VIDEO | छोट्याशा गावातील झेडपीच्या शाळेतील पोरांची कमाल पाहा, विद्यार्थ्यांनी साकारलं फळं, भाज्या धुण्याचं मशिन

साम टीव्ही
शनिवार, 5 सप्टेंबर 2020
  • छोट्याशा गावातील पोरांची कमाल पाहा
  • जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांच्या कल्पकतेचं कौतुक
  • विद्यार्थ्यांनी साकारलं फळं, भाज्या धुण्याचं मशिन

बडकवस्ती... औरंगाबाद जिल्ह्यातील छोटीशी वस्ती... पण या वस्तीचं नाव आता देशभर घेतलं जातंय. कारण इथल्या जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांनी एक अनोखं मशिन साकारलंय. फळं आणि भाज्या धुण्याचं मशिन... कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी बनवलेलं हे मशिन नेमकं कसंय. पाहा.

ही जिल्हा परिषद शाळा आहे औरंगाबादच्या बडकवस्तीतली. या छोट्याशा गावातली ही शाळा संपूर्ण देशात चर्चेत आलीय. इतकंच नाही तर युनिसेफसारख्या जागतिक संस्थेनंही या शाळेचा गौरव केलाय. कारणही तसंच आहे, इथल्या इवल्या इवल्या हातांनी साकारलंय फळं आणि भाज्या धुण्याचं मशिन. तेही अवघ्या एकशे वीस रुपयांमध्ये. या मशिनमुळे फळं, भाज्या घरच्या घरी धुता येऊ लागल्याने पालकही आनंदात आहेत. 

कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी बाजारातून फळं, भाज्या आणणं टाळलं जातय. त्यामुळे इम्युनिटी पॉवर कशी वाढणार? शाळेतील शिक्षक विशाल टिप्रमवार यांना विद्यार्थ्यांनी समस्या सांगितली. विशाल टिप्रमवार यांनी मुलांना प्रोत्साहन दिलं. वस्तूंची शोधाशोध झाली. पाण्याचा कॅन, लोखंडी रॉड, ब्रश असे अगदीच किरकोळ साहित्य विद्यार्थ्यांनी जमवले आणि कल्पकतेतून साकार झालं फळं, भाज्या धुण्याचं अफलातून मशिन.

मुलांनी साकारलेली ही मशिन युनिसेफ, अटल इनोवेशन मिशन आणि निती आयोगाच्यास्पर्धेत पाठवला आणि देशात पहिलाही आला. संकटाच्या अंधारात खचून न जाता त्यावर कल्पकतेनं उपाय शोधला की मार्ग आपोआप सापडतो. हेच या शिक्षक आणि विद्यार्थ्यांनी जगाला दाखवून दिलंय. विद्यार्थ्यांच्या कल्पकतेला शिक्षकांनी प्रोत्साहन दिलं की क्रांतिकारी शोध नक्की लागतो, मग ते एखादं कॉन्व्हेंट स्कूल असू द्या किंवा वस्तीवरची जिल्हा परिषदेची छोटीशी शाळा.
 


संबंधित बातम्या

Saam TV Live