऐरोलीजवळ उघडकीस आलाय. एका तरुणाला काळ्या तेलात हे पदार्थ तयार केले जात असल्याचं दिसून आलं. त्यानंतर त्यानं अधिक माहिती घेतली असता, हे तेल कोणतंही सील नसलेल्या डब्यांतून आणलं जात असल्याचं दिसून आलं..या प्रकरणी एफडीएनं या कारखान्यावर छापा मारला. सर्व पदार्थ ताब्यात घेऊन तेलाचे नमुने तपासणीसाठी पाठवलेत आणि हे पदार्थ विकण्यास बंदी घातलीय.

अनेक कारखान्यांमध्ये अशा प्रकारे काळं तेल पदार्थ तळण्यासाठी वापरलं जातं..त्यामुळे खोकला, पोटदुखी आणि  त्यापेक्षाही गंभीर आजार होऊ शकतात.

हे पदार्थ कितीही आकर्षक दिसत असले. त्यांचा सुगंध घमघमत असला आणि जिभेला पाणी सुटत असलं तरी ते तुम्हाला हॉस्पिटलला पाठवू शकतात. त्यामुळे काळ्या तेलाच्या या काळ्या धंद्याला लवकरात लवकर आळा घालण्यासाठी सरकारनं पावलं उचलणं गरजेचं आहे. 

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com