शिवभोजन योजनेला मोठा प्रतिसाद

शिवभोजन योजनेला मोठा प्रतिसाद

मुंबई - राज्यातील ३६ जिल्ह्यांत शिवभोजन योजनेला दोन दिवसांतच मोठा प्रतिसाद लाभला असून, या योजनेत लवकरच १ लाख थाळ्या उपलब्ध करून देण्याचा सरकारचा मानस आहे. त्यासाठी दरवर्षी १२५ कोटी रुपयांचा निधीदेखील देण्यात येईल, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले.

राज्यात २६ जानेवारी रोजी सुरू झालेल्या या शिवभोजन थाळीचा २५ हजार लाभार्थ्यांनी आस्वाद घेतला. सामान्य नागरिकांच्या प्रतिसादामुळे मुख्यमंत्री ठाकरे यांनी समाधान व्यक्त केले. दररोज एक लाख थाळी शिवभोजन देण्याचा मनोदय ठाकरे यांनी व्यक्‍त केल्याचे प्रशासकीय अधिकाऱ्यांनी सांगितले.


सध्या ५० केंद्रांवरून १८ हजार थाळ्या देण्यात येतात. यामध्ये वाढ करून शिवभोजनाची ५०० केंद्रे स्थापन करण्यात येणार आहेत. शिवभोजन योजनेच्या पहिल्या दिवशी ११ हजार ४०० थाळ्या तयार करून नागरिकांना देण्यात आल्या, तर दुसऱ्या दिवशी १३ हजार ५०० हून अधिक थाळ्या गेल्या. आज ठाकरे यांनी कोल्हापूर आणि नंदुरबार येथील शिवभोजन केंद्रात जेवणासाठी आलेल्या सर्वसामान्य लोकांशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून थेट संवाद साधला. या वेळी अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, विभागाचे प्रधान सचिव महेश पाठक आणि इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. जेवणाचा दर्जा कसा आहे, काही सूचना असल्या तर मनमोकळेपणाने सांगा, अशी विचारणा मुख्यमंत्र्यांनी लाभार्थ्यांना केली. 


‘साहेब, एरवी जेवायला ५० रुपये लागायचे. आता १० रुपयांत जेवण होते. तुम्ही शिवभोजन थाळी सुरू करून आमच्यासाठी चांगली सोय केली,’ अशी प्रतिक्रिया नंदुरबारच्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये हमाल म्हणून काम करणाऱ्या योगेश शिंदे यांनी व्यक्त केली. जिल्हाधिकारी राजेंद्र भारुड, केंद्राचे सचिव योगेश अमृतकर यांच्याशीही मुख्यमंत्री बोलले. सकाळी लवकर घराबाहेर पडल्यानंतर दुपारची जेवणाची चांगली सोय झाल्याचे कोल्हापूरकरांनी सांगितले. शिवभोजन योजनेत जेवण देताना स्वच्छता, टापटीप, जेवणाचा दर्जा, याकडे विशेष लक्ष द्यावे, अशा सूचनाही मुख्यमंत्र्यांनी या वेळी केंद्रचालकांना केल्या.


Web Title:Great response to Shiv Bhojana Yojana

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com