पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाज शरीफ यांना भ्रष्टाचारप्रकरणी सात वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा

सकाळ न्यूज नेटवर्क
मंगळवार, 25 डिसेंबर 2018

इस्लामाबाद- पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाज शरीफ यांना आज भ्रष्टाचारविरोधी विशेष न्यायालयाने पनामा पेपर्स गैरव्यवहाराशी संबंधित असलेल्या अल-अजीजिया स्टील मिल भ्रष्टाचारप्रकरणी सात वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा ठोठावली. तसेच, "पनामा पेपर्स'शी संबंधित फ्लॅगशिप गुंतवणूक भ्रष्टाचारप्रकरणी शरीफ यांना न्यायालयाने निर्दोष मुक्त केले.

इस्लामाबाद- पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाज शरीफ यांना आज भ्रष्टाचारविरोधी विशेष न्यायालयाने पनामा पेपर्स गैरव्यवहाराशी संबंधित असलेल्या अल-अजीजिया स्टील मिल भ्रष्टाचारप्रकरणी सात वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा ठोठावली. तसेच, "पनामा पेपर्स'शी संबंधित फ्लॅगशिप गुंतवणूक भ्रष्टाचारप्रकरणी शरीफ यांना न्यायालयाने निर्दोष मुक्त केले.

पाकिस्तानातील भ्रष्टाचारविरोधी विशेष न्यायालयाचे न्यायाधीश मुहंम्मद अर्शद मलिक यांनी आज हा निकाल दिला. आपल्या वकिलांसह शरीफ यांचे न्यायालयात आगमन झाल्यानंतर न्यायाधीशांनी निकालाचे वाचन केले. "पनामा पेपर्स'शी संबंध असलेले गैरव्यवहाराचे तीन खटले शरीफ आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या विरोधात सुरू आहेत. अल-अजीजिया गैरव्यवहारप्रकरणी शरीफ यांच्या विरोधात ठोस पुरावे असल्याचे स्पष्ट करत त्यांना सात वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा न्यायालयाने ठोठावली आहे. तसेच, शरीफ यांना 2.5 दशलक्ष डॉलरचा दंडही करण्यात आला आहे.

न्यायालयात उपस्थित असलेल्या शरीफ यांना पोलिसांनी तात्काळ ताब्यात घेतले. शरीफ यांना लाहोरच्या कोट लखपत तुरुंगात किंवा रावळपिंडीतील अदिआला तुरुंगात हलविले जाऊ शकते, अशी शक्‍यता वर्तविली जात आहे. न्यायालयाच्या आजच्या निर्णयाला शरीफ हे आव्हान देऊ शकतात.

पनामा पेपर्सप्रकरणी सुरू असलेल्या खटल्यात न्यायालयाने जुलै 2017 मध्ये शरीफ यांना अपात्र ठरविले होते. त्यानंतर शरीफ यांना पंतप्रधानपदावरून पायउतार व्हावे लागले होते. शरीफ यांच्या विरोधातील गैरव्यवहाराच्या इतर दोन खटल्यांचे कामकाज पूर्ण करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने 24 डिसेंबरची मुदत दिली होती. 

दुसऱ्या खटल्यात निर्दोष मुक्तता 
"पनामा पेपर्स'शी संबंधित फ्लॅगशीप गुंतवणूक गैरव्यवहार प्रकरणी शरीफ यांच्या विरोधात ठोस पुरावे नसल्याचे सांगत न्यायालयाने त्यांना निर्दोष मुक्त करण्यात येत असल्याचा निर्णय दिला. लंडनमधील ऍव्हनफिल्ड मालमत्ता प्रकरणात न्यायालयाने यापूर्वीच शरीफ यांना 11 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा ठोठावली आहे. तसेच, याच खटल्यात शरीफ यांची कन्या आणि जावयालाही तुरुंगवासाची शिक्षा झाली आहे. या तिघांनाही इस्लामाबाद न्यायालयाने सप्टेबरमध्ये जामीन मंजुर केला होता. 

समर्थकांवर लाठीमार 
दरम्यान, न्यायालयाने आज शरीफ यांना सात वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा ठोठविल्यानंतर न्यायालयाच्या परिसरात उपस्थित असलेले शरीफ समर्थक आणि पाकिस्तान मुस्लिम लीग-नवाज पक्षाच्या कार्यकर्त्यांची पोलिसांशी झटापट झाली. या वेळी पोलिसांनी अश्रूधुराच्या नळकांड्या फोडत लाठीमार केल्याचे सांगण्यात आले. आजच्या सुनावणीवेळी न्यायालयाच्या परिसरात मोठ्या संख्येने सुरक्षा दले तैनात करण्यात आली होती.

Web Title: Former Pakistan Pm Nawaz Sharif Sentenced To 7 Years In Jail


संबंधित बातम्या

Saam TV Live